Leading International Marathi News Daily शनिवार, २५ एप्रिल २००९
  सरबत आख्यान
  खाकरा उद्योगातील ‘लक्ष्मी’
  आश्चर्य
  रिकामटेकडीच्या बोगद्यातून
  विज्ञानमयी
  घरपोच घडीची पोळी
  तेथे कर माझे जुळती
  फिरूनी पुन्हा बहरेन मी‍!
  अनोखी मदत
  भयाच्या सावलीत..
  वाचन शिबीर : एक आगळा उपक्रम
  स्वप्न आणि स्वप्नभंग
  अनुभव गाणी
  बर्फाची पिसं
  प्रतिसाद
  कॅरोलाइन इन दि सिटी..
  सुंदर माझं संगीत

 

उन्हाळ्याची काहिली जसजशी वाढत जाते, तसतशी तहानेची तीव्रताही वाढत जाते. पाणी हे जरी तृष्णा-शांतीचं नित्याचं साधन असलं तरी निरनिराळ्या प्रकारची सरबतं, रस आणि शीतपेयंही याकामी वापरली जातात. या पेयांमध्ये बऱ्याचदा विविध जीवनसत्त्वादी औषधी गुणही असतात. अशा वैविध्यपूर्ण पेयांचा हा पाणीदार, रसीला रसास्वाद..
उन्हाळ्याचा तडतडबाजा आता चांगलाच वाजू लागलाय. घरीदारी, प्रवासात, अंगमेहनतीची कामं करणाऱ्या लोकांच्या हातात सगळीकडेच पाण्याची बाटली आवश्यक झाली आहे. ट्रॅफिक आयलंडमधल्या फेसाळ कारंज्याने तृष्णा-शांती जरी झाली नाही, तरी उन्हाच्या फुफाटय़ाने तापलेले डोळे नक्कीच निवतात. क्षणा-क्षणाला पाण्याचं महत्त्व जाणवून देणारा हा ऋतू. शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. पूर्वी रणरणत्या उन्हात खेळून आलेल्या पोरांना घटाघटा पाणी पिण्यास आई-आजीची सक्त मनाई असे. अगदी गूळ-पाणी जरी नाही दिलं, तरी

 

खडीसाखरेचा खडा तोंडात टाकून मगच पाणी प्यायला मिळत असे. घामावाटे निघून गेलेले क्षार गूळ खाल्ल्याने भरून येत. खडीसाखरेतून ‘इन्स्टंट’ शक्ती मिळत असे.
आज आपण फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतो आणि दात गोठवणारं ‘चिल्ड्’ पाणी पितो. पूर्वी उन्हाळा वगळता इतर ऋतूंत तांब्या-पितळेच्या कळशांमध्ये पाणी ठेवलं जात असे. उन्हाळ्यात मात्र मातीचा माठ, त्यात वाळ्याची जुडी असा सरंजाम असे. माठात पाणी योग्य प्रमाणात थंड व्हायचं आणि वाळा द्यायचा शरीराला आवश्यक ती शीतलता. पाण्याशी निगडित असलेला ‘तृष्णा-शांती’ हा वरवर दिसणारा आणि अतिशय प्राथमिक हेतू असला तरी तहान भागविण्याचे अनेक रसीले आणि रंगीले योग पुढे अस्तित्वात आले. त्याचा हा मागोवा..
