Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदानयंत्रे जमा होण्यास विलंब
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील ३ हजार ४४२ मतदान केंद्रांवरील मतदानयंत्रे जमा करण्यात निवडणूक यंत्रणेला

 

गुरुवारची संपूर्ण रात्र व आजचा (शुक्रवार) दिवसही घालवावा लागला. आज सायंकाळी साडेचार वाजता सर्व यंत्रे ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवून तिला सील ठोकण्यात आले.
जिल्ह्य़ातील १२ विधानसभा मतदारसंघांचे विस्तारलेले क्षेत्रफळ लक्षात घेता मतदानयंत्रे नगरला पोहोचण्यास मध्यरात्र होईल हे प्रशासनाने गृहित धरले होते. प्रत्यक्षात मात्र आज सकाळपर्यंत अकोले व त्या भागातील अन्य ठिकाणची मतदानयंत्रे नगरमध्ये पोहोचली नव्हती.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर त्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व यंत्रे जमा करून नगरमध्ये पोहोचवण्याची जबाबदारी होती. मतदारांनी मतदानासाठी सायंकाळी साडेचारनंतर ऊन उतरल्यावर रांगा लावण्यास सुरुवात केली. सायंकाळी ५ वाजता मतदान बंद होत असले, तरी त्यावेळेत केंद्रामध्ये आलेल्या सर्वाचे मतदान करून घेण्याचा नियम आहे.
त्यामुळेच बहुसंख्य मतदान केंद्रात सायंकाळी ५नंतरही बराच वेळ मतदान प्रक्रिया सुरू होती. नगरमधील भिंगार येथे तर सायंकाळी साडेसातपर्यंत मतदान सुरू होते. ऐनवेळी झालेल्या या गर्दीमुळे मतदान यंत्र जमा व्हायला तालुकास्तरावरच बराच उशीर झाला. परिणामी मतदानयंत्रे नगरमध्ये यायला आजची सकाळ उजाडली. त्यामुळे सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाची अंतिम आकडेवारी नगर मुख्यालयात देण्यासही उशीर झाला.
मतदानयंत्रे स्वीकारण्यासाठी एमआयडीसीतील सरकारी गोदामात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पी. अन्बलगन व शिर्डीचे निवडणूक निर्णय अधिकारी बी. आय. केंद्रे गुरुवारी रात्रीपासून गोदामात ठाण मांडून बसले होते. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, तसेच अन्य सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्यवस्थेचे नियंत्रण केले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील यंत्रे स्वीकारण्यासाठी स्वतंत्र अधिकारी, त्याला सहायक म्हणून अन्य कर्मचारी अशी व्यवस्था होती. सर्व यंत्रांची व्यवस्थित नोंदणी करून घेऊन ती काळजीपूर्वक ठेवण्यात येत होती. त्याचबरोबर झालेले एकूण मतदान, त्यात महिलांचे किती, पुरुषांचे किती, त्याची टक्केवारी हे आकडेमोडीचे कामही सुरू होते. आज सकाळी साडेअकरापर्यंत हे काम सुरू होते. सर्व यंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवून तिला सील लावण्यास चार वाजले.
या स्ट्राँग रूमचा दरवाजा आता थेट १६ मेपर्यंत असाच सील बंद राहील. स्ट्राँग रूमच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी, तसेच अन्य दलांचे जवानही २४ तास तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ातील दोन लोकसभा मतदारसंघातील ३२ उमेदवारांचे भवितव्य लपलेल्या या मतदानयंत्रांवर १६ मेपर्यंत ते ‘खडा पहारा’ करतील. दि. १६ला सकाळी ८ वाजता याच गोदामात मतमोजणी होणार आहे. मतदानयंत्रे खुली होऊन मतमोजणी सुरू होताच सकाळी ९ वाजता मतदारांचा कल व त्यानंतर तासाभरात कौलही समजेल.