Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बुक स्टॉल्समध्ये मुलांची गर्दी
कोपरगाव, २४ एप्रिल/वार्ताहर

उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने बालगोपाळ मंडळी विविध खेळांमध्ये, शिबिरांमध्ये, तसेच

 

विविध गोष्टींची पुस्तके वाचण्यात रममाण झाली आहेत. मुलांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालक त्यांना विविध पुस्तके आणून देत आहेत. बुक स्टॉल्समध्ये सध्या छोटय़ांबरोबर मोठय़ांचीही गर्दी आहे. या मुलांचा जादूची पुस्तके वाचण्यावर अधिक भर आहे.
मुलांवर सुसंस्कार व्हावे, गोष्टीरुपी पुस्तके वाचून ज्ञानात भर पडावी, म्हणून गांधी चौकातील यशवंत बुक स्टॉलचे मालक प्रकाश ठोंबरे व पराग ठोंबरे यांनी विविध पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने चतुर बिरबलाच्या गोष्टी, रामायण-महाभारताच्या गोष्टी, चांदोबा, चंपक, इंग्रजी-मराठी भाषेतील पंचतंत्रांच्या गोष्टी, इसापनीति, शेख चिल्ली, तेनालीरामा, गुलबकावली, एक होता राजहंस, चटकदार जोक्स, अमृत चाचा चौधरी, आलम आरा, बगदादचा जादूगार, वंदना आणि जादूचा हंडा, रामू हत्तीची गोष्ट, जादूची पुंगी, कलेची करामत, पाच जादूगार भाऊ, जादूची टेकडी या पुस्तकांबरोबरच थोरा-मोठय़ांच्या चरित्राचाही समावेश आहे.
अगदी तीन रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत विक्री किंमत असलेली ही पुस्तके मुले सहजासहजी खरेदी करतात.
लहान मुलांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी, विविध कार्यक्रमाप्रसंगी अशा पुस्तकांची भेट देणे आई-वडिल पसंत करतात, असे श्री. ठोंबरे म्हणाले.