पाणी पिऊन तहान तर भागते; पण त्याला आणखी मधुर, लाजवाब बनवता आलं तर? नावीन्याच्या शोधाच्या या ओढीतूनच मानवी इतिहासात शरबती रंग भरले गेले. आपल्याच भाषेचा भाग झालेल्या ‘सरबत’ या शब्दाचं मूळ अरेबिक ‘सर्बा’मध्ये आहे. सर्बा म्हणजे पेय. मध्य-पूर्वेतून आलेल्या या सरबताचं आदिम रूप ‘बर्फ घालून गार केलेला फळांचा रस’ असं होतं. आपल्याकडील सरबतांचा विचार केला तर त्यातही ऋतुमानानुसार शरीराला लाभदायी ठरणाऱ्या फळांचा अंतर्भाव केलेला दिसतो. पारंपरिक सरबतांमध्ये लिंबू, आवळा, कोकम, कैरी यासारख्या ‘सी’ जीवनसत्त्वाने भरपूर आणि चवीने आंबट असलेल्या फळांचा वापर अधिककरून केलेला असतो. याशिवाय बार्ली, वाळा, बेल, चंदन, गुलाब यांसारख्या शरीरातली उष्णता कमी करणाऱ्या पदार्थाचीही सरबतं बनविली जातात.
आंबट रसाचा प्रमाणात वापर केल्यास पचनक्रिया सुधारते, शरीरात ताकद येते आणि उन्हाळ्यात ‘तहान- तहान’ होते, घसा कोरडा पडतो, त्याचं प्रमाण कमी होतं. याव्यतिरिक्तही लिची, पेरू, अननस, संत्रं, जांभूळ, स्ट्रॉबेरी, आंबा, केशर अशी विविध स्वादाची सरबतं हल्ली बाजारात मिळतात.
आयुर्वेदात उन्हाळ्यात काय खावं, काय प्यावं, याविषयी सांगण्यात आलेलं आहे. आहार हलका असावा. जव (बार्ली), साळी, तांदुळजा, पडवळ, तोंडली, सातूचं पीठ, चंदन-वाळायुक्त पाणी यांचा समावेश आहारात असावा. सरबत या प्रकाराशी मिळत्याजुळत्या पेयप्रकाराला आयुर्वेदात ‘पानक’ असं म्हटलेलं आहे. पानकाचाही उद्देश तोच : शरीरातील उष्णता कमी करणं आणि उन्हाळ्याने ऱ्हास झालेली शक्ती भरून काढणं. यात प्रामुख्याने धणे, जिरे, बडीशेप, तुळशीचं बी, सब्जा, सातूचं पीठ, खायचा कापूर, वेलची, सालसा या आयुर्वेदिक द्रव्यांचा वापर केला जातो.
उन्हाळ्यासाठी उत्तम अशा एका शीतपेयाची माहिती वैद्य मनीषा राजभोसले यांनी दिली. नागरमोथा, खैरसाल, अनंतमूळ, वाळा या सगळ्यांची चरूण प्रत्येकी ५० ग्रॅम आणि चंदनाची पावडर २५ ग्रॅम एकत्र करून मिसळून ठेवायची. धणे-जिऱ्याची बारीक पावडर करायची. चूर्णमिश्रण एक चमचा आणि धणे-जिरे पावडर एक चमचा घेऊन एक लिटर उकळलेलं पाणी त्यावर ओतायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी ते प्यायचं. उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.
डाळिंब, द्राक्षं ही फळंही उन्हाळ्यात गुणकारी ठरतात. डाळिंबाच्या रसामुळे रक्तातली उष्णता कमी होते, शक्ती वाढते, हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारते. द्राक्षं ही हृदयाच्या आरोग्यासाठी बलकारक आहेत.
वैद्य मधुरा कुलकर्णी यांनीही या संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, वाळ्याचं पाणी हे वसंतपेय म्हणून ओळखलं जातं. धण्याच्या पाण्याला ‘धान्यकहिम’ असं म्हटलं जातं. पानक, पेय आणि मंथ- म्हणजे घुसळून तयार केलेलं- असे तीन प्रकार पेयाच्या बाबतीत वर्णन केलेले आहेत. ताक हे मंथ आहे. उन्हाळ्यातलं energy drink म्हणून खजुराचं सरबत गुणकारी मानलं जातं. दोन ते तीन खजूर (बिया काढून), १०-१२ मनुका, दोन-तीन आमसुलं (कोकम साल), अध्र्या डाळिंबाचे दाणे ही सारी सामग्री एक ते दीड लिटर पाण्यात भिजवून नंतर वाटून गाळून प्यावं.
