Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदानाची अंतिम आकडेवारी
‘नगर’मध्ये ५२.०६, तर ‘शिर्डी’त ५०.४२ टक्के
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत मिळून ५१.३० टक्के मतदान झाले. नगरमध्ये

 

५२.०६ टक्के, तर शिर्डीत ५०.४२ टक्के मतदान झाले. शिर्डी मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४७.५५ टक्के संगमनेरमध्ये, तर सर्वात जास्त म्हणजे ५३.५३ टक्के शिर्डीत झाले. नगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ४०.०२ टक्के नगर शहरात, तर सर्वात जास्त ५८.२२ टक्के शेवगावमध्ये झाले.
जिल्ह्य़ातील २८ लाख २५ हजार ८६६पैकी १४ लाख ४९ हजार ६३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल १३ लाख ७६ हजार २३५ नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी घटली.
नगर मतदारसंघात १५ लाख १० हजार २९८ मतदार होते. त्यापैकी ७ लाख ८६ हजार ३१४ मतदान झाले. ७ लाख २३ हजार ९८४जणांनी ‘मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य’ हा प्रचार लक्षात न घेता मतदान करणे टाळले.
शिर्डी मतदारसंघात १३ लाख १५ हजार ५६८ मतदार होते. त्यापैकी ६ लाख ६३ हजार ३१७जणांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. निम्म्यापेक्षा थोडेच कमी म्हणजे तब्बल ६ लाख ५२ हजार २५१जणांनी मतदानाकडे पाठ फिरवली. या मतदारसंघात ५०.४२ टक्के मतदान झाले.
मतदारांसाठीच्या ओळखपत्राच्या नियमातील संदिग्धतेमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली, असा आरोप राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. याबाबतचे बदललेले आदेश मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेच नाहीत व त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले, असे सांगण्यात येते.
प्रशासनाकडून मात्र याबाबत वेगळाच दावा करण्यात येत आहे. मतदानाची जिल्ह्य़ाची एरवीची टक्केवारी ५५ ते ६० टक्क्य़ांदरम्यानच असते. या वेळी ५० टक्के मतदान झाले. बोगस मतदानाला कडक आळा बसल्यामुळे ५ ते १० टक्के कमी मतदान झाले, असे निवडणूक यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. मतदाराची ओळख कशी व किती प्रकारे पटवायची, याबाबत मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना होत्या. त्यामुळेच एक अपवाद वगळता जिल्ह्य़ात इतरत्र कुठेही बनावट मतदान झाले नाही, असे बहुसंख्य अधिकाऱ्यांचे मत आहे.
नगर मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांची झालेल्या मतदानाची आकडेवारी याप्रमाणे - (कंसात एकूण मतदार)
शेवगाव (२,७१,५०८) १,५८,०६२ - ५८.२२ टक्के;
राहुरी (२,३१,१०८), २,२९,३०० - ५५.९५ टक्के;
पारनेर (२,४९,४०८), १,३३,८३३ - ५३.६६ टक्के;
नगर शहर (२,५२,०११), १,००,८५० - ४०.०२ टक्के;
श्रीगोंदे (२,५१,८२६), १,३५,४४४ - ५३.७८ टक्के;
कर्जत-जामखेड (२,५४,४३७), १,२८,८२५ - ५०.६३ टक्के.
शिर्डीमधील विधानसभा मतदारसंघनिहाय मतांची आकडेवारी याप्रमाणे
- (कंसात एकूण मतदार)
अकोले (२,०३,२१०), ९८,१८० - ४८.३१ टक्के;
संगमनेर (२,२२,०८३), १,०५,५९५ - ४७.५५ टक्के;
शिर्डी (२,०९,०४३), १,११,८९१ - ५३.५३ टक्के;
कोपरगाव (२,२१,०५६), १,१८,१७९ - ५३.४६ टक्के;
श्रीरामपूर (२,३९,९३६), १,१९,९०४ - ४९.९७ टक्के;
नेवासे (२,२०,२४०), १,०९,५६८ - ४९.७५ टक्के.