Leading International Marathi News Daily
शुक्रवार, २४ एप्रिल २००९

‘पंतप्रधानपदाचा निर्णय निकालानंतरच’
बारामती, २३ एप्रिल/वार्ताहर
‘‘लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर संयुक्त लोकशाही आघाडीच्या सर्व प्रादेशिक राजकीय पक्षांच्या घटकांना पुन्हा एकदा एकत्रित करून केंद्रात सरकार स्थापनेबाबत विचार केला जाईल,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.आज सकाळी आठच्या दरम्यान बारामती शहरातील ‘रिमांड होम’ येथील मतदान केंद्रावर शरद पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदान केले. याप्रसंगी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, पुतणे रणजित पवार यांनी मतदान केले.

राज्यात सरासरी ५५ टक्के मतदान
मुंबई, २३ एप्रिल / खास प्रतिनिधी
पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानात मतदारांचा फारसा उत्साह आढळून आला नाही. राज्यातील २५ मतदारसंघांमध्ये सरासरी ५५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. कडक उन्हाचा मतदानावर परिणाम झाला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात बोगस मतदानाच्या तक्रारी करण्यात आल्या. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.

मतदानात सर्वत्र निरुत्साह
मुंबई, २३ एप्रिल /प्रतिनिधी
अंगाची काहिली करणारा उकाडा, मतदारांचा निरुत्साह अशा पाश्र्वभूमीवर शरद पवार, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे, रामदास आठवले, ए. आर. अंतुले आदी अनेक दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला गुरुवारी यंत्रबंद झाला. नाशिकमध्ये झालेली दगडफेक तसेच अन्य काही मतदारसंघात झालेली किरकोळ मारामारीचे प्रसंग वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील २५ मतदारसंघात सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी आणि रायगड मतदारसंघात ५४ तर मराठवाडय़ामधील ५० ते ५४ टक्के मतदान झाले. सर्वाचे लक्ष लागलेल्या शिर्डी मतदारसंघात ५० तर नाशिकमध्ये ४५ टक्के मतदान झाले. पश्चिम महाराष्ट्रातही सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाले असून येथे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत.

हुश्श.. राजस्थान रॉयल अखेर जिंकला
केप टाऊन, २३ एप्रिल/ वृत्तसंस्था

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवित जाणाऱ्या सामन्यात अखेर ‘जो जिता वही सिकंदर’प्रमाणे गतविजेत्या राजस्थान रॉयलने कोलकाता नाईट रायडर्सवर ‘सुपर ओव्हर’ मध्ये सनसनाटी विजय मिळविला. निर्धारित २० षटकांत उभय संघांनी प्रत्येकी १५० धावा केल्याने हा सामना अगोदर ‘टाय ’ झाला होता. शेवटी सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सहा चेंडूत १५ धावसंख्या केल्यानंतर युसूफ पठाणच्या जोरावर राजस्थान रॉयलने १६ धावांचे विजयी लक्ष्य अवघ्या चार चेंडूत पार केले आणि स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला.

एलटीटीईभोवतीचा फास आणखी आवळला
कोलंबो, २३ एप्रिल/पी.टी.आय.
श्रीलंकेच्या ईशान्य भागात तामिळ वाघांच्या बालेकिल्ल्याच्या उरल्यासुरल्या प्रदेशाभोवती लष्कराने आता अगदी घट्ट फास आवळला आहे. अवघ्या ८ चौरस कि. मी.च्या या पट्टय़ातच तामिळी बंडखोरांचा नेता वेलुपिल्लई प्रभाकरन याच्यासह त्याचे वरिष्ठ सहकारी लपले असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. श्रीलंका लष्कराने अतिशय तयारीने हा वेढा घातला आहे. यासाठी रणगाडय़ांचीही मदत घेण्यात आली आहे. तसेच समुद्रातही नाकेबंदी करण्यात आली आहे. या छोटय़ाशा भूभागावर सुमारे ८०० ते ९०० तामिळ बंडखोर लपून बसले असावेत, असा अंदाज आहे. या बंडखोरांना नष्ट करणे हेच आमचे ध्येय आहे, अशा स्पष्ट शब्दांत श्रीलंकेचे लष्करप्रमुख सरत फोन्सेका यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र या ‘युद्धक्षेत्रात’ अडकलेल्या तामिळ जनतेला सुरक्षित बाहेर काढण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांच्या आदेशानंतर खा. संजय राऊत मतदारसंघाबाहेर
सावंतवाडी, २३ एप्रिल/वार्ताहर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात गुरुवारी झालेल्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी खासदार संजय राऊत यांना मतदारसंघ सोडण्याचे आदेश देताच राऊत यांनी प्रथम त्याला नकार दिला पण नंतर ते गोव्याला रवाना झाले. दरम्यान नारायण राणे यांनाही मतदारसंघ सोडण्यास सांगण्याची आग्रही मागणी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. शिवसेनेने कडवे आव्हान उभे केल्यामुळे राणेही कमालीचे वैतागले होते. त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला मुंबईवरून आलेल्या शिवसैनिकांना मुंबईला जाण्याचा मार्ग मिळणे कठीण होईल, असे सांगितल्याने खासदार राऊत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात त्या स्वरुपाची लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर राणे यांनी राऊत यांच्या विरोधात तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनी राऊत यांना मतदारसंघ सोडण्याचे आदेश दिले. प्रथम मतदारसंघ सोडण्यास नकार देणाऱ्या राऊत यांनी दुपारी गोवा गाठले. राणे, राऊत व उपरकर यांच्या या मागण्यांमुळे सिंधुदुर्गात शिवसेना व काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र पोलीस, एसआरपीची जादा कुमक असल्याने कोणत्याही अनुचित घटना घडल्या नाहीत.

