Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विजयी कोण होणार याबाबत चर्चा अन् पैजाही..
राहुरी, २४ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाल्यावर कोण विजयी होणार याची चर्चा सुरू झाली

 

आहे. पैजाही लावल्या जात आहेत. प्रत्येक पक्षाचा समर्थक विजयाचा दावा करतो आहे.
नगर मतदारसंघात सर्वाधिक ५५ टक्के मतदान झाले. या विषयीही तर्क-वितर्क लढविले जात आहेत. माजी आमदार प्रसाद तनपुरे व कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या पाठिशी ताकद उभी केली. नगरपालिका कार्यक्षेत्रातून श्री. कर्डिले यांना आघाडी मिळेल असा दावा केला जात आहे, तर दुपारी तीनपर्यंत झालेल्या मतदानात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिलीप गांधी यांना पसंती मिळाल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
प्रसाद तनपुरे, रामदास धुमाळ, शिवाजी गाडे, भाजप-सेनेचे कार्यकर्ते यांनी झटून काम केले. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिल्याने मतदारांमध्ये त्यांनी उत्साह आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुरीत ५५ टक्के मतदान झाले.
तालुक्यात ‘विखे फॅक्टर’चीही जोरदार चर्चा आहे. शिर्डी मतदारसंघात तालुक्यातील ३२ गावांचा समावेश होता. तेथेही ‘विखे फॅक्टर’चा करिष्मा दृष्टीपथास पडण्याचे कार्यकर्ते सांगतात. श्री. धुमाळ वगळता त्यांच्या विकास मंडळात फुट पडली होती. धुमाळांनी इमाने इतबारे काम केले. नगर जिल्ह्य़ामध्ये राहुरी तालुक्यानेच सर्वाधिक मतदान केले. यात कोण आघाडी घेतो, याविषयी बाजारपेठेत, चौकाचौकांत, कटय़ावर चर्चा रंगत आहेत. चर्चेत विखे फॅक्टर मात्र केंद्रस्थानी आहे. अपक्ष उमेदवार राजीव राजळे कितव्या नंबरवर राहतील, याचीही उत्सुकता निर्माण झाली. पूर्वेकडील डोंगर भागाच्या काही गावांमध्ये नारळाचा प्रभाव जाणवण्याचे कार्यकर्ते नमूद करतात. मत विभागणी कोणाला मारक ठरते याचेही आराखडे बांधले जात आहेत. मतमोजणीस आणखी तेवीस दिवसांचा कालावधी असल्याने तोपर्यंत अफवा व चर्चेला ऊत येईल. काही व्यापाऱ्यांनी राजकारणावर चर्चा करू नये, असा फलकच लावून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.