Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

निवडणुकीच्या प्रचारात कलाकारांची मदत घ्यावी?
निवडणूक आणि प्रचाराच्या रणधुमाळीत, कलाकारांनी राजकीय पक्षाचा प्रचार करावा का? यावर व्हिवाच्या कट्टय़ावर ठाण्याच्या ज्ञानसाधना कॉलेजातील आणि LIIT (Lalita Institute of Information Technology) च्या अजय सोंडकर, सोनल घुगे, कांचन काटकर आणि सागर सुर्वे यांच्या गप्पांचा फड मस्त रंगला होता. गप्पांना सुरुवात करताना सोनल म्हणाली की, राजकीय पक्षांनी कलाकारांना प्रचार करायला

 

लावू नये. कलाकारांना राजकारणाबद्दल काय माहिती असेल? ज्याची त्याची कामे ज्याने त्याने करावीत. नेत्यांना चित्रपटात अभिनय करायला लावता येईल का? तिच्या या म्हणण्याला दुजोरा देत कांचनने आपलं मत मांडलं, ‘कलाकारांना शूटिंगमधून वेळ कसा काय मिळतो?’ अजय मात्र या दोघींच्या मताशी असहमत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, कलाकारांनी प्रचार करण्यात काहीच गैर नाही. अभिनेते असले तरी तेही नागरिक आहेत, शिवाय परस्पर मैत्रीखातरही ते प्रचार करत असतील. हे जरी खरं असलं तरी यात दुसरीही बाजू आहे. असं सागरचं मत. त्याच्या मते, लोकप्रिय अभिनेत्याने एखाद्या पक्षाचा प्रचार केला तर प्रचारासाठी गर्दी खेचता येते आणि त्याचे चाहते त्या पक्षाला मतदानही करतील अशी राजकीय पक्षांची खेळी आहे.
या प्रचाराच्या निमित्ताने अभिनेते स्वत:ची जाहिरात या निमित्ताने करुन घेतात का यावर सोनल म्हणाली की, कलाकारांना कदाचित प्रचार केल्याचे मानधनही मिळत असणार. म्हणजेच या सर्व गोंधळात अभिनेते स्वत:चा फायदा करून घेत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. कांचनने सोनलच्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवला.
दक्षिणेकडे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री प्रचारात सहभागी होतात. राजकारणातील त्यांच्या प्रवेशाचं प्रमाणही मोठं आहे. त्याबद्दल बोलताना अजय म्हणाला की, बॉलीवूडमधील कलाकार कॉलीवूड कलाकारांचा कित्ता गिरवत आहेत असंही म्हणता येईल.
एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री ज्या कोणत्या पक्षाचा प्रचार करत असेल, त्याला खरंच या प्रसिद्धीची फायदा होत असेल का? यावर सोनल म्हणाली की, नेत्यांनी स्वत:ची कामं व्यवस्थित केली तर अभिनेत्यांची प्रचारासाठी गरजच काय? पाच वर्षांचा सगळा हिशोब मांडा आणि मग मते मागा.
‘नेत्यांनी स्वत:ची कामे केली तर त्यांनी राजकारण कधी करायचं!’ अजय उसळलाच. पण त्याचबरोबर चांगली कामे करणारी माणसेही आपल्याकडे आहेत, असं सांगत त्यानं सुनील दत्त यांचं उदाहरण दिलं.
सलमान खान एकाच वेळी काँग्रेस आणि भाजपचा प्रचार करतो आहे. त्याबद्दल बोलताना अजय म्हणाला की, सलमान खान माझा आवडता अभिनेता, पक्ष न बघता त्याला जे योग्य उमेदवार वाटत आहेत त्यांचा तो प्रचार करतोय. काँग्रेसने चांगली कामं केलेली आहेत. सलमानने काँग्रेससाठी प्रचार करावा, असं कांचनचं मत.
मराठी कलाकार किंवा बालकलाकार यांचाही मुद्दा बोलता बोलता निघाला. मराठी कलाकारांनीही मग शिवसेना, मनसेसाठी प्रचार करावा, असं सागरला वाटतं. ते ठीक आहे. पण सोनलच्या मते, खरं तर कलाकारांनी प्रचार करू नयेच, पण जर केलाच तर चांगल्या पक्षासाठीच करावा. त्यातून बालकलाकारांना प्रचार करायला लावणं हे पूर्णपणे चूक आहे.
‘हो, नं’. अजयने तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. १८ वर्षांखालील या कलाकारांना त्या पक्षाचीच काय पण राजकारणाची तरी माहिती असेल का? त्यांची प्रसिद्धी फक्त 'encash' करून घ्यायची आहे. असं कांचन आणि सागर दोघांचंही एकमत झालं.
उगाच प्रचार करण्यापेक्षा काही तरी ठोस भूमिका घेऊन प्रचारात उतरणारे ही कलाकार आहेत असं म्हणत सोनलने, ओम पुरी, अतुल कुलकर्णी, सदाशिव अमरापूरकर यांच्यासारख्या विचारी अभिनेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या मल्लिका साराभाई, मारुती भापकर या उमेदवारांसाठी प्रचार केला तर ते पटण्यासारखं आहे, असं मत व्यक्त केलं.
‘हो बरोबर आहे. स्वतंत्रपणे उभं राहणाऱ्या या उमेदवारांबद्दल खात्री असेल म्हणूनच त्यांनी प्रचार केला असणार’, असं कांचन म्हणते. अजय मात्र थोडं वेगळं मत मांडत म्हणाला की, मला नाही वाटत त्याने काही विशेष फरक पडेल. जनता नेत्यांना बघूनच मत देते.
बोलता बोलता मुन्नाभाईचा विषय निघाला. सोनल म्हणाली, ‘एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत संजय दत्तला विचारल्या गेलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं अमर सिंहच देत होते. जर संजय नवखा आहे, तर सपामध्ये महत्त्वाचं पद त्याला कसं काय दिलं? त्याने आधी कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी कामं करायला पाहिजे. मग पद मिळवायचं’.
अजय म्हणाला की, कदाचित सपाला असंही दाखवायचं असेल की जरी संजयला तिकीट नाही मिळालं तरी तो deserving candidate आहे शिवाय घरात राजकारणाची पाश्र्वभूमी असल्याने त्याला राजकारण माहीत असणारच.
‘अरे पण, जर घरातलं राजकारण बघितलं आहे, तर अमर सिंहांनी प्रश्नांची उत्तरं का दिली’? कांचन, सोनलने एक आवाजात आपलं मत मांडलं. सागर थोडीशी शांत भूमिका घेत म्हणाला की, येत्या पाच वर्षांत संजयने पक्षासाठी, लोकांसाठी काम करावं आणि मग निवडणूक लढवावी.
कोणत्याही अभिनेत्याने, कोणत्याही पक्षासाठी कितीही प्रचार केला तरी लोकांनी कोणाला मत द्यायचं हे स्वत:च ठरवावे. स्वत:च्या मतदानाची जबाबदारी स्वत:च घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचे मतदान हे केलेच पाहिजे. यावर चौघांचे एकमत झाले.
पल्लवी कुलकर्णी
pallavi.pallak@gmail.com