Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

व्हिवाचं कौतुक करणाऱ्या पत्रांचं आम्हाला निश्चितच कौतुक आहे. पण त्याहीपेक्षा आम्हाला आवडतील विश्लेषणात्मक पत्रं.
तुम्ही विचार करा आणि इतरांना विचार करायला लावा.

मराठी चॅनेल्सबद्दल थोडं आणखी
अभय परांजपेंनी पिटवलेली दवंडी परिणामकारक होती यात शंकाच नाही. सर्वप्रथम जुन्या सुखद दिवसांची हळूवार आठवण मनाला उल्हसित करून गेली. हे अगदी खरं की सगळं नवीन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी ताजेपणा होता. कार्यक्रमांचा दर्जा

 

नक्कीच वरचा होता. विनय आपटेंनी ‘गजऱ्या’च्या शूटिंगसाठी बस कशी मिळवली हा किस्साही चांगला होता पण प्रामाणिकपणाच्या प्रयत्नांनाही कसं समस्येला तोंड द्यावं लागतं याचाही तो एक नमुनाच होता. हे सगळं कौतुक त्यांनी मांडलेल्या विचारांसाठी.
आता त्या जमान्यातले तरुण वयातले आम्ही प्रेक्षक आता हळूहळू उताराकडे झुकू लागलोय. नवीन-वाईट जुनं चांगलं असं म्हटलं की आपलं वय झालं, आपण म्हातारे झालो की काय असं वाटू लागतं. दुर्दैवाने याबाबतीत तरी तसं म्हणता येणार नाही. चॅनेल्स व कार्यक्रमांची संख्या भरमसाठ असली तरी उडदामाजी काळे गोरे काय निवडावे. निवडणारे हे आज सत्य आहे. एका मालिकेतली एखादी कल्पना लोकांना आवडली असे वाटले की त्याची पुनरावृत्ती इतर मालिकांमध्ये होतेच होते. सगळ्या कल्पना इथून तिथे उचलल्या जातात. नावीन्य का वाटावं प्रेक्षकांना? प्रेक्षकांनी काय बघावं याची निवड करायची म्हटलं तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा दर्जेदार कार्यक्रम वाहिन्या देऊ शकत नाहीत. जी वृद्ध मंडळी घराबाहेर पडू शकत नाहीत त्यांच्या करमणुकीसाठी मालिका आहेत, ठीक आहे. पण ‘टिपऱ्यांसारखी’ दर्जेदार, निखळ करमणूक करणारी मालिका अभावानेच निर्माण होते. एकमेकांतली स्पर्धा, दिखाऊपणा, भपका, समाजाची बदललेली रुची, मानसिकता या सगळ्याला जबाबदार आहे. आवर्जून उल्लेख करावा अशा दोन मालिका ‘मंथन’ आणि ‘असंभव’. मंथनमधला चौघींचा अटकेचा प्रसंगही जरा मनाला न पटणारा वाटला. एक वर्षांपूर्वी वनिता समाजात मुलाखतीत सतीश राजवाडे यांनी मालिकेचा शेवट हातात आहे, उत्कंठा वाढवणारा आहे वगैरे सांगितलेले होते. काय झालंय माहिती नाही पण सध्या सतीश राजवाडेंचं नावही नाही आणि सुरुवातीपासून अतिशय उत्कंठावर्धक ठरलेली ही उल्लेखनीय मालिका मात्र इतरांच्या वाटेने जाऊ लागलीय की काय असं वाटू लागलंय. टीआरपी मीटर्स म्हणजे काय हे बाकी माहिती नाही. त्याचा उलगडा कसा होईल?
साधना ताह्मणे, माहीम

