Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘खरिपासाठी मुबलक खते उपलब्ध करा’
शेवगाव, २४ एप्रिल/वार्ताहर

येत्या खरीप हंगामाचे वेध शेतकऱ्यांना लागले असून, यंदा सरकारने सर्व प्रकारची खते

 

उपलब्ध करून द्यावीत व खतांचा संभाव्य काळाबाजार रोखावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्यात कपाशीचे क्षेत्र वाढल्याने खरीप हंगामात डी. ए. पी., १०:२६:२६, पोटॅश, युरिया इत्यादी खतांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. तालुका खरेदी-विक्री संघ ही सहकारी संस्था वगळता खासगी क्षेत्रांत कृत्रिम खतटंचाई निर्माण करून खतांचा प्रचंड काळाबाजार होतो, शेतकऱ्यांची लूट होते. मात्र, सरकार यंत्रणांकडून या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न होत नाही, असाच अनुभव आजवर येत आहे.
खरीप हंगामात तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव, शेवगाव इत्यादी भागात व काही ग्रामीण भागात खेडय़ापाडय़ातून हलक्या प्रतीचे व बनावट कंपन्यांचे खत विकले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. ठोक व्यापाऱ्यांकडून खते घेऊन ग्रामीण भागात एका गोणीमागे दोनशे-तीनशे रुपये जादा आकारून खते विकण्याचा धंदा दर वर्षी तेजीत आहे. मात्र, गरजू शेतकऱ्यांना कोणताही पर्याय त्या काळात नसतो.
शेवगावातील अनेक खासगी व्यापारी खते विकताना इतर वस्तू-बियाणे, औषधे घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना करतात. तसेच गावाबाहेर खतांचा साठा करून प्रत्यक्ष दुकानात खते ठेवली जात नाहीत. ठरावीक बडय़ा शेतकऱ्यांना मात्र भरपूर खतांचा पुरवठा होतो, असेही प्रकार सर्रास घडतात.
तालुका कृषी खाते व पंचायत समितीचा कृषी विभाग खतांच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यास असमर्थ ठरल्याचे दिसते. उलट या खात्यांकडे तक्रार केल्यास त्याची खबर काळाबाजार करणाऱ्यास त्वरित होते, असेही अनुभव शेतकऱ्यांना आहेत. मागील वर्षी आखेगाव-खरडगाव येथील शेतकऱ्यांनी काळ्याबाजारातील खतांचे टेम्पो शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. असेच प्रकार यंदाही घडण्याची स्पष्ट शक्यता ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.