Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शेवगावला पाच दिवसांआड पाणीपुरवठा
शेवगाव, २४ एप्रिल/वार्ताहर

भर उन्हाळ्यात शहराला पाच-सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त

 

भावना व्यक्त होत आहेत. काही भागात भरपूर पाणी, तर काही भाग पाण्यापासून वंचित असेच येथील चित्र आहे.
ताजनापूर येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयातून शेवगावसह पाथर्डी शहर व इतर ४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. ताजनापूर येथील विहिरीवर अडीचशे अश्वशक्तीचे दोन उपसापंप असून, या पंपांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी घोटण वीज उपकेंद्रातून एक्सप्रेस वीजवाहिन्यांद्वारे वीजपुरवठा केला जातो. उपसा केलेले पाणी खंडोबामाळावरील जलशुद्धीकरण केंद्रात सोडून पुढे हे पाणी शेवगाव-पाथर्डी व इतर गावांना पुरविले जाते.या योजनेतून उचललेले पाणी पुढे दिवसाआड पाथर्डी शहरास मिळते. परंतु शेवगावकरांच्या नशिबात हे भाग्य नाही. ही योजना जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. शेवगावला पाणी वितरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. या दोन्ही यंत्रणा पाणीटंचाईस आम्ही जबाबदार नाही म्हणून एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु ग्रामस्थांना दरदिवशी तर नाहीच, पण दोन-तीन दिवसांनीही पाणीपुरवठा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शेवगावला पाणीपुरवठा करण्यासाठी गावात व शास्त्रीनगर परिसरात दोन मोठे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ आम्ही दररोज भरून देतो, अशी भूमिका योजना चालवणाऱ्यांची आहे. पाणी कमी येते, अशी ग्रामपंचायत प्रशासनाची तक्रार आहे. या दोन्ही बाजूंच्या कातडी बचाव धोरणाने व या दोन्ही यंत्रणांवर नियंत्रण करणारी कोणतीच यंत्रणा नसल्याने हे सारे घडत असून नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. पाणी मुरते कोठे, हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेवगाव ग्रामपंचायतीकडे पाणीवाटपाचे कोणतेही वेळापत्रक नाही. परिणामी पाणी केव्हा व कोणत्या वेळी येणार, हे कोणताही नागरिक सांगू शकणार नाही. काही तांत्रिक कारणेही पाणीटंचाईला कारणीभूत आहेत. ३०-३५ वर्षांपूर्वीच्या जुनाट जलवाहिन्या, बेकायदा नळजोड, धनदांडग्यांनी मुख्य जलवाहिन्यां-वरून घेतलेले नळजोड यामुळे शेवगावच्या पाणीपुरवठय़ाचे वाटोळे झाले आहे.