Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
अग्रलेख

गोंधळात गोंधळ!

 

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांचा मुखवटा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे; त्यांच्या पक्षातले एक ज्येष्ठ सहकारी जसवंतसिंग यांनी टरकावला आहे. अडवाणी हे तद्दन खोटारडे आहेत, असेच जणू जसवंतसिंग यांना सुचवायचे आहे. ‘इंडियन एअरलाइन्स’च्या ‘आयसी ८१४’ विमानाच्या अपहरण काळात जसवंतसिंग हे तिघा दहशतवाद्यांना घेऊन कंदाहारला गेले, तोपर्यंत ही गोष्ट आपल्याला माहीत नव्हती, असे स्पष्टीकरण अडवाणींनी अलीकडेच दिले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी आदींनी अडवाणींवर यासंदर्भात केलेल्या टीकेनंतर ‘आयसी ८१४’ च्या विमान प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांना सोडून द्यायच्या प्रकाराविषयी आपण कसे अनभिज्ञ होतो, ते सांगायला अडवाणींनी सुरुवात केली. आपला त्या प्रकाराशी काडीमात्र संबंध नव्हता, असे दाखवून मतदारांची सहानुभूती मिळवायचा त्यांचा हा प्रयत्न असला तरी त्यांना तो आनंद जसवंतसिंग यांनी दीर्घकाळ मिळू दिलेला नाही. ‘अडवाणींना दहशतवाद्यांना सोडून द्यायचा तो प्रकार मान्य नव्हता, पण जेव्हा त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या प्रकरणी अडवाणींना या प्रकारामागली भूमिका पटवून द्यायची जबाबदारी आपल्यावर टाकली आणि आपण ती पार पाडली, तेव्हा अडवाणींनी दहशतवाद्यांना सोडून द्यायला एखाद्या निष्ठावान भक्ताप्रमाणे मान्यता दिली,’ असे जसवंतसिंग यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कंदाहार प्रकरणाच्या वेळी अर्थमंत्री असणारे यशवंत सिन्हा यांनीही दहशतवाद्यांना सोडायचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता, असे सांगून अडवाणींचा विश्वामित्री पवित्रा उघडा केला आहे. पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनीही तोच सूर लावला आहे. थोडक्यात, हे सगळे नेते एकीकडे आणि अडवाणी दुसरीकडे असे चित्र सध्या तरी उभे राहिले आहे. हा गोंधळातला गोंधळ आणखी काही काळ चालूच राहणार हे स्पष्ट आहे. थोडक्यात, अडवाणींना पूर्ण कल्पना देऊनच भारतीय तुरुंगात असलेल्या मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद झरगर आणि ओमर सईद शेख या पाकिस्तानी दहशतवाद्यांना जसवंतसिंगांनी कंदाहारला नेऊन सोडले. त्या गोष्टीला आता दहा वर्षे झाल्याने असेल, अडवाणींना नेमके काय घडले, ते आठवत नसावे. अडवाणींनी आपण केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असतानाही दहशतवाद्यांना सोडून द्यायची ती गंभीर बाब आपल्या निदर्शनास आणण्यात आली नव्हती, असे सांगून आपला ‘पोलादीपणा’ टिकवायचा दुबळा प्रयत्न सुरू केला होता. ‘अडवाणींना एकतर विश्वासात घेणे वाजपेयींनी उचित मानले नसावे किंवा अडवाणींवर वाजपेयींचा विश्वास उरला नसावा,’ यासारखी कडवट टीकाही त्यांना राहुल गांधींकडून ऐकावी लागली. अडवाणी एकीकडे स्वत:चा बचाव करायच्या प्रयत्नात असतानाच जसवंतसिंगांनी त्यांची वेळ अचूक साधली आहे. जसवंतसिंगांच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांच्या मागण्यांपुढे मान झुकवायची वेळ पडली, तरी ती गोष्ट अडवाणींच्या कानावर घालूनच पुढली पावले उचलण्यात आली होती. दहशतवाद्यांना सोडून द्यायला अडवाणींप्रमाणेच अरुण शौरी या दुसऱ्या केंद्रीय मंत्र्यांचाही विरोध होता, त्यांनाही याबाबतीत विश्वासात घ्यायला वाजपेयींनी सांगितले, पण ती जबाबदारी कुणी पार पाडली, ते आपल्याला आठवत नाही, असे जसवंतसिंगांचे म्हणणे आहे. अडवाणींनी इतक्या वर्षांनंतर आपल्याला त्या विषयी काडीमात्र माहिती नव्हती, असे म्हणणे म्हणजे वाजपेयींना तोंडघशी पाडणे होय. सत्तेवर असताना त्यांनी असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न अनेकदा करून पाहिले आहेत. त्यासाठी त्यांनी नागपूरच्या वरिष्ठ संघजनांची मदतही घेतली होती. गेल्या वर्षभरात डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर त्यांनी ‘निकम्मा’ (असमर्थ) पंतप्रधान म्हणूनही टीका केली होती, प्रत्यक्षात असमर्थ कोण होते, ते स्पष्ट झाले आहे. संघ परिवारात तेव्हा