Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

सरकारी कार्यालयांत शुकशुकाट
राहुरी, २४ एप्रिल/वार्ताहर

सरकारी अधिकारी निवडणुकीच्या प्रक्रियेतून आजही मुक्त न झाल्याने बहुतांश कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
काल (गुरुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतदान यंत्रे नगरला नेण्यात आली.

 

येथील सर्व यंत्रे आज पहाटे चार वाजता रवाना झाली. दुपारपर्यंत एकाही कार्यालयातील संबंधित अधिकारी उपस्थित नव्हते. चौकशीअंती नगर येथे मतदान यंत्रे जमा करण्यासाठी अधिकारी गेल्याचे सांगण्यात आले. उद्या (शनिवारी) चौथा शनिवार असल्याने व रविवारी सुट्टी असल्याने अनेकांची सरकारी स्तरावरील कामे खोळंबली. सलग चार दिवसांचा कालावधी गेल्याने महत्त्वाची कामे रखडली.
मतदान संपल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असणारे काही अधिकारी व कर्मचारी रात्री १२पर्यंत राहुरी बसस्थानकावर ताटकळत उभे होते. घरी जाण्यासाठी त्यांना इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. अधिकारी व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एस. टी. बसचा वापर करण्यात आला. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी बसची कमतरता भासली. २८८ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे जमा करून घेण्यासाठी पहाटेचे चार वाजले. त्यानंतर ही यंत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या-नंतर अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.