Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी गजाआड
एअरगन, तलवार जप्त; काही मुद्देमाल हस्तगत
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

सहा तरुणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सायंकाळी जेरबंद केले. या

 

टोळीकडून एअरगन, तलवार, चाकू, लोखंडी गज व मिरचीची भुकटी जप्त करण्यात आली. मध्यंतरी शहरातील व्यापाऱ्यांना लुटण्याच्या काही घटना घडल्या. त्यात हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नगर-पाथर्डी रस्त्यावर चांदबिबी महालाजवळ काही तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे धाव घेतली. पोलिसांना पाहताच ते पळू लागले. तथापि, पोलिसांनी त्यांना पकडले. दीपक दत्तात्रेय जावळे (२८ वर्षे, रा. जावळेवाडी, पोखर्डी शिवार), अभी ऊर्फ अभय भास्कर पोरे (२९ वर्षे, रा. दातरंगे मळा, नालेगाव), विजय सर्जेराव बडे (२२ वर्षे, रा. बालाजी कॉलनी, केडगाव), अशोक सदाशिव वनवे (३३ वर्षे, रा. केडगाव), अमित आनंद उजागरे (२१ वर्षे, रा. विराटचाळ, धूत शोरूमच्या मागे), राजू राममरून मोरय्या (रा. मातोश्री धाब्यासमोर, चास, ता. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या आरोपींनी काही व्यापाऱ्यांना लुटल्याची कबुली दिली असून, लुटीची काही रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. आणखी काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक राजपूत यांनी व्यक्त केली. या तरुणांचे आणखी काही साथीदार असण्याची शक्यता आहे.
आरोपींकडून तलवार, चाकू, एअरगन, मिरची पावडर, लोखंडी गज, नायलॉन दोरी व तीन मोटरसायकली, ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. आरोपींनी भिंगारमधील धनंजय दिगंबर जोशी (रा. औसरकर मळा), एमआयडीसी हद्दीतील बन्सी तेजभान कंत्रोड (रा. तारकपूर), कोतवाली हद्दीतील सागर शशिकांत गांधी (रा. खिस्तगल्ली) व लक्ष्मण खासेराव रणसिंग यांना लुटल्याची कबुली दिली. गांधी यांना परवाच लुटण्यात आले होते. गांधी यांची पिशवी, दुकानातील पावत्या पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केल्या.
दीपक जावळे हा या टोळीचा म्होरक्या असून, तो व टोळीतील इतर काही साथीदार पूर्वी जकात नाक्यावर काम करीत. त्यानंतर ते जकातीच्या बनावट पावत्या दाखवून मालमोटारचालकांकडून बळजबरीने जकात वसूल करायचे. त्यातूनच जावळे याच्या डोक्यात व्यापाऱ्यांना लुटण्याची शक्कल आली. विजय बडे व नंतर राजू मोरय्या या भंगारवाल्या व्यापाऱ्याशी त्याची ओळख झाली. टोळीत पोरे, बडे, वनवे, उजागरे सामील झाले व व्यापाऱ्यांना लुटू
लागले.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक राजपूत, उपनिरीक्षक गोविंद आधटराव, पोलीस जाकीर शेख, राजू सावंत, सुनील चव्हाण, दीपक हराळ, अरुण घोडके, गणेश धुमाळ, रायकवाड, राजू वाघ, अर्जुन दहिफळे, जाकीर कुरेशी, रक्ताटे, भांडे यांच्या पथकाने कारवाई केली.