Leading International Marathi News Daily
गुरुवार । २३ एप्रिल २००९

शाळेत, कॉलेजमध्ये किंवा कोणताही व्यावसायिक कोर्स करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या टक्केवारीचं खूप टेन्शन असतं, जर आपल्याला प्रगती करायची असेल आणि या कॉर्पोरेट युगात टिकून राहायचं असेल तर टक्केवारी चांगली असणं गरजेचं आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं, पण हे कॉर्पोरेट युग जरा गुंतागुंतीचं आहे.
जर आपल्याला आपलं करियर उत्तम प्रकारे घडवायचं असेल तर फक्त आपली शैक्षणिक पात्रता आणि त्या विषयातलं

 

आपलं ज्ञान पुरेसं नसतं. कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशनसाठी कट ऑफ लिस्ट लागते नाही तर सीईटीसारख्या परीक्षा असतात, पण नोकरी मिळवणं म्हणजे कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवणं नव्हे. कमी ज्ञान असलेल्या किंवा अनुभवी नसलेल्या लोकांनाही बढती मिळते. तेव्हा त्यांचे सहकारी कुरकुर करतात, ‘तो तर बॉसचा चमचा आहे. सारखा गोड गोड बोलून स्वत:चा फायदा करून घेत असतो!’ पण तुमच्याएवढीच शैक्षणिक पात्रता असलेले लाखो लोक बाहेर असतात. मग ह्यूमन रिसोर्स किंवा तुमचा बॉस, कोणाला घ्यायचं हे कसं ठरवेल? त्यांना बारीक सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
माझा एक मित्र पंचतारांकित हॉटेलमध्ये पर्सनल मॅनेजर आहे. त्याने इंटरव्ह्यूला बोलावण्यासाठी एका माणसाला फोन केला तेव्हा त्या माणसाची ‘चोली के पीछे क्या है..’ ही रिंगटोन माझ्या मित्राने ऐकली आणि त्याच क्षणी त्याने फोन ठेवून दिला. इंटरव्ह्यू न घेता लगेचच त्याला रिजेक्ट करून टाकलं. माझा अजून एक मित्र एका आघाडीच्या विमान कंपनीत केबिन क्रू निवडत होता, तेव्हा फॉर्मल कपडय़ांवर पांढऱ्या रंगाचे मोजे घालून आलेल्यांना त्याने चक्क रिजेक्ट केलं. त्याच्या मते, त्या नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांना फॉर्मल्स घालता आलेच पाहिजेत!
हे सगळे निर्णय अन्यायकारक वाटतील किंवा क्षुल्लक गोष्टींवर आधारलेले वाटतील, पण आजकाल बिझनेस मीटिंग्ज फक्त ऑफिसपुरत्या मर्यादित नाही राहिल्या आहेत. गोल्फच्या मैदानात किंवा लंच, डिनर या वेळीसुद्धा या मीटिंग्ज होत असतात. त्या वेळी फक्त डिग्री तुमच्या कामाला नाही येत. तुमची वागण्याची शैली, दर्जा, बोलण्याची पद्धत हे सगळंही खूप महत्त्वाचं ठरतं. तुमची शैक्षणिक पात्रता, अनुभव याबरोबरच तुमचं व्यक्तिमत्त्वही गृहीत धरलं जातं. तुमची देहबोली, तुम्ही कसे चालता, बोलता, तुमचं हसणं कसं आहे, तुम्ही तुमची नापसंती कशी दाखवता, हस्तांदोलन कसं करता हे सगळं खरंच महत्त्वाचं आहे. एका अमेरिकन रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की, इंटरव्ह्यूनंतर व्यवस्थित आणि योग्य हस्तांदोलन करणाऱ्या ९० टक्के लोकांना ती नोकरी मिळाली. इंटरव्ह्यूूमध्ये तुमची प्रवृत्ती, एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचंही मूल्यमापन केलं जातं. इंटरव्ह्यू घेणारे नेहमी प्रामाणिक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतात. ज्यात काहीतरी करून दाखवण्याची जबरदस्त इच्छा असते आणि जो स्वत: केलेल्या कृतीची जबाबदारी पेलू शकतो अशी माणसं त्यांना हवी असतात. तुम्ही बाकीचे कर्मचारी, पुरवठादार आणि ग्राहकांशी सलोखा निर्माण करू शकता का? एखाद्या समस्येला किंवा एखाद्या निर्णायक क्षणी तुमची प्रतिक्रिया काय असेल या सर्व बाबींचा विचार इंटरव्ह्यूच्या वेळी होत असतो.