याशिवाय उसाचा रस, नीरा, शहाळ्याचं पाणी, ताक, सब्जा किंवा तुळशीचं बी पाण्यात भिजवून ते दुधाबरोबर घेणं, बेलफळाचा पाक, बेलफळ भाजून किंवा कच्चंच गर गाळून पिणं-अशी बरीच उन्हाळ्यापासून रक्षण करणारी पेयं आहेत.
सातूचं पीठ पाण्यात कालवून पिणं हे आपल्याकडे फारसं प्रचलित नाही. चण्याची डाळ आणि जव एकत्र करून दळलं की झालं सातूचं पीठ किंवा ‘छत्त’. उष्माघात टाळण्यासाठीचा एक रामबाण उपाय म्हणून याचा उल्लेख केला जातो.
बडीशेपेचंही सरबत करता येतं. एक मोठा चमचा बडीशेप पाण्यात घालून उकळायची. ते पाणी गार होऊ द्यायचं. त्यात खडीसाखर घालायची. ती पूर्ण विरघळली की गाळून, त्यात लिंबाचा रस घालून प्यायचं. राजस्थान तसंच विदर्भातही चिंचेचं पाणी, मीठ आणि साखर घालून प्यायलं जातं. चंदिगढ, सिमला या भागांत गोंद कटिश नावाच्या एका डिंकापासून पेय बनवलं जातं. हा डिंक एका झाडातून पाझरतो. रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी थंडगार लस्सीतून किंवा दुधातून ते प्यायलं जातं. मटका कुल्फीतही गोंद कटिश वापरला जातो.
उन्हाळ्याची गाथा रुह-अफजाच्या उल्लेखाविना पूर्णच होऊ शकत नाही. या वर्षी तर जूही चावलासारखी प्रसन्न चेहऱ्याची मॉडेल त्याला लाभली आहे. युनानी उपचारप्रणालीशी संबंधित रुह-अफजा हे हकीम उस्ताद हसन यांनी शोधून काढलं. फुलं-फळं, भाज्या-मुळं आणि औषधी वनस्पती यांच्या मिश्रणाने हे बनते. गुलाब, केवडा, लिंबू, संत्रं, अननस, गाजर, कलिंगड, पालक, पुदिना, दुधी, वाळा, नीलेफर, कसनी वगैरे पदार्थाच्या साऱ्या गुणसंचयाने त्याची परिणामकारकता वाढवली जाते.
याशिवाय दुधात घालून प्यायची काही सरबतं आहेत. बदाम, गुलाब, केसरिया या स्वादांत ती मिळतात. बदाम, खसखस, बडीशेप, पांढरी मिरी, वेलची, गुलाबपाणी हे पदार्थ वाटून, गाळून, त्यात दूध मिसळून थंडाई बनविली जाते. वेगवेगळ्या कंपन्यांची तयार थंडाईही बाजारात उपलब्ध आहे.
अलीकडे बाजारात विविध फळांच्या स्वादांची सरबतं मिळतात. त्यात नैसर्गिक स्वाद आणि सिथेंटिक स्वाद असे दोन्ही प्रकार असतात. द्रवस्वरूपात असलेली ही सरबतं संपृक्त स्वरूपात असतात. वापरताना त्यात उत्पादकांच्या सूचनेनुसार पाणी मिसळून ती वापरायची असतात. परंपरागत स्वादांबरोबरच अननस, संत्रं, जांभूळ, स्ट्रॉबेरी हे स्वादही हल्ली लोकप्रिय होत असल्याचे दिसते. पारंपरिक कोकम सरबतात आगळ आणि अमृत कोकम असे दोन प्रकार दिसतात. फक्त मीठ घालून साठवलेला कोकमाचा रस म्हणजे आगळ आणि जिरे पावडर व साखर घातलेला रस म्हणजे अमृत कोकम.
