Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

खिद्रापूरची स्त्री शिल्पं
पंचवीस वर्षांपूर्वी इथं अक्षरश उकिरडा होता. पण पुरातत्व खात्यानं लक्ष घातलं, म्हणून या मंदिराचं हे असं रूप आपण पाहू शकतो. रफिक उत्साहानं सांगत होता. रफिक हुपरीचा. कोल्हापूरजवळच्या गावचा कवी, लेखक, समीक्षक.

 

प्राध्यापकाची नोकरी आणि घरं बांधण्याचं आवडीचं काम मनापासून करणारा. बरोबरीनं मित्रत्वाचा लळा-जिव्हाळा सांभाळणारा, जोपासणारा. याआधी त्यानं अनेकदा अनेक मित्रांना हे क ोपेश्वराचं हरिहरेश्वरचं मंदिर दाखवायला आणलं होतं. पुन्हा पुन्हा बघताना त्याचं स्वतचं कुतूहल जरासंही कमी झालेलं नव्हतं. आता तर त्याला आवडणारे लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार त्याच्याबरोबर होते.
जिथं त्यानं आणलं होतं ते गाव कोल्हापूरपासून ५०-५५ किलोमीटर असलेलं खिद्रापूर आणि मंदिर होतं क ोपेश्वराचं. विलक्षण देखणं. याआधी अनेक मंदिरं, लेण्या, शिल्प पाहिली. पण हे मंदिर, त्यावर कोरलेली शिल्पं वेगळ्या प्रकारची आहेत. चैतन्य लेणं म्हणावीत अशी चैतन्यदायी, उत्सवी.
अशा पुरातन लेण्या पाहताना त्यातली पडझड, उद््ध्वस्तपणा पाहून उदास व्हायला होतं. इथं पडझड, मोडतोड, तुटलेपण, फुटलेपण आहेच, पण ते पाहताना नैराश्य नाही येत. याचं कारण या मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला कोरलेल्या शिल्पामधली रसरशीत जीवनेच्छा. टवटवीत ताजेपणा.
कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमाच्या परिसरात इ. स. ११०९ ते ११७८च्या दरम्यान शिलाहार राजांनी या मंदिराची निर्मिती केली. इ. स. १२१३मध्ये देवगिरीच्या दुसऱ्या सिंघणदेव यादवाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा आशयाचा शीलालेख या मंदिरात आहे. या मंदिरात एकूण नऊ शीलालेख आहेत. पैकी आठ कन्नड भाषेमध्ये असून, एक देवनागरी लिपीत संस्कृत भाषेत आहे.
स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळकक्ष व गर्भागार अशा चार विभागात मंदिराचा विस्तार आहे. स्वर्गमंडपातल्या काळ्या, गोलाकार रंगशीलेवरून वरच्या बाजूला पाहिले असता पूर्ण चंद्राकृती आकाश गवाक्ष अप्रतिम दिसते. या मंदिरातली सारी मानवी शिल्पे, पशु-पक्षी, देवदेवता, महिरपी, तोरणं, पानं-फुलं असं सारंच कोरीवकाम अतिशय नजाकतीनं केलेलं आहे. मानवी शिल्पांवर जसे विविध अलंकार कोरलेले आहेत, तसेच विविध अलंकार प्राण्यांच्या अंगावरदेखील
कोरलेले आहेत. मंदिराच्या आत-बाहेरची कलाकुसर बारकाव्यांसह केलेली आहे. पण हे सारं फार निवांतपणे बघायला हवं.
मंदिराचा इतिहास, भूगोल, धर्मानुबंध, वास्तूशास्त्रीय रचना, शिल्पांचा अभ्यास, अलंकारांची जडणघडण अशा कैक गोष्टी अभ्यासकांनी समजावून घेतल्या असतील. यापुढे आणखीही कोणी या कलाकृतींवर विस्तृत काम करेल. माहीत नाही. मला सर्वाधिक मोहून टाकलं ते मंदिराच्या बाहेरच्या बाजूला कोरलेल्या स्त्री-शिल्पांनी. मी पाहिलेली आतापर्यंतची सगळी स्त्री शिल्प नेमस्त, बंदिस्त अशी आहेत. अगदी
कोरल्यासारखीच. पण इथल्या शिल्पातल्या स्त्रिया मोकळ्या आहेत. उत्कट, आवाहक आहेत. कुठे दोनही हात डोक्याच्या वरच्या बाजूला पसरवून त्या मुक्तपणे, सैलसर विसावल्या आहेत. कुठे एक हात कमरेवर, तर दुसरा डोक्यामागे घेऊन निवांतपणे उभ्या आहेत. कुठे नुसतीच मान कलती केलेली आहे. अगदी सहज, स्वाभाविक. कुठे नुसत्याच डौलदार, दिमाखदारपणे उभ्या आहेत. अशी अनेक स्त्री शिल्प मंदिराच्या आतही आहेत. घडीव, घोटीव आकार. अशी मनमुराद, लडिवाळ, विमुक्त स्त्री शिल्प माझ्यासाठी अपरिचित, अनोखी होती.
ही शिल्प केसांपासून पायापर्यंत वेगवेगळ्या अलंकारांनी मढलेली आहेत. अनेकदा या अलंकारांचंही ओझं चढवल्यासारखं, लादल्यासारखं वाटतं. इथं कोण कोणाला अलंकृत करतंय असा प्रश्न पडतो.
पाठमोऱ्या स्त्रीचं शिल्प पहिल्यांदाच मी इथं पाहिलं. पाठमोरी, मान वळवलेली, भरगच्च अंबाडय़ाची, एक पाय पोटरीवर ठेवून उभी असलेली पूर्ण पौर्णिमा. अनेक शतकानंतरही शिल्पांवरची झळाळी, चकाकी कायम आहे. त्यांचं नितळ मुलायमपण अगदी नजरेलासुद्धा जाणवतं. शिल्पांच्या गुळगुळीत, मऊशार गोलाईतून ओज आणि तेज झिरपतंय की काय असा भास होतो.
या साऱ्यांपेक्षा अधिक वेधक अशी एक गोष्ट या स्त्री-शिल्पांमध्ये आहे. ती म्हणजे समरसून जगल्यानंतर अनुभवाला येणारी गाढ तृप्ती. बहुधा ही तृप्ती हेच या शिल्पांमधलं सळसळतं चैतन्य असावं.
ही शिल्प पाहताना, आठवताना मनाशी सतत येत राहिलं स्त्रीचं असं असणं हा त्या शिल्पकाराच्या कल्पनेचा आविष्कार असेल का? स्त्रीला खरोखर असं यथेच्छ, मुक्त, मनमुराद, तृप्त असता येतं?