जेव्हा आपली जडण घडण होत असते तेव्हा आपल्या दृष्टिकोनाचा विकास होत असतो. त्या दृष्टिकोनावर आपल्या घरच्यांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचाही पगडा असतो. आपण नकारात्मक, वाद घालणारे, आळशी, लाजणारे, नियंत्रण ठेवणारे.. अशा अनेक प्रकारांमध्ये मोडतो. पण मोठं झाल्यावर मात्र आपण स्वत:चा अभ्यास करून, योग्य मार्गदर्शनाखाली स्वत:चा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तुम्ही कोणताच निर्णय स्वत:हून घेत नसाल. याचं कारण तुमच्या वडिलांनी तुम्हाला कोणताच निर्णय घेऊ दिला नाही असं सांगून तुम्ही तुमच्या वडिलांना दोषी ठरवू शकत नाही किंवा तुमची आई नकारात्मक असायची म्हणून तुम्ही नकारात्मक आहात असंही तुम्ही बोलू शकत नाही.
गोष्ट जेव्हा वरिष्ठ पदाची, प्रमोशनची असते तेव्हा कंपनीचे डिरेक्टर्स पार्टी किंवा सोशल गॅदरिंगमध्ये त्यांच्या हाताखालच्या लोकांचं मूल्यमापन करतात. एका मॅनेजमेंट कंपनीतल्या सीईओने मला विनंती केली की, मी त्याच्या कंपनीतल्या दोन वरिष्ठ अकाऊंटन्टस्ना शिकवावं. तो म्हणाला, ‘डॉमिनिक, ते दोघं खूप हुशार आहेत. पण त्यांच्या वागण्याच्या आणि खाण्याच्या पद्धती खूप वाईट आहेत. ते दोघं खाताना, पिताना आवाज करतात. सगळ्यांसमोर भुरके मारतात, ढेकरही देतात. त्यांचं प्रमोशन झालं तर त्यांना आमच्या ग्राहकांबरोबर ऑफिसमध्ये किंवा बाहेर हॉटेल्समध्ये मीटिंग्ज कराव्या लागतील. जो तुझ्या शिकवण्याला उत्तम प्रतिसाद देईल त्यालाच मी प्रमोशन देईन!’
जेव्हा आपण यश मिळवण्यासाठी प्रगतीच्या एकेक पायऱ्या चढत जातो तेव्हा आपल्याला काय माहिती आहे. याबरोबरच आपल्याला कोण कोण माहिती आहेत हेसुद्धा महत्त्वाचं ठरतं.याला नेटवर्किंग म्हणतात. योग्य व्यक्तींशी ओळख करून घ्या. त्यांच्या संपर्कात राहा, त्यांच्याशी चांगले नातेसंबंध तयार करा. अहंकार बाजूला ठेवा. लाजू नका. भावना आतल्या आत दाबू नका. तुम्ही ज्या व्यक्तींचा आदर करता, ज्यांच्याबद्दल तुम्हाला कौतुक वाटतं, तुम्ही ज्या व्यक्तींना ओळखता- मग भले त्या तुमच्याच क्षेत्रातल्या नसतील- पण त्यांच्याशी बोला. त्यांना फोन करा. ई-मेल करा. हे संबंध नोकरी मिळवण्यासाठी, एखादी गोष्ट करवून घेण्यासाठी किंवा बिझनेसमध्ये एखादा करार करण्यासाठी खूप उपयोगी पडतात. चांगले संबंध असतील तर मदत मागायला काहीच हरकत नसते. तुमच्या चांगल्या संबंधाचं उत्कृष्ट लक्षण म्हणजे चाकोरीबाहेर जाऊन दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची इच्छा! ज्योती सकाळकर यांच्याशी माझी आधीपासून चांगली ओळख होती. एक दिवस त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, त्या आणि त्यांचा नवरा शाळेचं फर्निचर बनवणाऱ्या एका कंपनीत काम करतात. मग मी पण सांगितलं की, मी शिबीर घेतो. बोलण्या बोलण्यातून तिने माझ्या शिबिरासाठी विद्यार्थ्यांची एक बॅच तयार करून देईन असं सांगितलं. आता मी स्वत:हून मदत मागितली नव्हती, त्यांनीच पुढाकार घेतला.
