Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

कोल्हापुरात ६५, तर हातकणंगलेत ६७ टक्के मतदान
सांगलीत मतदान ५२ टक्के * साताऱ्यात ५३ टक्के मतदान
कोल्हापूर, २४ एप्रिल / विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ६५.०४ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६७.१४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज दिली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १५ लाख ७५ हजार ९३२ मतदार आहेत. यापैकी १० लाख २५ हजार ५९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६५.०४ टक्के इतकी आहे.

सोलापुरात ४६.६८ टक्के तर माढय़ात ५९.११ टक्के मतदान
सोलापूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात ४६.६८ टक्के तर माढा मतदारसंघात ५९.११ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाल्याचे आढळून आले. सोलापूर मतदारसंघातील १५ लाख ९२ हजार १०४ मतदारांपैकी ७ लाख ४३ हजार २१५ मतदारांनी म्हणजे ४६.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यशवंत व सोलापूर सूतगिरण्यांच्या कामगारांना अखेर देय रकमा अदा
सोलापूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

पाच वर्षांपूर्वी अवसायनात निघालेल्या सोलापूर व यशवंत या दोन्ही सहकारी सूतगिरण्यांच्या बेकार कामगारांच्या देय रकमा अदा करण्याबाबत अखेर शुक्रवारी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात रीतसर करार झाल्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काच्या देय रकमा मिळण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे.

शिवाजीरावांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार - संभाजीराव
राज्य शिक्षक संघातील वाद चिघळणार
कराड, २४ एप्रिल/वार्ताहर
आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पुरेपूर गैरफायदा घेत कोटय़वधी रुपयांचा अपहार करुन संघाचे सभासद असलेल्या ३ लाख शिक्षकांचा विश्वासघात केल्याचा आरोप संघाचे अध्यक्ष संभाजीराव थोरात यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला. शंकरराव काळे, वसंतराव हारुगडे, विष्णुदादा खबरे, केशवराव जाधव आदी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.

सातारा जिल्ह्य़ात टँकरने ४३ ठिकाणी पाणीपुरवठा
सातारा, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

जिल्ह्य़ात उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शासनाने १४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले असून १३ टँकरद्वारे १६ गावे व २७ वाडय़ांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील माण तालुक्यात सर्वाधिक ६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. फलटण व पाटण तालुक्यात प्रत्येकी २ तर जावली, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर तालुक्यात प्रत्येक एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तालुकानिहाय पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवणाऱ्या टँकरची संख्या व कंसात गावे वाडय़ा मिळून एकूण ठिकाणांची संख्या व बाधित लोकसंख्या पुढीलप्रमाणे.माण- ३ टँकर, १ बैलगाडी (१२) ४७७०, फलटण ३ टँकर (८) ६०९१, जावली २(६), २७०२, कोरेगाव - १ (१) ९८२, वाई -१(४) १९९०, पाटण -३ (१२) ८७५१. एकूण १३ (४३)२४४२७.

ट्रकने धडक दिल्याने आजोबासह नातू ठार
इचलकरंजी, २४ एप्रिल/वार्ताहर

भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात आजोबा व नातू ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात रूई फाटा (ता. हातकणंगले) येथे शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. दुचाकीवरून निघालेल्या तीन पिढय़ा अपघातात सापडल्याने गणेशनगर भागात हळहळ व्यक्त होत होती.मनोहर बंडू एकांडे (वय ५०), सचिन मनोहर एकांडे (वय २९) व जय सचिन एकांडे (वय ४) हे इचलकरंजीहून रूकडी फाटय़ावरील बाळूमामाच्या दर्शनासाठी निघाले होते. गणेशनगर गल्ली क्रमांक ४ मध्ये राहणारे हे तिघेजण एम-८० (एमएच ०९ टी ६५२२) या वाहनावरून जात होते. ते रूई फाटा येथे पोहोचले असता समोरून येणाऱ्या ट्रकने (एमएच ०९ बी ५०५२) त्यांना उडवले. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेने तिघेही इतरत्र फेकले गेले. मनोहर एकांडे हे जागीच ठार झाले. सचिन व जय या पिता-पुत्रांना आयजीएम इस्पितळात दाखल करण्यात आले.

