Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गुटखाप्रकरणी धारिवाल कंपनीसह विक्रेता निर्दोष
अकरा वर्षांनंतर निकाल
श्रीगोंदे, २४ एप्रिल/वार्ताहर

माणिकचंद गुटखा तयार करताना अथवा वितरित करताना त्यात मॅग्नेशियम काबरेनेट हा

 

आक्षेपार्ह घटक स्वतंत्रपणे मिसळला. तसेच त्यापासून शरीरास काही अपाय होऊ शकतो, या दोन्ही बाबी सिद्ध न झाल्याने आज येथील न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी धारिवाल टोबॅको प्रोडक्ट, घोडनदी या कंपनीला विक्रेत्यासह क्लीन चिट देत निर्दोष ठरविले. न्यायालयाने ११ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आज दिला.
या घटनेची पाश्र्वभूमी अशी - नगर येथील तत्कालीन अन्न निरीक्षक एस. बी. जानकर यांनी ३० ऑगस्ट १९९७ रोजी येथील कासारगल्लीतील राजेंद्र मनसुखलाल मुनोत या माणिकचंद गुटखा विक्रेत्याच्या दुकानावर छापा टाकून गुटखा जप्त केला होता. या गुटख्यात शरीराला अपाय करणारा मॅग्नेशियम काबरेनेट हा घटक असल्याचा दावा करून हा गुटखा जानकर यांनी पुणे येथील सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला. प्रयोगशाळेतील अहवालानुसार या गुटख्यात १.९३ टक्के आक्षेपार्ह असणारा मॅग्नेशियम काबरेनेट हा घटक आढळल्याने येथील न्यायालयात १९९८मध्ये विक्रेता मुनोत, रामनाथ दायमा (मॅनेजर) व धारिवाल टोबॅको प्रोडक्ट लि. या कंपनीविरुद्ध अन्न व भेसळ प्रतिबंधक नियम ६२ व कायदा कलम ७प्रमाणे फिर्याद दाखल केली.
न्यायालयाने या प्रकरणी जानकर यांच्यासह अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त सुधाकर बुगे, तसेच पंच भिकू लोंढे हे साक्षीदार तपासले. आरोपींच्या वतीने वकील मदनंत फडणीस, संग्राम देशमुख, दीपाली बोरुडे यांनी युक्तिवाद केला की, गुटखा तयार करताना कात, सुपारी, तंबाखू व चुना हे घटक वापरले जातात. मात्र, मॅग्नेशियम काबरेनेट हा आक्षेपार्ह असणारा घटक त्यात नैसर्गिकरित्या मिळून येतो. त्यात तो कंपनी मिश्रित करीत नाही अथवा विक्रेताही मिसळत नाही. याशिवाय हा गुटखा तयार करताना नियमानुसार सरकारी पवाना घेऊन त्यांच्या अटी व शर्तीचे पालन केले जाते. त्यामुळे कुठल्याही बाबींचे उल्लंघन विक्रेता, कंपनीने केले नाही.
फिर्यादी जानकर व सरकारी वकील परोपकारी यांनी बाजू मांडली. पण मॅग्नेशियम काबरेनेट हा घटक स्वतंत्रपणे गुटख्यात मिसळला किंवा त्यापासून शरीरास काही अपाय होऊ शकतो, या बाबी ते सिद्ध करू न शकल्याने गव्हाणे यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.