Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

‘अभी भी मैं सोलह बरस का’!
दरबान, २४ एप्रिल / पीटीआय
आपल्या अद्वितीय क्रिकेट कर्तृत्वाने चाहत्यांनी हृदये जिंकणाऱ्या सचिनने आज वयाच्या ३७व्या वर्षांत पाऊल ठेवले, मात्र अजूनही आपण १६ वर्षांचेच असल्याची भावना सचिनने व्यक्त केली. इंडियन प्रीमियर लीगसाठी दक्षिण आफ्रिकेत असलेल्या सचिनने मुंबई इंडियन्स या आपल्या संघातील सहकाऱ्यांसह वाढदिवस साजरा केला.सचिन म्हणतो, मला अजूनही १६वर्षांचा असल्यासारखेच वाटते आहे. मला मिळालेल्या शुभेच्छा, आशीर्वाद किती हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. विक्रम मोडणे हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे नाही तर सामना जिंकण्याला मी प्रथम प्राधान्य देतो.

प्रभाकरन पाणबुडीतून पळून जाण्याच्या तयारीत?
किलोनोची, २४ एप्रिल/ पीटीआय

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलमचा म्होरक्या व्ही.प्रभाकरन हा उत्तरेकडील भागात एका छोटय़ा पट्टय़ात लपून बसला असून तो त्याच्याजवळ असलेल्या पाणबुडीतून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे श्रीलंका लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज सांगितले.५८ व्या डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग ब्रिगेडियर शावेंद्र डीसिल्वा यांनी सांगितले की, प्रभाकरन हा नो फायरिंग झोनमध्ये लपलेला आहे.

कसाबच्या वयाची चाचणी आज
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब ‘अल्पवयीन’ आहे का हे निश्चित करण्यासाठी चौकशी करावी, ही अभियोग पक्षाने केलेली मागणी आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी मान्य करीत रेडियोलॉजिस्ट आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सकांकडून कसाबच्या हाडांची (ऑसिफिकेशन) आणि दातांची चाचणी करण्याचे आदेश तुरूंग प्रशासनाला दिले. तसेच या चाचणीचा अहवाल २८ एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले. दरम्यान, याच मुद्दय़ाप्रकरणी अभियोग पक्षातर्फे २८ एप्रिल रोजी कसाबवर सर्वात पहिल्यांदाच उपचार करणारे नायर रुग्णालयाचे डॉक्टर आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

लहानग्या अक्षताच्या चित्राला लाभले टपाल तिकिटाचे कोंदण!
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

खारच्या लहानग्या चाळीत राहणाऱ्या अक्षता चव्हाणला आता जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थाने ओळख मिळणार आहे. भारतीय टपाल विभागाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविलेल्या अक्षताच्या चित्राचा सन्मान टपाल खात्याने स्टॅम्प बनवून केला आहे. अशा प्रकारचा सन्मान मिळविणारी अक्षता ही पहिली कर्णबधिर मुलगी आहे. साखरवाडी या सातारा जिल्ह्य़ातल्या चव्हाण कुटुंबाचं वशंपरंपरागत काम आहे पाथरवटाचं. दगडाच्या खाणीतून मिळणाऱ्या दगडातून मूर्ती बनविणे, दगड फोडणे आदी कामे करतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी अक्षताचे वडील काही वर्षांपूर्वी मुंबईत आले.

तालिबानी दहशतवाद्यांची बुनेरमधून माघार
इस्लामाबाद, २४ एप्रिल/पीटीआय

तालिबानी दहशतवादी इस्लामाबादच्या निकट आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव वाढल्यानंतर आता एका करारान्वये तालिबानने बुनेर या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणाहून माघार घेण्यास प्रारंभ केला आहे. हे तालिबानी दहशतवादी आता स्वात खोऱ्यातील त्यांच्या बालेकिल्ल्याकडे परत निघाले आहेत. कट्टर धर्मगुरू सूफी महंमद यांनी तालिबानच्या माघारीसाठीच्या या करारात पुढाकार घेतल्याचे समजते.

किंग्ज इलेव्हन पंजाबचे खाते उघडले
दरबान, २४ एप्रिल / वृत्तसंस्था

रवी बोपाराच्या ५९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह सजलेल्या ८५ धावांच्या झुंजार आणि तडाखेबंद खेळीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला सात विकेट्सनी नमवून पहिल्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना बंगलोर संघाने जॅक कॅलिस (६२), रॉस टेलर (३५), जेसी रायडर (३२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर १६८ धावांपर्यंत मजल मारली. त्यात पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज युसूफ अब्दुल्ला ३१ धावांत ४ बळी अशी कामगिरी करून चमकला. पंजाबने धावफलक हलता राहील याची खबरदारी घेतली. संगकारा (२६), युवराज (३०) यांनी उपयुक्त योगदान देत विजयाला हातभार लावला.