पावडर स्वरूपात उपलब्ध असलेले सरबताचे प्रकारही आहेत. पाण्यात पावडर मिसळायची, फ्लेवर मिसळायचा आणि त्यात साखर घालायची. रसना आणि ढँग हे दोन ब्रँड या प्रकारात उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त सरबतं कशी बनवायची, हे शिकवण्याचे क्लासही हल्ली आढळून येतात. त्यातून शिकून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला कल्पनाशक्तीच्या आणि माहितीच्या जोरावर बरंच काही नवीन बनवता येतं. स्वयंरोजगाराची संधीही प्राप्त होते. केंद्र सरकारच्या सामुदायी खाद्य आणि पोषाहार विस्तार युनिटतर्फे मुंबईत कॉटनग्रीन येथे असे क्लासेस चालविले जातात. पाच दिवसांच्या या कोर्समध्ये सरबतं, जॅम, जेली, सॉस, लोणची बनवणं तसंच पोषक आहाराविषयी मार्गदर्शन केलं जातं. क्लासचं नाममात्र २५ रुपये शुल्क आहे. कोर्सच्या शेवटी प्रमाणपत्रही दिलं जातं. २४७०२७१६ या दूरध्वनीवर या कोर्सची माहिती मिळू शकते.
उन्हाळ्यात टी.व्ही.चा पडदा व्यापून टाकणाऱ्या, बाजारात मिळणाऱ्या सॉफ्ट ड्रिंक्सचा विचार केल्याशिवाय या सरबत आख्यानाची समाप्ती होणार नाही. टॉप मॉडेल्स, नयनरम्य लोकेशन्स, मानवी भावनांना ललकारणारं प्रेझेंटेशन अशी सगळी भट्टी जमली, की मार्केट काबीज व्हायला कितीसा वेळ लागणार? या उत्पादनांच्या संदर्भात वेळोवेळी उमटलेली प्रश्नचिन्हे बाजूला ठेवली तरी त्यांच्याबद्दलची उत्सुकता राहतेच. काय असतं नेमकं या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये? थोडीशी कल्पना येईल अशी ही माहिती : सॉफ्ट ड्रिंक्सचा बराचसा भाग म्हणजे काबरेनेटेड पाणी असतं. यातील कार्बनडाय ऑक्साइडमुळे या पेयाला एक मिरमिरणारी चव प्राप्त होते. दुसरा घटक साखर. ती द्रव किंवा सुक्या स्वरूपात वापरली जाते. साखरेमुळे गोडवा तर येतोच, पण त्याशिवाय या पेयाला ‘body’ प्राप्त होते. रेंगाळणारी चव तोंडात बराच वेळ राहते. यातील सायट्रिक अ‍ॅसिडमुळे तोंडातील लाळेचं प्रमाण वाढतं आणि काही काळासाठी तहान शमते. ही सॉफ्ट ड्रिंक्स ‘नेत्रसुखद’ही व्हावीत म्हणून त्यांत ‘इमल्शन्स’ (Emulsions) घातली जातात. यात gums (गम्स), पेक्टिन वगैरेंचा अंतर्भाव असतो. टिकाऊपणासाठी preservatives असतातच. या पेयांचा रंग आणि स्वाद टिकून राहावा म्हणून अ‍ॅस्कॉर्बिक अ‍ॅसिड वापरलं जातं.
खरं म्हणजे तहान भागविण्यासाठी पाणी पिणं पुरेसं असतं. पुरेसंच नाही, तर समाधान देणारंही असतं. पाण्याच्या घोटागणिक जे समाधान आत झिरपत जातं, त्याला तोड नाही. तरीही विरंगुळ्याच्या क्षणांचे सोबती म्हणून सरबतांना झुकतं माप द्यायलाच हवं.’
चारुशीला धर
charusheela.dhar@gmail.com