राजकारणातील तरुणाई
दि. ९ एप्रिल २००९ लोकसत्तामधील ‘व्हिवा’ या पुरवणीतील संतोष प्रधान यांचा ‘राजकारणातील तरुणाई’ हा लेख जबरदस्त राजकारणी विचारांचा, भविष्याचा वेध घेणारा आहे.
हा मजकूर वास्तविक सध्याच्या तरुण राजकारणी मंडळींवर आहे. त्यांचा इतिहास काय? या खोलात न जाता त्यांच्यात असलेल्या कार्यक्षमता व टॅलन्टचा आपल्या देशातील सर्व वर्गातील जनतेला व सर्वागीण विकास क्षेत्राला फायदाच व देशाच्या विकासाला व भ्रष्टाचार, दहशतवादमुक्त देशासाठी त्याना जनता शक्ती देवो अशी आशा बाळगतो.
सुधीर सावंत, अमरावती

दिखाऊ सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य
दि. १९ मार्च २००९ व्हिवा खरोखर वेगळ्या विचारांच्या वळणवाटा पुरवणी आहे. घरोघरी, ओपन फोरम, नोंद, दवंडी, लँग्वेज कॉर्नर, ट्रॅव्हल कॉर्नर, फूड कॉर्नर तसंच विविधांगी लेखनामुळे व्हिवा पुरवणी सर्वस्पर्शी झाली आहे. दिखाऊ सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य आपल्या व्हिवातील साहित्य वाचून लाभतं. उत्तम लेख देत राहून वाचकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. योगाभ्यासावर मार्गदर्शन करणारे लेख व्हिवामधून द्यावेत. छोटीसी स्पर्धा घ्यावी. बिंदिया चमकेगी, मनीषा सोमण या लेखातून बरीच माहिती मिळाली. मी तर म्हणेन बिंदियापेक्षा नारीला कुंकू शोभून दिसते. टिकली टिकली तर नाहीतर फेकून देतात.
ज्योती अशोक घेवडे, पुणे

नवे पुढारी नव्या आशा!
२ एप्रिलच्या व्हिवातील‘चैत्र चैतन्य’(शुभदा रानडे) व ‘कलेसाठी लेखन आणि लेखनाची कला’ (अभय परांजपे) हे लेख खूप छान आहेत. ‘चैत्रचैतन्य’ तर आपल्यापुढे साक्षात प्रत्यक्ष फुलांचा पटच उलगडून दाखवितो. तर ‘कलेसाठी कला’मध्ये ‘मालिका’ व इतर संवादलेखन यातील सूक्ष्म फरक नजरेस आणतो. खरं तर संवादलेखन मालिकेतील असो वा चित्रपट, नाटक, एकांकिका यातील असो, त्यात- प्रत्येकात फरक आहे व तो लेखकांनी दाखविला आहे. त्यापेक्षा एखाद्या मालिकेतील एखादा एपिसोड घेऊन तो कसा लिहिला जातो, त्यातील वैशिष्टय़े यांचे थोडे सविस्तर वर्णन- माहिती- देणारा लेख अधिक परिणामकारक झाला असता. वरील सर्व प्रकारातील संवादलेखनातील फरक- किंबहुना मालिकेतील संवाद कसे लिहिले जातात हे प्रेक्षकांनाही समजून द्यावेसे वाटतात. नाटकातील संवादही कालानुरूप बदलत आहेत. पूर्वी दहा दहा मिनिटांनी स्वगते, संवाद म्हणण्याची पद्धत- त्यातील नाटकीपणा यात फरक जाणवतो व प्रेक्षकात भावतो. जुन्या काळात संवाद फेकण्याची अभिनयाची पद्धत वेगळी असे. असो. मालिका वा चित्रपट यातील पडद्यामागची गुपिते (चित्रपट/ मालिकानिर्मिती संबंधातील गुपिते’ इतर गुपिते नव्हेत) समजून घेण्याची जिज्ञासा प्रेक्षकाला असते.
‘राजकारणातील तरुणाई’ हा संतोष प्रधान यांचा लेखही परिस्थितीचे विश्लेषण करणारा व माहितीपूर्ण आहे. स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण, राजकारणात तरुण रक्ताला वाव द्यावा अशा घोषणा वारंवार करणारे राजकारणी ‘ते’ विधेयक मात्र पारित होऊ देत नाहीत. त्या वेळी ते एकशेपाच असतात एरव्ही अन्य मुद्दय़ांवर शंभर आणि पाच असतात. शिवाय तरुणांना वाव द्या म्हणताना त्यांचे डोळ्यासमोर प्रथम आपले चिरंजीव असतात व नंतर इतर! तेथे घराणेशाही असतेच व वर्षांनुवर्षे सत्ता उपभोगल्यामुळे त्यांना सत्तेत स्थैर्य व निवडून येण्याची गॅरंटी असते. तेव्हा तरुणांना वाव देण्याची वेळ आलीच तर प्रथम सत्ताधिष्ठितांच्या नातेवाइकांची वर्णी प्रथम लागते. एकेक मतदारसंघ कुणाची तरी मिरास असते. तरुणांना न्याय द्यायचा असेल तर घराणेशाही गेली पाहिजे.
तरीही सध्या समाधानाची गोष्ट एवढीच की अनेक तरुणांना खासदार बनण्याची संधी या वेळी मिळणार आहे. हे यंग तुर्क निवडून द्यायलाच हवेत. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडणार आहे. ते ती यशस्वी रीतीने पार पाडतील यात संशय नाही. हे नवीन तरुण खासदार आपल्या कर्तृत्वाचा ठसा लोकसभेवर उमटवतील! त्यातील काहींना अनुभवही आहेच.
धुंडिराज वैद्य, कल्याण

