Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘भूजल’ने प्रस्ताव सादर न केल्याने २ कोटी पडून दिरंगाईबद्दल अधिकाऱ्यांना खडसावले
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना उपाययोजनांबाबत भूजल सर्वेक्षण विभागाने

 

चालवलेल्या टोलवाटोलवीबद्दल विभागाच्या अधिकाऱ्यांना आज जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत धारेवर धरण्यात आले. शिवकालीन पाणीयोजनेचा सुमारे २ कोटींचा निधी पडून असताना प्रस्ताव सादर करण्यात केलेल्या दिरंगाईबद्दल त्यांना खडसावण्यात आले.
समितीची सभा आज जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती बाळासाहेब गिरमकर, पांडुरंग खेडकर, सुरेखा मेंगाळ, सदस्य अर्जुन शिरसाट, गोपाळराव झोडगे, सोमनाथ धूत, हर्षदा काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव करपे आदी या वेळी उपस्थित होते.
पाणीटंचाईबाबतच्या उपाययोजनांबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून टोलवाटोलवी करण्यात आली. प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याचे उत्तर मिळाल्याने सभेत त्यांना पाचारण करण्यात आले. विभागाकडून सुरुवातीला आचारसंहितेचे कारण देण्यात आले. शिवकालीन पाणीयोजनेच्या प्रस्तावांची माहिती अधिकारी सादर करू शकले नाहीत. १४० प्रस्तावांपैकी कितीचे आराखडे तयार करण्यात आले, मंजुरी कशाला मिळाली, याची माहितीही ते देऊ शकले नाहीत. मागील सभेत आर्वी गावातील (ता. श्रीगोंदे) दूषित पाण्याचा नमुना सादर झाला. तेथील ग्रामपंचायतीने लोकवर्गणी जमा केली, परंतु प्रस्तावास अद्याप मान्यता दिली गेली नाही. जिल्ह्य़ात जूनअखेर २४६ गावांना टंचाईची झळ बसेल. मात्र, त्यातील ९२ गावांचेच सर्वेक्षण पूर्ण झाले. शिवकालीन पाणीयोजनेसाठी दोन वर्षांपूर्वी २ कोटी रुपये मिळाले, मात्र प्रस्तावच तयार केले गेले नाहीत.
सभेत या बाबी स्पष्ट झाल्याने ‘भूजल’च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अधिकारी गावपातळीवर संपर्क ठेवत नसल्याबद्दल श्रीमती विखे यांनी नाराजी व्यक्त केली.
पाणीपुरवठा योजनांसाठी सरकारने जि. प.ला ५ कोटी २० लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. थकित वीजबिलापोटी पाणीयोजनांचे वीजजोड तोडले जात असल्याने या निधीतून वीजबिल भरण्याचा व त्यासाठी निधी गटविकास अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्य़ात सध्या १८ गावे व ३२ वाडय़ांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तसेच १२ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.