Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

तरुण पिढीचा राजकारणातील वाढता रस आणि त्यांच्या नेतृत्वाची देशाला असणारी गरज लक्षात घेता तरुणांना राजकारणाचे शिक्षण देणाऱ्या संस्था असाव्यात का?

संपदा देवरुखकर (बी.कॉम.)
तरुणांना राजकारणाचे शिक्षण देणाऱ्या संस्था असू नयेत, कारण त्यातही राजकारण होऊन भ्रष्टाचार वाढेल. काही प्रमाणात तरुणांना खुर्चीच्या सत्तेचे आणि राजकारणाचे आमिष निर्माण करणारी विचारप्रणाली शिकवली जाईल. तरुणातील नेतृत्वगुण भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतून जातील व तरुणांची दिशाभूल होईल.

 

लौकिक धोंडे
(विद्यार्थी - केमिकल इंजिनीअरींग)

तरुणांना राजकारणाचे शिक्षण देणाऱ्या संस्था असाव्यात, कारण त्यामुळे तरुण पिढी राजकारणाकडे आकर्षित होईल. राजकारणाच्या शिक्षणामुळे कोणीही आपली मते तरुण पिढीवर लादू शकणार नाही. या शिक्षणातून युवकांना आपला गैरवापर होतो की नाही याचं ज्ञान मिळेल आणि त्यातून भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल.

गजानन सावंत : (बी.कॉम.)
तरुण नेतृत्वाची गरज लक्षात घेता राजकारणाचे शिक्षण देणाऱ्या संस्था असाव्यात. त्यामुळे पिढीजात आणि परंपरेने चालत आलेल्या घराण्यापुरता राजकारण हा विषय मर्यादित राहणार नाही. अगदी सर्वसामान्य घरातील तरुणही राजकारणात प्रवेश करतील. तरुणांच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. जुन्या आणि रटाळ संकल्पनेत बदल होऊन नव विचारांचे वारे युवक या राजकारणाच्या क्षेत्रात आणतील व राजकीय नेत्यांचा व राजकारणाचा दर्जा सुधारण्यास नक्कीच मदत होईल.

रीना धोंडे (मानसशास्त्र विषयाच्या लेक्चरर)
तरुणांना राजकारणाचे शिक्षण देणाऱ्या संस्था असाव्यात. कारण इतर क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातही तरुणांना करिअरची संधी उपलब्ध होईल. राजकारणात व राजकीय नेत्यांच्या वागण्या-बोलण्याला शिस्तबद्धता येईल. योग्य पद्धतीने राजकारणाचं शिक्षण असल्यामुळे राजकीय नेत्यांना समाजात योग्य मान मिळेल.

लीना आडारकर : (दादर सार्वजनिक वाचनालयात नोकरी)
तरुणांना राजकारणाचे शिक्षण देणाऱ्या संस्था नसाव्यात, कारण तरुण पिढी या राजकारणाच्या शिक्षणाचा गैरवापर करून गुंडगिरी प्रवृत्ती जोपासतील व स्वत:च्या खोटय़ा अधिकारांचा स्वैराचार माजवतील.