Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मतदानाबाबत महिला उदासीन नगर शहरात नीचांक
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

जिल्ह्य़ाच्या दोन्ही मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी मतदानात लक्षणीय

 

उदासीनता दाखवली. महिलांच्या मतदानाची टक्केवारी शिर्डीत ४४.३५, तर नगरमध्ये ४६.७० टक्के इतकी म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी आहे.
जिल्ह्य़ात एकूण १३ लाख ६५ हजार २९७ महिला मतदार आहेत. त्यापैकी तब्बल ७ लाख ४२ हजार ७५८ महिला मतदान केंद्राकडे फिरकल्या नाहीत. फक्त ६ लाख २२ हजार ५३९ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
दोन्ही मतदारसंघात महिला मतदानाची सर्वात नीचांकी टक्केवारी जिल्ह्य़ाचे प्रमुख ठिकाण असलेल्या नगर शहरात आहे. शहरातील १ लाख २० हजार ३२० पैकी फक्त ४२ हजार २४३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तब्बल ७८ हजार ७७ महिलांनी मतदानाच्या हक्काकडे दुर्लक्ष केले. शहराचे ठिकाण असल्याने यापैकी बहुसंख्य महिला साक्षर असण्याची शक्यता आहे. त्या तुलनेत दोन्ही मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या महिला मतदारांनी मतदानात उल्लेखनीय नसला, तरी बऱ्यापैकी भाग घेतला आहे हे विशेष!
नगर मतदारसंघातील महिला मतदानाची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी याप्रमाणे - कंसात महिला मतदारांची एकूण संख्या शेवगाव (१,३१,२३५) ७०,४५५, ५३.६९ टक्के; राहुरी (१,०९,६४४) ५५,८६८, ५०.९५ टक्के; पारनेर (१,२१,४४२) ५८,८४७, ४८.४६ टक्के; श्रीगोंदे (१,२२,१५०) ५६,६१५, ४६.३५ टक्के; कर्जत-जामखेड (१,२१,१८२), ५४,९६७, ४५.३६ टक्के.
शिर्डी मतदारसंघातील महिला मतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी याप्रमाणे - कंसात एकूण महिला मतदार - अकोले (९८,८१०) ४२,०४४, ४२.५५ टक्के; संगमनेर (१,०८,७२२) ४४८५४, ४१.२६ टक्के. शिर्डी (१,०१,५५४) ४८,४७९, ४७.७४ टक्के. कोपरगाव (१,०७,७७९) ५२,६१६, ४८.८२
टक्के. श्रीरामपूर (१,१६,७२६) ५१,१९३, ४३.८६ टक्के. नेवासे (१,०५,७३३) ४४,३५८, ४१.९५ टक्के.
राजकीय पक्षात बहुतेकांच्या महिला आघाडय़ा असून, त्या राजकारणात सक्रिय आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही सर्वच पक्षांच्या महिला आघाडय़ा प्रचारात उतरल्या होत्या. अपक्ष उमेदवारांच्या, तसेच अन्य पक्षीय उमेदवारांच्या सौभाग्यवतींनीही प्रचारात उडी घेतली होती. मात्र, महिला मतदारांना मोठय़ा प्रमाणात मतदानाकडे वळविण्यात त्यांना अपयश आल्याचे आकडेवारीवरून दिसते.