Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

‘माय मॉम्स न्यू बॉयफ्रेंड’
भन्नाट कल्पना, माफक विनोद!

कॉमेडीसाठी एक भन्नाट कल्पना आहे. या गोष्टीचा नायक आहे विशीतला हेन्री (कॉलिन हँक्स)- नुकतीच ज्याची चमकदार करिअर सुरू झाली आहे आणि नुकताच जो प्रेमात पडलाय असा. आणि गोष्टीची नायिका आहे त्याची आई (मेग रायन)! एफबीआय एजंट म्हणून तीन वर्षांनी हेन्री घरी येतो, तर त्याची आई त्याला एकापाठोपाठ आश्चर्याचे धक्केच देते. तो घरून निघाला होता त्यावेळी गलेलट्ठ असलेली आई एव्हाना शिडशिडीत, प्रमाणबद्ध बांध्याची तरणी वाटावी अशी झालेली असतेच, शिवाय ती आता पाटर्य़ा, मित्र यांच्यात रमलेली असते. अनेक मित्रांना तिचा सहवास हवा हवासा वाटतो. ‘आई’चं हे रूप हेन्रीला चकित, हतबुद्ध, अस्वस्थ करतं. आईनं त्याला बापाविना एकटीनं वाढवलेलं असतं. माय-लेक दोघांचंच जग असल्यानं साहजिकच हेन्री आईविषयी पझेसिव्ह असतो. अशात मध्यम वयातल्या आईचं हे रूप, तिचा बायल्या आणि लहान वयाचा मित्र, रात्री अपरात्री तिच्यासाठी ‘मजनू’ होऊन घरापुढे गळा काढणारा कुणी टकल्या आशिक हे सगळं त्याला असह्य होतं. त्यानं जिच्याशी लग्न ठरवलंय ती त्याची एफबीआयमधली सहकारी एमिली (सेल्मा ब्लेअर) या परिस्थितीला सहजपणे, उत्साहाने सामोरी जाते, किंबहुना हेन्रीच्या ‘मत्सरा’चं ती मनोवैज्ञानिक विश्लेषणही करते (ज्यानं हेन्री आणखीनच वैतागतो!).

‘जोडी जमली रे’मध्ये आज अरुण नलावडे
दर शनिवारच्या भागात सेलिब्रिटी जोडीला आमंत्रित करण्याची ‘जोडी जमली रे’ कार्यक्रमाची पद्धत आहे. त्यानुसार ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आज, शनिवारी रात्री १० वाजता प्रसारित होणाऱ्या भागात प्रसिद्ध अभिनेता आणि ‘श्वास’चे निर्माते अरुण नलावडे आणि त्यांच्या पत्नी अंजली नलावडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विवाहविषयक मराठी रिअॅलिटी शो म्हणजे ‘जोडी जमली रे’ हे समीकरण आता प्रेक्षकांला चांगलेच ठाऊक झाले आहे. विवाहविषयक संकल्पना, पूर्वापारपासून चालत आलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, त्याचप्रमाणे चांगल्या परंपरा, आजच्या २१ व्या शतकात लग्नाचा जोडीदार शोधताना वर तसेच वधुला भेडसावणारे प्रश्न इत्यादीविषयक चर्चा ‘जोडी जमली रे’ मधील स्पर्धक तसेच त्यांचे पालक नेहमीच करतात.

मॅजेस्टिक बुक हाऊसतर्फे गोरेगाव येथे पुस्तक प्रदर्शन
प्रतिनिधी

मॅजेस्टिक बुक हाऊसतर्फे गोरेगाव (पश्चिम) येथील अ. भि. गोरेगावकर हायस्कूल, आरे रोड येथे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून हे प्रदर्शन येत्या ३१ मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, ललित आदी वाङ्मय प्रकारांसह धार्मिक, आध्यात्मिक, आरोग्य, पाकशास्त्र, ज्योतिष आदी विविध विषयांवरील पुस्तकेही मांडण्यात आली आहेत. उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने खास मुलांसाठीची गोष्टीची पुस्तकेही येथे पाहायला मिळतील. मराठीतील पहिला ‘मासिक मनोरंजन’चा दिवाळी अंक, तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तकही येथे वाचकांना मिळू शकणार आहे. रसिक वाचक आणि साहित्यप्रेमींनी या प्रदर्शनास मोठय़ा संख्येने भेट द्यावी, असे आवाहन मॅजेस्टिक बुक हाऊचे अनिल कोठावळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोमसाप वांद्रे शाखेची कार्यकारिणी जाहीर
प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वांद्रे शाखेच्या नव्या कार्यकारिणीची निवड अलिकडेच एका बैठकीत करण्यात आली. या बैठकीत गौरी कुलकर्णी यांची अध्यक्षपदी तर सदानंद राणे यांची कार्यवाहपदी फेरनिवड करण्यात आली. कोषाध्यक्ष-कुसुम दुमाळे, सहकार्यवाह-विभा देशपांडे तसेच ज्योती कपिले, श्रीकांत कलगुटकर आणि प्रदीप देशमुख कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहतील. जिल्हा मंडळाचे उपाध्यक्ष दत्तात्रय सैतवडेकर निरीक्षक म्हणून उपस्थित होते.
माधवी कुंटे यांचे कथाकथन संस्थेच्या वतीने रविवार ३ मे रोजी माणिक विद्या मंदिर, वांन्द्रे रेक्लेमेशन येथे संध्याकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध लेखिका माधवी कुंटे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कथेची जडणघडण या विषयावरही त्या बोलणार आहेत.