तर असे मानले जात होते, की वाजपेयी हा त्या सरकारचा ‘मुखवटा’ होता आणि खरे कर्तेकरविते हे ‘पोलादी पुरुष’ अडवाणी होते. पक्षाचे तेव्हाचे सरचिटणीस के. एन. गोविंदाचार्य यांचेच तसे म्हणणे होते. गोविंदाचार्य हे संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असल्याने त्यांचे म्हणणे सत्याच्या कसोटीवर घासून घेतले गेले असणार, असेच संघ परिवाराला तेव्हा वाटले असायची शक्यता आहे, पण तसे नव्हते, हे आता स्पष्ट झाले आहे. अडवाणींचा मुखवटा पोलादाचा असला तरी, त्याचे खरे पितळ आता उघडे पडते आहे, किंबहुना हा कल्हई उडालेला साधा पत्रा होता, असेच जसवंतसिंगांच्या ताज्या मुलाखतीने सिद्ध केले आहे. ज्या वाजपेयींनी सलग सहा वर्षे आणि त्यातही लोकसभेचा एक पूर्ण कालखंड या देशातले काँग्रेस विरोधकांचे सरकार पहिल्यांदाच पूर्ण वेळ चालवून दाखवले, त्यांचे नाव मुंबईच्या शिवाजी पार्कवरल्या सभेत अडवाणींनी एकदा उच्चारले आणि त्यानंतर त्यांचा साधा उल्लेखही प्रचारसभांमधून करायचे टाळले आहे. वाजपेयी आता पंतप्रधानपदावर दावा करायला पुढे होणार नाहीत, हे माहीत असूनही अडवाणींनी ही कृतघ्नता का दाखवावी, असा प्रश्न भाजपप्रेमींना पडला असेल तर नवल नाही. कदाचित त्यामुळेही असेल, मतदारांमध्ये एक प्रकारची निरुत्साही वृत्ती दिसून आली असेल तर तो दोष त्यांचा नाही. वाजपेयींच्या तब्येतीची आजची अवस्था लक्षात घेता, त्यांचा नामोल्लेखही न करणे योग्य नाही, किंबहुना तसे करणे त्यांच्याच ‘निकम्मे’पणाचे लक्षण आहे. अडवाणींच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू असणारी त्यांच्या पक्षाची प्रचार मोहीमही तशी थंडय़ा दिलानेच चालू आहे. त्यात जीव ओतायलाही कुणी नाही, जे कुणी आहेत, ते आपापल्या मतदारसंघांना चिकटून बसले आहेत. शेजारच्या मतदारसंघातला कुणी निवडून येवो, न येवो, आपल्या हातून हा मतदारसंघ निसटता कामा नये, या एकाच स्वार्थी वृत्तीतून त्यांची ही उलघाल चालू आहे. कदाचित त्यामुळेही असेल, जसवंतसिंगांनी अडवाणींच्याही मुखवटय़ाला हात घालून त्यांच्यातला खोटेपणा सिद्ध केला आहे. अडवाणींच्या पक्षात हा गोंधळ आहे आणि इतर राजकीय पक्ष सज्ज आहेत असे म्हणावे तर तशीही अवस्था नाही. त्यांच्यातल्या भंपकबाजीला तर सीमा नाही. बाबरी मशीद पाडायची जबाबदारी काँग्रेस पक्षाला टाळता येणार नाही, असे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव अलीकडेच म्हणाले आहेत. ज्या मुलायमसिंग यादवांसमवेत लालू सध्या प्रचाराच्या फैरी झाडत आहेत, त्या मुलायमसिंगांनी बाबरी मशीद पाडायच्या प्रकरणातले खरेखुरे गुन्हेगार कल्याणसिंग यांना पावन करून घेऊन मुस्लिमांचा रोषही ओढवून घेतला आहे. विद्वेषी हिंदू झुंडशहांनी बाबरी मशीद पाडली तेव्हा कल्याणसिंग उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. ती पाडली जाऊ नये, यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. बाबरी मशीद पडली तो आपला स्वाभिमानाचा दिवस होता, असे कल्याणसिंग यांनी जाहीरपणे म्हटले होते. भगवान रामाने आपला माध्यम म्हणून तेव्हा वापर करून घेतला याबद्दल रामाचे आपण आभारी आहोत, असेही कल्याणसिंग यांचे म्हणणे होते. बाबरी मशीद प्रकरणात नेमण्यात आलेल्या लिबरहान आयोगापुढे दिलेल्या साक्षीतही त्यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केलेली नव्हती. ते आता मुलायमसिंगांचे आणि पर्यायाने लालूंचे दोस्त बनले आहेत. हे दोन्ही नेते रामविलास पासवान यांच्यासह सध्या धर्मनिरपेक्षतेच्या गावोगाव गप्पा मारू लागले आहेत. पासवान हे तर भाजपच्या सत्तेत सहभागी झाले होते. शरद पवारांना या तिघांसह डाव्यांची मैत्री हवी आहे. त्यांना टाळून कोणतेच सरकार चालवता येणार नाही, असे त्यांना वाटते आहे. डाव्यांना आणि पर्यायाने पवारांनाही कल्याणसिंगांची मैत्री आताच्या परिस्थितीत चालू शकते, याला ढोंगबाजी म्हणायचे की दूधखुळेपणा? भाजपच्या तंबूत जेवढा गोंधळ आहे, तेवढाच तो डाव्यांच्या, समाजवाद्यांच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांच्याही तंबूत आहे. सत्तेसाठी वाटेल ते टोक गाठायची त्यांची ही तयारी त्यांना लबाडय़ा करण्यापासून मात्र थोपवू शकत नाही, हेच खरे!