Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लढतीची सुरुवात चांगली करा..
युवा ग्रँडमास्टर प्रथमेशचा सल्ला
नगर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

लढतीची सुरुवात चांगली व पक्की करा. सरावासाठी पुस्तकांबरोबरच संगणकाचाही वापर

 

करा. जास्तीत जास्त स्पर्धा खेळा, अशा काही महत्त्वाच्या सूचना युवा ग्रँडमास्टर प्रथमेश मोकळ याने नगरच्या नवोदित बुद्धिबळ खेळाडूंना दिल्या.
येथील डीएलबी संस्थेच्या वतीने आयोजित तीनदिवसीय बुद्धिबळ महोत्सवास आज कोर्टगल्लीतील सुयोग मंगल कार्यालयात सुरुवात झाली. त्या वेळी प्रथमेश बोलत होता. या महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला असून, राज्यभरातील तब्बल १८० बुद्धिबळपटू येथे दाखल झाले आहेत.
स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अग्रमानांकित खेळाडूस बोलावून नगरच्या नवोदितांना मार्गदर्शन घडवण्याची परंपरा संस्थेने सुरू केली आहे.
प्रथमेश याने सांगितले की, बुद्धिबळामुळे अधोगती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट शैक्षणिक प्रगतीच होते. मी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होत आलो याचे रहस्य बुद्धिबळात आहे. चांगला खेळाडू तयार करायचा, तर पालकांनीही लक्ष द्यायला हवे. माझे वडील बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यामुळे घरात खेळ रूजला. आम्ही भाऊ-बहीण बुद्धिबळात चांगली कामगिरी करू शकलो. बुद्धिबळातून एकाग्रता व निर्णयक्षमतेत वाढ होते.
स्पधार्ंमुळे विविध खेळाडूंशी खेळण्याचा सराव होतो, असे सांगताना प्रथमेशने नवोदितांसाठी नगरला येऊन मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली.
स्पर्धेची सुरुवात उद्योजक सीमा धाडीवाल व प्रथमेश यांनी चाल खेळून झाली. प्रथमेशने एकाच वेळी १० खेळाडूंशी लढतीचे (सायमल चेस) प्रात्यक्षिक दाखवले. स्पर्धा १२ वर्षांखालील, २० वर्षांखालील व खुल्या अशा तीन गटांत स्वीस लीग पद्धतीने होतील. स्पर्धेसाठी तब्बल ४० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हिरामण चोरे होते. प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय गुगळे, कलाकार प्रकाश धोत्रे, अरुण झंवर, धाडीवाल, डॉ. चौरे यांनी स्पर्धेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
संस्थेचे अध्यक्ष यशवंत बापट यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. शुभदा ठोंबरे यांनी स्वागत केले. श्याम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुबोध ठोंबरे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी सुहास मोहरकर, विवेक मुळे, विष्णू कुद्रे आदी परिश्रम घेत आहेत. महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी होईल.