Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रा.अजीज नदाफ व शाहीर खुडूसकर फाटे प्रतिष्ठानच्या पुरस्काराचे मानकरी
सोलापूर, २४ एप्रिल/ प्रतिनिधी

 

शिवशाहीर राजेंद्र कांबळे-खुडूसकर आणि गझलकार तथा नाटय़ कलावंत प्रा. डॉ. अजीज नदाफ यांना यंदाचा शाहीर विश्वासराव फाटे लोककला प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३ मे रोजी मोहोळमध्ये या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथसंच, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार फाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. गेल्या ११ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. यापूर्वी दिवंगत शाहीर जंगम स्वामी (परभणी), शाहीर वामनदादा कर्डक (नाशिक), शाहीर रमजान बागणीकर (कोल्हापूर), शाहीर गजाभाऊ वेणी (नाशिक), महिला शाहीर अनसूया शिंदे (हिंगोली) व नाटय़ कलावंत कु. मंदाकिनी शिरसीकर (सोलापूर) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
येत्या ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मोहोळच्या जुन्या नवोदय विद्यालयात आयोजित पुरोगामी विचारवंत प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते व आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका समारंभात हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. पुरस्काराचे मानकरी शाहीर खुडूसकर हे शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, जंगम स्वामी, आत्माराम पाटील, भाई विश्वासराव फाटे यांचे शाहिरी साहित्य जमा करून स्वत पोवाडे सादर करतात. तर प्रा. डॉ. नदाफ यांनी विश्वासराव फाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिरी कलेच्या क्षेत्राला वाहून घेतले आहे. त्यांनी विविध विषयांवर पुस्तक लेखन केले आहे.