Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

करीना, बिपाशासारखं दिसायला कुणाला आवडणार नाही? पण तसा फिटनेस राखण्यासाठी जो त्याग करावा लागतो तो मात्र कुणालाच आवडत नाही. सर्वप्रथम एक लक्षात घेणं आवश्यक आहे की जर आपल्याला शिल्पाची कमनीय कंबर किंवा बिपाशाची टोन्ड बॉडी, करीनाची झीरो फिगर मिळवायची असेल तर मेहनत ही करावीच लागणार आणि त्याचबरोबर मनावर ताबा असणं सगळ्यात महत्त्वाच. ज्या व्यक्तींनी मला आधी बघितलंय आणि आता बघतात त्या नेहमीच चकित होतात आणि मनात प्रश्न उभा राहतो हे कसे साध्य झाले? अनेकांना वाटते तसे जाहिरातीतले प्रॉडक्टस् वापरून किंवा औषधे घेऊन किंवा सर्जरी करून असा फिटनेस मिळवता येत नाही, याची खूणगाठ तुम्ही मनाशी निश्चित बांधा. पंधरा दिवसात वजन कमी, पोट कमी किंवा कमनीय कंबर मिळवा, अशा अ‍ॅड्स खूप येतात पण त्यांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करू नका; कारण त्याने साध्य तर काहीच होत नाही मात्र शरीराचे नुकसान होते.
मग हे साध्य कसे करायचे! हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि त्यासाठीच मी स्वानुभवावरून तुमच्यासाठी हे खास पॅकेज

 

बनवले आहे- ‘होलिस्टिक फिटनेस’. ज्यामध्ये केवळ शरीराचा विचार न करता मनाचाही अभ्यास केला जातो आणि केवळ वजनच कमी होत नाही तर तुमची बॉडीसुद्धा टोन्ड होते- शरीराच्या फॅटचा इंचेसमध्ये लॉस होतो. यासाठीची त्रिसूत्री आहे- आहार- डाएट, व्यायाम- फिजिकल ट्रेनिंग, योगा- पॉवर योगा.
मला मान्य आहे की माझ्या बऱ्याच वाचक मैत्रिणी या खूप बिझी असणार. कोणी कॉलेज- क्लासेसमुळे तर कोणी जॉबमुळे तर कुणी- कुणाला फॅमिली प्रॉब्लेमस्! वेळ तर कुणाकडेच नाही. मग करायचे काय? सोपा उपाय सांगते- आपण जीवनात नेहमी कोणा- ना कोणावर प्रेम करतो आपली आई- बाबा, बहीण भाऊतर कधी बॉयफ्रेंड आणि आणखी कुणी. पण आपण स्वत:वर किती प्रेम करतो हे कुणी जाणून घेतलंय का? हा प्रश्न माझ्या प्रत्येक वाचक मैत्रिणींनी स्वत:ला विचारावा अशी माझी इच्छा आहे आणि याचं उत्तर जोपर्यंत होकारार्थी येणार नाही तोपर्यंत होलिस्टिक फिटनेसची त्रिसूत्री अवलंबवणं शक्य नाही.
आयुर्वेदानुसार आपल्या शरीराची व्याख्या ‘शीर्यते तत् शरीरम्’ अशी केलेली आहे. म्हणजे जे क्षणाक्षणाला झिजते ते शरीर पण आपण कधीच या आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही.
म्हणूनच सर्वप्रथम आपण आपल्या शरीरावर प्रेम करायला शिका. म्हणजे आपण आपोआपच त्याची काळजी घ्यायला लागू.
सर्वप्रथम आपला दैनंदिन क्रम ठरवणं आवश्यक आहे. कारण आहार, व्यायाम आणि पॉवर योगा करताना शिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे. बॅड हॅबिट्स असतील तर थोडा कंट्रोल मिळवायला हवा. वीक एंडच्या पार्टीज्, पब्स आणि डिस्कोथेक करू नका असे नाही पण हे करताना तोल सांभाळणं आवश्यक आहे.
आपल्या त्रिसूत्रींचा वापर करण्याआधी जर आपण हे करू शकलात तर हॉलिस्टिक फिटनेस मिळवणं काहीच कठीण नाही.