‘वांद्रे-वरळी सागरी सेतू मे अखेरीस सुरू होणार’
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

वांद्रे-वरळी सागरी सेतू बांधणारी कंपनी आणि प्रकल्पाची सल्लागार कंपनी यांच्यातील वादामुळे हा सागरी सेतूचे काम रखडण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळली आहे. तसेच मे महिन्याच्या अखेपर्यंत हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होईल, असे स्पष्ट केले आहे. ‘सागरी सेतूच्या उभारणीबाबत कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि पुढील महिन्याच्या अखेपर्यंत हा सागरी सेतू निश्चितपणे वाहतुकीसाठी खुला होईल, असा आम्हाला विश्वास आहे’, असे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश गवई यांनी सांगितले. तसेच सध्या सागरी सेतूच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या पृष्ठभागाचे, वाहतुकीविषयक सूचना फलक लावण्याचे आणि प्रकाशयोजना ही कामे करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सागरी सेतूची उभारणी करणारी कंपनी आणि प्रकल्प संचालक यांच्यातील मतभेदांविषयी प्रसारमाध्यमांतून झळकलेल्या वृत्ताच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. सागरी सेतूवरील रस्त्याचे डांबर, सूचना फलक आणि प्रकाशयोजना या गोष्टींसाठी हमी कालावधी वाढविण्याची सूचना प्रकल्प सल्लागार कंपनीने केली आहे. ही मुदत निविदेतील मुदतीहून अधिक असल्याने सेतूची उभारणी करणाऱ्या कंपनीने कंत्राटातून अंग काढून घेण्याचा इशारा दिला आहे. परिणामी सागरी सेतूचे काम आणखी रखडण्याची भीती वर्तविण्यात येत होती.

गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश
पणजी, २४ एप्रिल/पीटीआय

गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते व वकील एरेस रॉड्रिग्ज यांना दोन वर्षांपूर्वी ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्या राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश पोलिसांना आज न्यायालयाने दिला. पणजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ओल्ड गोवा पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी गुरुदास गावडे यांना आज हा आदेश दिला. विश्वजीत राणे यांनी आपल्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एरेस रॉड्रिग्ज यांनी केला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर २२ ऑगस्ट २००७ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. या एफआयआरची माहिती सादर करतानाच, आता हे प्रकरण थांबविण्यात यावी अशी विनंती पोलिसांतर्फे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना करण्यात आली. मात्र ही विनंती न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले. आपल्याला ठार मारण्याच्या दिलेल्या धमकीप्रकरणाचा तपास पोलीस राजकीय दडपणामुळे करण्याचे टाळत आहेत असा आरोप करणारी याचिका गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते व वकील एरेस रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात केली होती.

तिहारमधील विदेशी कैद्यांना मिळणार दूरध्वनी सुविधा!
नवी दिल्ली, २४ एप्रिल/पी.टी.आय
.
विविध गुन्ह्यांसाठी तिहार तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या विदेशी कैद्यांना आता आपल्या मूळ देशात असणारे नातेवाईक तसेच मित्रांशी दूरध्वनीवरून संपर्क साधता येणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याबाबचे निर्देश दिले असून पुढील आठवडय़ापासून ही सुविधा तिहार तुरुंगात असलेल्या विदेशी कैद्यांसाठी उपलब्ध होणार आहे. परदेशी कैद्यांना विनंतीनुसार आपल्या देशांमध्ये असणारे नातेवाईक व मित्रांना तिहार जेलमधून दूरध्वनी करता येईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले असून, पुढील मंगळवारपासून ही सुविधा उपलब्ध होईल, असे तिहार तुरुंगातील वकील आणि प्रवक्ते सुनील गुप्ता यांनी सांगितले. तिहार तुरुंगात एकूण ११,६५२ कैदी असून, त्यापैकी ५२१ विदेशी आहेत. त्यात महिलांची संख्या ७८ इतकी आहे. परदेशी कैद्यांना आता आपल्या मूळ देशांमधील नातेवाईकांशी संपर्क साधता येणार आहे. मात्र ही दूरध्वनी सुविधा मोफत नसून त्यासाठी त्यांना विशिष्ट अटींची पूर्तता करावी लागणार असल्याचे गुप्ता म्हणाले. २००२ सालापासून विदेशी कैद्यांना आपल्या नातेवाईकांशी ई-मेलने संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली . मात्र त्याचा लाभ भारतीय कैदीही करून घेत असल्याचे उघड झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने या ई-मेलवर करडी नजर ठेवण्यात आली होती. संशयित ई-मेल आढळल्यास संबंधित व्यक्तींना ही सुविधा नाकारली गेली आहे.

राणीच्या बागेतील गेंडय़ाचा संशयास्पद मृत्यू
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई प्राणीसंग्रहालयातील एका गेंडय़ाचा आज अचानक मृत्यू झाला. या संशयास्पद मृत्युमुळे पालिका प्रशासनाला धक्का बसला आहे. गेंडय़ाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

 

इंडियन पोलिटिकल लीग संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
प्रत्येक शुक्रवारी