‘घरोघरी’ मनाला भावून जातं
व्हिवामधील शुभदा पटवर्धनांची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. त्यांचे घरोघरी सदर हे मनाला भावून जाते. त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी करण्याची ताकद शुभदाजींच्या संवादात आहे. तो संवाद कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींनी केलेला असो किंवा फोनवरील असो प्रसंग दृष्टिपटलावर आलाच पाहिजे. कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ‘घरोघरी’तील प्रत्येक भाग चालू घडामोडींवर आधारित असून त्यातील घटना मनाला स्पर्श करून जातात. आता सध्याच्याच दोन- तीन आठवडय़ांपासून लग्नाविषयी होणारे संवादच घ्या ना, त्यात नववधूच्या मनाची होणारी घालमेल, अस्वस्थता, आईचे घर सोडून नव्या घराशी जोडली जाणारी कल्पना याविषयीचे संवाद वाचून प्रत्येक मुलीच्या किंवा विवाहित स्त्रीच्या ‘टचक्कन’ डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही तर दुसरी बाजू म्हणजे २ एप्रिलमधील ‘केल्याने होत आहे’मधील मराठी विवाह पद्धतीत इतर प्रदेशांतील विवाह पद्धतीचे स्वरूप येऊ लागले आहे. आणि आपली मराठी तरुण मंडळीदेखील कसे या गोष्टीकडे आकर्षिले जाऊन अनावश्यक खर्च करतात याची मांडणी उत्तमरीत्या केली आहे. एकूण त्यांच्या प्रत्येक सदरातून मला असे दिसून आले आहे की केवळ डोळ्यावर झापड लावून वागू नका, उघडय़ा डोळ्यांनी विचार करून निर्णय घ्या.
‘व्हिवा’ पुरवणीविषयी आणखी काही बोलायचे असेल तर ते असे की ही पुरवणी म्हणजे माझ्या जीवनातील एक भाग बनली आहे. जसे आपण आपल्या आवडत्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहत असतो त्याप्रमाणे मी ‘व्हिवा’ची वाट बघत असते.
काही कारणास्तव कदाचित जर मला ही पुरवणी मिळाली नाही तर काहीही करून मी दुसऱ्या दिवशी तरी ती नक्कीच मिळवते.
व्हिवाची अशीच उन्नती व्हावी याकरिता शुभेच्छा..
माधवी म्हात्रे, जोगेश्वरी

