Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

तलाव कोरडे पडल्याने जामखेडमध्ये पाणीटंचाई
जामखेड, २४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील दहापैकी चार लघुपाटबंधारे तलावांनी तळ गाठला असून, या तलावांमधील

 

उपयुक्त पाणीसाठा संपला आहे, तर उर्वरित सहा तलावांमध्ये साधारण २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. खासगी विहिरी अधिगृहित करून पाणीपुरवठा करावा लागेल. सध्या दोन विहिरी अधिगृहीत केल्या आहेत.
तालुक्यात या वर्षी सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, कडक उन्हाळा आणि शेतीसाठी होणाऱ्या बेसुमार उपशामुळे सर्वच तलावांच्या पाणीपातळीत मोठय़ा प्रमाणात घट आली. रत्नापूर, जवळके, धोत्री व तेलंगशी या तलावांनी तळ गाठला आहे. पैकी तेलंगशी तलाव यावर्षीच्या पावसात पूर्ण क्षमतने भरला नव्हता. त्याची क्षमता ३७.९९ दशलक्ष घनफूट आहे. धोत्री ५९.५० दशलक्ष घनफूट, रत्नापूर ८३.६४ दशलक्ष घनफूट, जवळकेची ३६.१९ दशलक्ष घनफूट क्षमता आहे.
खैरी मध्यम प्रकल्पाची क्षमता ५३३.६० दशलक्ष घनफूट आहे. आज मात्र या प्रकल्पात २२२.७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. तलावांची क्षमता (कंसात सध्याचा पाणीसाठा) खालीलप्रमाणे (आकडे दशलक्ष घनफूटमध्ये) - भुतवडा १०८ दशलक्ष घनफूट (५८.५७), मोहरी ६२.५० (१४.७०), धोंडपारगाव ८७.९४ (२३.९२), नायगाव - ८३.७६ (२६.७५), पिंपळगाव आळवा १००.४९ (२०.१४). तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. आमदार सदाशिव लोखंडे यांच्या दिघोळ व माळेवाडीला विहीर अधिगृहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. याबरोबरच तालुक्यातील अन्य काही गावांनाही विहिरी अधिगृहण करून पाणीपुरवठा करावा लागणार आहे, अशी स्थिती आहे.