पूर्वी तुम्ही कसे कपडे घालता, कसे बोलता, समाजात बिझनेसच्या ठिकाणी किंवा जेवताना तुमची वागणूक कशी आहे हे सगळे प्लस पॉइंटस् म्हणून गृहीत धरले जात. आजकाल हे अत्यावश्यक झालं आहे. पण त्या सगळ्या गोष्टी उपजत कोणाकडेच नसतात. त्या शिकूनच घ्याव्या लागतात. उदा. जेव्हा तुम्ही टाय घालता तेव्हा त्या टायची लांबी तुमच्या कमरेच्या पट्टय़ापर्यंतच यायला हवी. ना कमी ना जास्त. तुम्ही कुठे जाताय, कशासाठी जाताय यानुसार टायचा रंग निवडावा.
तुमच्या या गुणांचा परिणाम तुमच्या कामावर, प्रमोशनवर होत असतो. तरीसुद्धा मॅनेजमेन्ट, इंजिनीअरिंग, मेडिकल यासारख्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात. आतापासून काही मॅनेजमेंट कॉलेजमध्ये या गोष्टी शिकवणारे कोर्सेस चालू झाले आहेत. या गोष्टींना जीवनकौशल्य असंही म्हटलं जातं. तुमच्या वैयक्तिक जीवनात जेव्हा तुम्ही शेजारी, तुमच्या सोसायटीत, मित्रांबरोबर किटी पार्टी, लग्न किंवा इतर समारंभांना जाता तेव्हा ही कौशल्यं नक्कीच उपयोगी पडतात.
जर तुम्ही ही बोलण्याची कला अवगत केली तर तुम्ही एखादा ठाम नकार, सकारात्मक होकारातही बदलू शकता. आता हेच उदाहरण बघा ना. एक माणूस पुजाऱ्याकडे गेला आणि विचारलं मी प्रार्थना म्हणताना सिगारेट, दारू घेतली तर चालेल का? पुजारी भडकला. त्याने त्या माणसाला चार खडे बोल सुनावले. त्या माणसाच्या मित्राने त्याला ‘कसं विचारावं’ हे दाखवलं. तो पुजाऱ्यासमोर जमिनीवर खाली बसला आणि अत्यंत नम्रतेने म्हणाला, ‘हे पूज्य, मी दारू पितो, सिगारेट ओढतो ही खूपच खेदजनक आणि दुर्दैवी बाब आहे.. पण मी त्या वेळी देवाशी बोललो तर चालेल?’ पुजाऱ्याने मायेने त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं, ‘बाळ देव सर्वव्यापी आहे आणि तो आपलं आनंदाने ऐकतो. तू कोणत्याही वेळी देवाची प्रार्थना करू शकतोस.’
आपण ही कौशल्यं शिकूया. आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात त्याचं उत्तम फळ मिळेल. पण आपण ही कौशल्यं शिकायची कशी? मी माझ्या आईकडून शिकलो. नंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करता करता त्यात आणखीन भर पडली. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला शिकवायला सांगू शकता, त्याचे कोर्सेसही उपलब्ध आहेत. या गोष्टींमुळे तुम्ही तुमची प्रतिमा उत्कृष्ट करू शकता आणि चारचौघांपासून स्वत:ला वेगळं सिद्ध करू शकता. सभ्यतेमुळे नक्कीच फायदा होतो! चीअर्स!!
अनुवाद - यशोदा लाटकर
dominiccostabir@yahoo.com