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा चेन्नईवर ९ धावांनी विजय
दरबान, २३ एप्रिल/वृत्तसंस्था
दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई सुपरकिंग्जचा ९ धावांनी पराभव करून आयपीएल साखळी क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. २७ चेंडूत ५७ धावा फटकावून दिल्लीच्या १९० धावांच्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या हेडनच्या विकेटनंतर सामना चेन्नईच्या हातून निसटला. त्याआधी डिव्हिलिअर्सने ५४ चेंडूत नाबाद १०५ धावा फटकावून दिल्ली संघाला २० षटकांत ५ बाद १८९ धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. डिव्हिलिअर्सने आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत सर्वप्रथम शतकवीर होण्याचा मान मिळविला. डिव्हिलिअर्सने ५४ चेंडूंच्या खेळीदरम्यान ६ षटकार व ५ चौकार मारले.

मे अखेपर्यंत आणखी १३ स्कायवॉक मुंबईकरांच्या दिमतीला
मुंबई, २३ एप्रिल / प्रतिनिधी

येत्या ३१ मे महिन्यापर्यंत शहरातील आणखी १३ स्कायवॉकची कामे पूर्ण करण्यात येतील, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. एमएमआरडीएने शहरातील विविध स्थानकांबाहेर उभारण्यात येणारे ५० स्कायवॉक एप्रिलअखेपर्यंत खुले करण्याची घोषणा केली होती. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे शहरातील बहुतांश स्कायवॉकची कामे रखडली आहेत. केवळ अंधेरी, सांताक्रूझ, भांडूप, मीरा रोड, उल्हासनगर, बदलापूर (दोन), दहिसर, वांद्रे (विस्तारित), विरार, दहिसर, घाटकोपर, चेंबूर या स्थानकांबाहेरील स्कायवॉकची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएने वांद्रे पूर्व व कांजूरमार्ग स्थानकांबाहेरील स्कायवॉकची कामे पूर्ण केली आहेत.

अमेरिकेतील बे एरियात रंगला ‘चैत्रधुन’
मुंबई, २३ एप्रिल / प्रतिनिधी

अमेरिकेतील बे एरियामध्ये मराठी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचा ‘चैत्रधून’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. महाराष्ट्र मंडळ बे एरियाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाअंतर्गत गाण्यांची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत आबालवृद्धांसह सत्तर स्पर्धक सहभागी झाले होते.सहभागी स्पर्धकांनी या वेळी विविध मराठी गाणी सादर केली आणि त्याला उपस्थित रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र मंडळ बे एरियातर्फे गेल्या सहा वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सहभागी स्पर्धकांमधून अंतिम स्पर्धेसाठी चाळीस जणांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कवी प्रा. शंकर वैद्य यांनी काही कविता सादर केल्या. येत्या १० मे रोजी कार्यक्रमाची अंतिम फेरी सादर होणार आहे. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांचा ‘ओंजळीत स्वर तुझे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संदीप देवकुळे यांनी दिली.

डाव्यांच्या पाठिंब्याबाबत मनमोहन सिंग यांचे मौन
गुवाहाटी, २३ एप्रिल/पीटीआय

निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षांचा पाठिंबा घेण्यासंबंधीचा प्रश्न पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज उडवून लावला. ‘मला काहीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही’ एवढेच उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिले. मनमोहन सिंग यांनी आज आसाममधील गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातील दिसपूर येथे मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणुकीत कॉँग्रेसला घसघशीत बहुमत मिळेल आणि केंद्रात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉँग्रेसची अवस्था या वेळी कठीण आहे काय, या प्रश्नावर नकारार्थी उत्तर देऊन ते म्हणाले की, मी मुळीच तणावाखाली नाही. त्याआधी सकाळी येथे आलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग व त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर या दोघांनी थोडा वेळ रांगेत उभे राहून मतदान केले. ‘मला खूप आनंद झाला आहे’, अशी प्रतिक्रिया गुरुशरण कौर यांनी व्यक्त केली. या केंद्रावरील मतदारांची संख्या ११३८ असून, तेथे मतदान करणारे सिंग हे २५८ वे मतदार होते.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी