Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साठ वर्षांपासून पाण्यासाठी दाहीदिशा..
आदिवासी महिलांची व्यथा
अकोले, २४ एप्रिल/वार्ताहर

स्त्रियांनी शेतीच्या कामावर जायचं आणि पुरुषांनी दिवसभर पाणी वहायचं. दर उन्हाळ्यात हीच

 

स्थिती. आयुष्यभर हेच करत आलोय. धुपे गावातील एक आदिवासी कार्यकर्ता सांगत होता. दिवसभर पाणी वहायचं एवढंच काम. कौटेवाडीचे गावकरी सांगत होते. माझं वय ६५. आठवतं तेव्हापासून असंच आहे. एका महिलेने पुरुषांच्या म्हणण्यास पुष्टी देत सांगितले.
अकोले तालुक्यात सरहद्दीलगत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अनेक लहान-मोठय़ा गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पुणे-नाशिक महामार्गापासून हाकेच्या अंतरावर, बाळेश्वराच्या डोंगररांगांत आदिवासींच्या वाडय़ा-वस्त्या आहेत. पाणीटंचाईबरोबरच रोजगार, आरोग्य, शेतीला पाणी अशाही त्यांच्या समस्या आहेत. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील हा भाग माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अकोले मतदारसंघात येतो. दोन मंत्र्यांशी संबंधित असूनही हा भाग अजूनही अनेक बाबतीत मागास व अविकसित. ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’, अशी या भागाची स्थिती. एक गाव व चार वाडय़ांमधील गावकऱ्यांनी पाणीप्रश्नावर लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकला. प्रश्न न सुटल्यास सात-आठ गावांतील गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
पठारावरील जवळे बाळेश्वर हे प्रमुख गाव. या गावाला बारा वाडय़ा आहेत. सर्वच वाडय़ांना दर वर्षी उन्हाळ्यात कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. कौटेवाडी, मामेखेलवाडी, चंदनवाडी, पट्टेवाडी या वाडय़ांच्या बाबतीत ही समस्या जास्तच तीव्र आहे. सध्या पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना सहा-सात किलोमीटरची पायपीट करावी लागते. गावाजवळच्या फुलदरीत तलावाचं काम दहा वर्षांपासून बंद आहे. या तलावाखाली विहीर घेऊन पाणीयोजनेचे काम हाती घेण्यात आले. पण तलाव होत नाही, तोपर्यंत विहिरीला पाणी कसे टिकणार, हा गावकऱ्यांचा सवाल. गावकऱ्यांना समजते ते लाखो रुपयांच्या योजना आखणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही.
दहा वर्षे झाली तळं बंद पडलं. या वाडीजवळही तलावासाठी योग्य जागा आहे. किती वेळा मोजणी झाली? मोजून जातात. नंतर मतदानाच्या ‘टायमा’ला उगवतात. पाणी नाही, रस्ते नाही अशा व्यथा महिला सांगत होत्या. जवळे बाळेश्वरला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, पण केंद्रात डॉक्टर व कर्मचारी सोयीप्रमाणे येतात. तक्रार केली तर रुग्णाकडे दुर्लक्ष करतात, असेही येथील लोकांनी निदर्शनास आणून दिले.
धुपे गावाचीही हीच स्थिती. तेथील लोकांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणीटंचाईमुळे मुकी जनावरे तहानलेली असतात. गावात तलाव होण्यासाठी कृषिमंत्री थोरातांना लोक भेटले. मात्र, ते वनजमिनीची अडचण सांगत असल्याची तक्रार आहे. ६१ वर्षांनंतरही पिण्याचा पाणीप्रश्न सुटत नसल्याबद्दल आदिवासींनी खंत व्यक्त केली.