Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९

बीडमध्ये ६६ टक्के मतदान
बीड, २४ एप्रिल/वार्ताहर

लोकसभेच्या निवडणुकीत बीड मतदारसंघात ६५.७६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ६८.०१ टक्के मतदान विधानसभेच्या परळी मतदारसंघात व सर्वात कमी ५९ टक्के मतदान बीड मतदारसंघात झाले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पंकजकुमार यांनी आज अंतिम टक्केवारी जाहीर केली.बीड मतदारसंघातील २१८ केंद्रांवर काल शांततेत मतदान झाले.

हर हर गंगे
केवळ अनुपमेय! हरि-द्वारच्या हरी की पावडी (हरीची पायरी) घाटावर सूर्यास्तानंतर गंगा नदीची गंगामैयाची जी दररोज आरती होते, तेव्हाची भक्तांची उन्मनी अवस्था आणि नदीच्या पात्रात श्रद्धापूर्वक सोडले जाणारे असंख्य दिवे. त्यामुळे दीप्तीमान होत चमचमणारे पाणी, आसमंतात गुंजणारे आरतीचे व मंगल वाद्यांचे सूर.. नास्तिक माणसालाही आस्तिकतेचा किंचित का होईना स्पर्श होईल असे सारे श्रद्धामय वातावरण. मी दुसऱ्यांदा गंगेची आरती पाहत होतो. पण तोच अनुभव व तीच अनुभूती. इथं धरण बांधून गंगा कॅनॉलमधून गंगेचं पाणी खेळवलं आहे.

निवडणूक खर्च प्रचंड? छे:, मुळीच नाही!
लक्ष्मण राऊत
जालना, २४ एप्रिल

लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवारास २५ लाख रुपये असली तरी प्रत्यक्षात त्यांचा खर्च किती होतो याबद्दल औत्सुक्य असतेच. या पाश्र्वभूमीवर जालना मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मतदानाच्या दिवसापर्यंत, म्हणजे २३ एप्रिलपर्यंत दाखल केलेला खर्च पाहिला तर तो या मर्यादेच्या खूपच आत असल्याचे दिसून येते.

कर्मचाऱ्यांची कुचंबणा
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

मतदानाचे तणावाचे काम संपल्यावर सुटकेचा नि:श्वास टाकण्याऐवजी लातूर मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना रात्रभर कुचंबणा सहन करावी लागली. मतदारसंघातील १ हजार ८३३ केंद्रांवर ११ हजार ४२९ निवडणूक कर्मचारी होते. कालच्या मतदानासाठी सर्व कर्मचारी बुधवारी (दि. २२) सकाळीच यंत्र व सर्व साहित्य घेऊन आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले. काल पहाटेपासूनच सर्व आवराआवर करून ६ वाजताच ते मतदान केंद्रावर दाखल झाले. काही गावांत कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था नीट झाली नाही तरीदेखील निवडणुकीचे काम म्हणून त्यांनी ते केले.

ढोकीच्या मारामारीत पाच जण जखमी
उस्मानाबाद, २४ एप्रिल/वार्ताहर

लोकसभा निवडणुकीतील मतदानावरून उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ओम राजेनिंबाळकर यांच्या समर्थकांत तुंबळ मारामारी झाली. यात पाच जण जखमी झाले. ढोकी पेट्रोलपंपाजवळ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही मारामारी झाली.विनोद किसन घोडसरे, रमेश विष्णू घोडसरे, सुनील नवनाथ लोमटे, नारायण दत्तू घोडसरे, कैलास शिनगारे या पाचजणांचा जखमींमध्ये समावेश आहे.

पाणीटंचाई उपाययोजनेबाबत वरातीमागून घोडे
तुकाराम झाडे
हिंगोली, २४ एप्रिल

जिल्ह्य़ात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटल्याने विंधन विहिरी कोरडय़ा पडू लागल्याने गावा-गावांतून टँकरची मागणी जोर धरू लागली. तीव्र पाणीटंचाईच्या निवारणास्तव सात कोटी ५४ लाखांचा मंजूर कृतिआराखडा कृतिविना कागदोपत्रीच उरला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ठरवून दिलेल्या निकषाकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीटंचाईवरील प्रशासनाच्या उपाययोजना म्हणजे वरातीमागून घोडे असेच चित्र आज तरी आहे!