‘अतिथी देवो भव’
वैशाली करमरकर यांचा (२-३-०९) लँग्वेज कॉर्नर सदरातील ‘अतिथी देवो भव’ लेख वाचला. ‘सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं’ या विचारसरणीचीही काही माणसे असतात, त्यामुळे काही वेळा समोरच्या व्यक्तीला, परक्या व्यक्तीला मदत करावी की नाही, असा प्रश्न पडतो. वैशालीताईंना मी अशी विनंती करते की त्यांनी वाक्ये देण्यापूर्वी जर्मन शब्द व अर्थ प्रथम द्यावेत. ज्यायोगे एकाच वेळी बऱ्याच वाचकांनासुद्धा जर्मन भाषेची तोंडओळख होईल.
भ्रूमिंग कॉर्नरमधील डॉमिनिक कोस्टाबीर यांचे टर्निग पॉइंट (वळणाचे ठिकाण) हा लेख मला खूप आवडला. जन्यजनकभावानुसार कुठेतरी (पाक्षिकात) वाचलेल्या पोर्तुगाल कवी खलील जिब्रान यांच्या विचारांची आठवण झाली. त्यावरील काव्य -
तुमची मुले ही नव्हेत तुमची मुले।
ती तर निसर्गोद्यानातील नाजूक फुले।।
लादू नकात तयांवर तुमची संकुचित मते।
होऊ द्यात तयांची स्वतंत्र विकसित मने।।
माझ्या आवडीचा विषय असल्याने अभय परांजपे यांची ‘दवंडी’ मला फार आवडते. कायद्यासाठी माणूस की माणसासाठी कायदा यावर संवाद मी ऐकला होता. कुठल्याशा पाक्षिकात आलेले कुसुमाग्रजांचे साहित्यविषयक विचार आठवले. त्यावरील काव्य-
नदीपरी साहित्याचा उगम असे।
जनसागरास अंती मिळत असे।।
सत्यशिवसुंदर तयाचे रूप असे।।
अनुभूतीतूनी अभिव्यक्ती प्रकटत असे।।
‘घरोघरी’ सदरात शुभदा पटवर्धन यांचे ‘केल्याने होत आहे रे’ हे समर्थवचनावरील स्फूट आवडले. प्रबोध पत्रिकेत विनोबा भावे यांचे संकलित विचार मी वाचले होते. त्यात ‘मणभर वाचनापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ’ आचरण कणभर असे लिहिले होते. प्रस्तुत लेखात रश्मीची आई रेखा मुलीच्या विवाहाप्रीत्यर्थ अनाथाश्रमाला देणगी देण्याचा स्तुत्य उपक्रम करते.
स्मिता दत्तात्रय पाटील, बोरीवली

आजीची भातुकली
पाल्र्यातील भातुकलीच्या भांडय़ांच्या प्रदर्शनाला लहान-थोरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पाल्र्यात दुपारी १.०० ते ४.०० या वेळेत तर लहान मुला-मुलींनी प्रत्यक्ष पोळ्या करुन, दाणे कुटून, दळण दळून धमाल उडवून दिली. भातुकलीच्या खेळातील गंमत-मज्जा, सगळ्यांनाच अनुभवता यावी म्हणून एक अभिनव कल्पना मनात आली.
अहो, छोटय़ांच्या या दुनियेत छोटीशीच खेळणी बरी
बार्बीपेक्षा आपली भातुकलीतील ठकी शंभर पटीने खरी
भातुकली नाही, काळजी नसावी तरी
ही खेळणी घेवून आम्हीच येऊ ना तुमच्या घरी
लुटूपुटीचा खेळ, स्वयंपाक लुटुपुटीचा
खेळताना सहज मिळेल अनुभव आनंदाचा
कळवा तुमची वेळ अन पत्ता तुमच्या घरचा
सारे मिळून जपूया हा ठेवा संस्कृतीचा!
संपर्क : प्राजक्ता करंदीकर- (०२०) २४४८ ०२ ७९
वेळ : सकाळी १० ते १२
भातुकलीवाले करंदीकर, पुणे

व्हिवासाठी मजकूर किंवा पत्र खालील पत्यावर पाठवा- व्हिवा-लोकसत्ता, लोकसत्ता संपादकीय, एक्सप्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरीमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१. अथवा खालील ई मेलवर पाठवा. viva.loksatta@gmail.com