Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
लोकमानस

हा वृत्तपत्रांचा मानसिक आजार की, शारीरिक?

 

‘सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचे तंत्र वापरून मनोरुग्णांवर उपचार करण्याची पद्धती विकसित केल्यापासून बरेचसे शारीरिक आजार खरे तर मानसिक असतात, असं मानसशास्त्रज्ञ मानू लागले’, असं विधान त्रिकालवेधमध्ये वाचायला मिळालं. (१८ एप्रिल) विधान चुकीचं नाही पण नव्या संशोधनानुसार बरेचसे मानसिक रोग हे शारीरिक असतात, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. कारण मन आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत; मन हा शरीराचा एक भाग आहे हे वैज्ञानिक सत्य म्हणून आता पुढं आलं आहे.
‘मन’ नावाचा वेगळा अवयव शरीरात नाही. मेंदू हाच आपल्या वैचारिक प्रक्रियांचं काम पाहतो. ‘मनात विचार येतो’, असं आपण म्हणतो त्याऐवजी तो ‘मेंदूत येतो’. मनात विचार येतील, तसं आपण बोलत नाही; मेंदूत जसे विचार येतील तसं बोलतो. मन नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्यानं आपण मनात काही साठवत नाही. साठवणीचं कामही मेंदू करतो. तरीही सवयीनं आपण मन आणि शरीर अशी विभागणी सतत करत असतो. वैज्ञानिकांनी संशोधनातून जी नवी माहिती पुढं आणली ती स्वीकारायला आपलं मन अजून तयार नाही. आता इथंही मी किती सहजपणे ‘मन’ हा शब्द वापरला! मुद्दा हा की, परंपरेचा पगडा, रीतीभाती आणि रूढी या समाजात वैज्ञानिक संस्कृती रुजण्याच्या आड येतात. अशा वेळी वृत्तपत्रासारख्या माध्यमांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे पण त्याऐवजी ती पारंपरिक अशास्त्रीय विचारांचं पुनरुज्जीवन करू पाहाताहेत. आत्मा, पुनर्जन्म इत्यादी भाकड संकल्पनांचा पाठपुरावा करणारे अवैज्ञानिक असे विचार विज्ञानाचाच एक भाग आहे, असा भास निर्माण करणारे लेख विस्तृत स्वरूपात आज, २००९ साली वृत्तपत्रात छापले जाताहेत.
हा वृत्तपत्रांचा मानसिक आजार की, शारीरिक आजार?
अवधूत परळकर, दादर, मुंबई

शनिवारची वाट पाहतो आतुरतेने
३ जानेवारीपासून प्रत्येक शनिवारी ‘त्रिकालवेध’ची ओढ लागते. भूतकाळातील घटनांच्या आधाराने सदरातील रंजक लेखाचा प्रवास सुरू होतो आणि त्या घटनांची वर्तमानकाळातील संदर्भाशी गुंफण करत भविष्यकाळाचा वेध घेतला जातो. तीनही काळांतील एका गहन विषयाचे विचारपूर्वक चित्रण एका लेखामध्ये करणे केवळ आश्चर्यकारक!
लेखमालेची सुरुवात ‘विस्मृती चित्रे’ या मोठय़ा विलक्षण विषयाने झाली. या विषयाचे बीज ‘द इकॉनॉमिस्ट’मधल्या मृत्युलेखामध्ये होते. वैद्यकशास्त्राला हा विषय म्हणजे खरोखरच आव्हान आहे. कलियुगापुढचे आव्हान दहशतवाद आणि त्याचे वैश्विकीकरणही उत्तम प्रकारे विशद केले होते. भाषा उत्पत्ती व लिपी यांबाबत टिप्पणी करताना टारझन-मोगली यांचे प्राणी-वृक्षांशी संवाद हा विषय वर्तमान आणि भविष्यकाळाच्या संदर्भात ज्या पद्धतीने मांडला आहे हे सर्व ‘शब्दाच्या पलीकडले’च आहे.
आजच्या काळात अभ्यासाला प्रवृत्त करणारे, अगम्य विषयाचा सामान्य माणसाच्या जीवनाशी निकटचा संबंध शोधणारे साहित्य वर्तमानपत्रात वाचायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. सर्वसामान्यांची ज्ञानलालसा याला काही प्रमाणात तरी उत्तम प्रतिसाद देण्याचे एक चांगले कार्य या लेखमालेद्वारे केल्याबद्दल धन्यवाद!
गजानन जोशी, बीजिंग, चीन