आरक्षण समन्वय समितीतून मेटेंच्या हकालपट्टीची मागणी
कोल्हापूर, २४ एप्रिल / प्रतिनिधी
मराठा समाजाची आरक्षणाची चळवळ विश्वासघाताने मोडीत काढून मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या विनायक मेटे यांची आरक्षण समन्वय समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाज संघटनेचे सरचिटणीस बाळ घाटगे यांनी एका बैठकीत केली आहे.मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्रातील मराठा समाज संघटित होत असल्याचे पाहून या आरक्षण चळवळीत विनायक मेटे दाखल झाले. ही चळवळ प्रामाणिकपणाने लढविणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून त्यांनी नेतृत्वच आपल्याकडे घेतले. आरक्षण रथयात्रा त्यांनी फिरवली आणि लोकसभा निवडणुकीच्या ऐन धामधुमीत ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधी भूमिका घेतली, त्या छगन भुजबळ यांच्यासमोर लोटांगण घालून विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षपद स्वीकारले, असे घाटगे म्हणाले.

पोहेगावच्या शेतक ऱ्यांचा वीजप्रश्नी पाच तास ‘रास्ता रोको’
कोपरगाव, २४ एप्रिल/वार्ताहर
तालुक्यातील पोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वीजप्रश्नी आज कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर पाच तास भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले. येत्या ४ मेपर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याचे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागून प्रवाशांचे हाल झाले. ग्रामीण भागात विजेचे १६ मे १८ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पोहेगाव परिसरात सिंगल फेजिंग योजना व तिचे काम त्वरित सुरू करावे, म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होती.

स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये सांगलीचे क्रीडापटू चमकले
सांगली, २४ एप्रिल / प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने घेण्यात आलेल्या स्केटिंग चॅम्पियनशिप २००८-०९ या स्पर्धेत सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या नऊ खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंत तीन वर्षांखालील गटातील मुलात शालमर कसा (प्रथम) व मुलीत तृष्णा कदम (प्रथम), चार वर्षांखालील मुले- आर्य पेंडुरकर (द्वितीय), १२ वर्षांखालील मुले- निनाद चौगुले (तृतीय) व पंकज देशमुख (तृतीय) व १४ वर्षांखालील मुले- अजिंक्य चौगुले (द्वितीय) व संकेत देसाई (तृतीय) यांचा समावेश आहे. या स्पर्धेत धनश्री लवटे व चैतन्य सुतार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत सांगली व कोल्हापूर जिल्हय़ातील स्पर्धक सहभागी झाले होते. या खेळाडूंना प्रशिक्षक सूरज शिंदे व राजू शिवशरण यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या सर्व खेळाडूंचे सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे उपाध्यक्ष संजय परमणे, सचिव एस. एल. पाटील, सहसचिव मंदार मोकाशी व दीपक शहा यांनी अभिनंदन केले.

स्वामी समर्थावरील भक्तिगीतांच्या सीडीचे उद्या सोलापुरात प्रकाशन
सोलापूर, २४ एप्रिल/प्रतिनिधी

सोलापूरच्या संगीतक्षेत्रात नावलौकिक प्राप्त ‘क्षितिज’ संस्थेने निर्मिती केलेल्या ‘चला जाऊ अक्कलकोटी’ या नव्या भक्तिमय सीडीचे प्रकाशन रविवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता शिवस्मारक सभागृहात ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. कवी मुबारक शेख यांनी श्री स्वामी समर्थाच्या स्तुतीपर प्रासादिक भक्तिमय गीते लिहिली असून, त्यावर संगीत दिग्दर्शक भालचंद्र पंचवाडकर यांनी स्वरसाज चढविला आहे. ही गाणी नंदा जोशी-परचुरे, गिरीश पंचवाडकर, शीतल देशपांडे यांनी गायली आहेत. कौस्तुभ गोडबोले यांचे ओघवते निवेदन लाभले आहे. प्रशांत देशपांडे यांनी संगीत संयोजन केल्याचे अ‍ॅड. विजय मराठे यांनी सांगितले. या समारंभास ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.