Leading International Marathi News Daily
गुरुवार, २३ एप्रिल २००९
विविध

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी स्पॅनिश उद्योजकांना करून दिले कोलंबसाचे स्मरण
भारत-स्पेन यांच्यात कृषी, अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यटन क्षेत्रात करार
सुनील चावके
माद्रीद, २२ एप्रिल

जागतिक मंदीची झळ सहन करीत असलेल्या स्पेनपुढे आज भारताने मायदेशातील व्यापार व गुंतवणुकीचा पेटारा उघडला. अनेक शतकांपूर्वी कोलंबस भारताकडे निघाला होता, याचे स्मरण करून देत भारतातील व्यापार व गुंतवणुकीच्या संधी साधण्यासाठी स्पॅनिश उद्योजकांमध्ये आपल्याला कोलंबसप्रमाणेच जिद्द आणि जिगर दिसत असल्याचे मत आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भारत आणि स्पेन उद्योजकांच्या बैठकीत व्यक्त केले.

माओवाद्यांकडून झारखंडमध्ये रेल्वेचे अपहरण;
उटारी स्थानकावर स्फोट, बिहारमध्ये अनेक ट्रकना आगी
लतेहार/पाटणा, २२ एप्रिल/पी.टी.आय.
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असतानाच माओवाद्यांनी आपले हिंसाचार घडवून आणण्याचे सत्र चालूच ठेवले आहे. झारखंडच्या लतेहार जिल्ह्यामध्ये बुधवारी सकाळी साडे सातच्या दरम्यान माओवादी बंडखोरांनी ७०० प्रवाशांसह एका रेल्वेचे अपहरण करून सुमारे चार तास या प्रवाशांना वेठीस धरले. त्यानंतर झारखंडच्या मेदनीनीनगर जिल्ह्यातील उटारी स्थानकावर त्यांनी स्फोट घडविला आणि बिहारमध्ये अनेक ट्रक्सना आगी लावून एका चालकाची हत्याही केली.

१४० खासदारांना निवडण्यासाठी आज मतदान
नवी दिल्ली, २२ एप्रिल/पी.टी.आय.
१३ राज्यांमधील मतदार उद्या १४० भावी खासदारांचे भवितव्य ठरवणार असून राहुल गांधी, शरद पवार, जॉर्ज फर्नांडिस, रामविलास पासवान आणि सुषमा स्वराज या दिग्गज नेत्यांचे भवितव्य उद्या इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये बंद होणार आहे. हे सर्व जण देशाचे नेतृत्व करण्यास कोण लायक आहे यावर मतदारांनी आपला कौल द्यावा असे प्रचारसूत्र ठेवून लढत होते. त्यामुळेच या सर्वांचे काय होणार याकडे देशवासियांचे लक्ष लागून राहणार आहे. आंध्रप्रदेश आणि ओरिसा या राज्यांमधील मतदान उद्या पूर्ण होत आहे. मणिपूरमधील लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी आजच मजदान होत आहे, मात्र दुसऱ्या टप्प्यामधील मतदान म्हणूनच ते गृहित धरले जात आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा यांना अटक; सव्वा १० लाखांची रोकड जप्त
बैतिया (बिहार), २२ एप्रिल/पी.टी.आय.

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पश्चिम चंपारण येथून लोकजनशक्ती पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे प्रकाश झा हे निवडणुकीसाठी पैसे वाटप करीत असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या गेस्ट हाऊसवर छापा टाकून त्यांना अटक केली तसेच घरातून सव्वा १० लाख रुपयांची रोकड जप्त केली. झा यांच्या गेस्टहाऊसवर बुधवारी मध्यरात्री पश्चिम चंपारणचे पोलीस अधीक्षक के. एस. अनुपम यांनी स्थानिक पोलीस व केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांच्या पथकासह हा छापा टाकला व झा यांच्यासह एकूण २९ जणांना अटक केली. वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची नंतर सुटका करण्यात आली. निवडणुकीच्या जमा-खर्चाचा हिशेब न ठेवणे, पैसे वाटप आणि निवडणुकीबाबतचे चुकीची कागदपत्रे सादर करणे असे गुन्हे या सर्वांवर दाखल करण्यात आल्याचे अनुपम यांनी सांगितले. मात्र सव्वा १० लाख रुपयांची रोकड पैसे वाटण्यासाठी आणलेली होती याचा झा यांनी इन्कार केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी आपल्याशी असलेले वैमनस्य दाखविण्यासाठी ही कारवाई हेतूत: केली असल्याचा आरोप झा यांनी केला आहे.

‘मायावती मला बहिणीसारख्या’त्या उद्गारांबद्दल संजय दत्तकडून माफी
प्रतापगढ, २२ एप्रिल/पी.टी.आय.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल अभिनेता व समाजवादी पार्टीचा नेता संजय दत्त याने माफी मागितली असून, मायावती या आपल्या बहिणीसारख्या आहेत, असे त्याने म्हटले आहे. मायावती यांना मी ‘जादू की झप्पी’ (मिठी) देऊ इच्छितो, असे संजय दत्तने एका प्रचारसभेत बोलताना म्हटले होते. या वक्तव्यावरून गदारोळ उठला व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकारी पिंकी जोवाल यांनी पाठविलेल्या नोटिशीला संजय दत्तने काल रात्री फॅक्सद्वारे उत्तर पाठविले. मायावती यांच्याविषयी काढलेल्या उद्गारांबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्याने या पत्रात म्हटले आहे, ‘‘माझ्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील हा संवाद असून समाजाला प्रेमाचा संदेश देण्यासाठी मी जाहीर सभांमधून त्याचा वापर करीत असतो. मायावती या मला बहिणीसारख्या असून त्यांना उद्देशून वरील शब्दप्रयोग करताना माझा हाच उद्देश होता. तथापि, यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो.’’

वरुण गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पिलिभीत, २२ एप्रिल/पी.टी.आय.

निवडणूक प्रचारसभेतील मुस्लिमविरोधी उद्गारांबद्दल अटक होऊन दोन आठवडय़ांच्या पॅरोलवर सुटून आलेले भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांनी आज पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. या वेळी मनेका गांधी यांच्याबरोबरच त्यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी मनाई केल्यामुळे अर्ज भरण्यासाठी मिरवणुकीने जाण्याचा विचार वरुण गांधी यांना सोडून द्यावा लागला. २९ वर्षीय वरुण गांधी हे या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार पी. एम. सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवीत आहेत.