लोह्य़ात कमळाला हाताची साथ!
गणेश कस्तुरे
नांदेड, २४ एप्रिल

मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विलासरावसमर्थक अपक्ष आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यात दोन आठवडय़ांपूर्वी झालेली दिलजमाई क्षणिक असल्याचे कालच्या मतदानानंतर स्पष्ट झाले. नेत्यांची युती झाली तरी कार्यकत्यांचे मनोमिलन होत नाही, असा संदेश काल देण्यात आला. एकेकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रताप पाटील-चिखलीकर ‘प्रायव्हेट लिमिटेड काँग्रेसचा’ आरोप करीत चव्हाण यांच्यापासून काही वर्षांपूर्वी दुरावले.

औरंगाबादमध्ये ५२ टक्के मतदान
कन्नड ,गंगापूर,वैजापूरमध्ये उत्साह

औरंगाबाद, २४ एप्रिल/खास प्रतिनिधी

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ५१.६२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जैस्वाल यांनी दिली. एकूण १४ लाख १५ हजार ७५५ पैकी ७ लाख ३० हजार ८५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी ५१.६२ टक्के इतकी आहे. त्यात ४ लाख १३ हजार ६०४ पुरुष, तर ३ लाख १७ हजार २४७ महिलांचा समावेश आहे.

नांदेड येथे१ मेपासून दिवसाआड पाणी
नांदेड, २४ एप्रिल/वार्ताहर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे येत्या दि. १ मेपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.यंदा जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने; तसेच गेल्या वर्षीपेक्षा तापमानात वाढ झाल्याने वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जखमी
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

औसा तालुक्यातील भादा येथे विष्णू सुदामा गायकवाड यांच्या आनंदनगर येथील घरावर आज मध्यरात्री दरोडा पडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांपैकी एकास पकडण्यात यश आले; तर सात जण पळून गेले. भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भादा येथील विष्णू सुदामा गायकवाड यांचा दुसरा मुलगा रेवण याचे लग्न गेल्या शनिवारी (दि. १८) झाले.

दोन तरुणांचा बुडून मृत्यू
मानवत, २४ एप्रिल/वार्ताहर

तालुक्यातील किन्होळा गावाजवळील जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये बुडून मानवतचे दोन तरुण मृत्युमुखी पडले. गुराख्यांच्या प्रसंगावधनामुळे तीन जण बचावले. अजहर कुरेशी याचा मृतदेह आज दुपारी १२ वाजता व चंद्रकांत ढवळे याचा मृतदेह सायंकाळी ५.३० वाजता सापडला.मानवतचे नऊ तरुण तालुक्यातील पोहंडुळ या गावाहून काल मित्राचे लग्न आटोपून मोटरसायकलींवरून मानवतकडे निघाले.

मराठवाडय़ात नीचांक!
मतदान ५४.१० टक्के
औरंगाबाद, २४ एप्रिल/
खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच मतदारसंघांमध्ये मतदानझाल्यानंतर विभागातील आठही मतदारसंघातील मतदान संपले आहे. दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५३.११टक्के मतदानाची नोंद झाली. पहिला आणि दुसरा टप्पा असा एकत्रित केला तर मराठवाडय़ात ५४.१० टक्के मतदान झाले आहे. सन १९९१नंतर प्रथमच मतदानाने नीचांक गाठला आहे. त्या वेळी मराठवाडय़ात ५०.८३ टक्के मतदान झाले होते.पहिल्या टप्प्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन मतदारसंघांमध्ये सरासरी ५५.७६ टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील पाच मतदारसंघांमध्ये ५३.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान बीड मतदारसंघात झाले आहे. तेथील मतदानाची टक्केवारी ६५.७६ आहे. मराठवाडय़ातील ८ जागांसाठी १५७ उमेदवार उभे आहेत.

प्राध्यापकांविरुद्ध गुन्हा
नांदेड, २४ एप्रिल/वार्ताहर

बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉटची विक्री करणाऱ्या प्राध्यापक संजय पवार याच्यासह दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनुसार, शारदानगर परिसरात राहणाऱ्या प्रा. संजय भोजू पवार व अविनाश राठोड या दोघांनी बनावट दस्तावेज तयार करून स्वत:च्या नावावर नसलेला एक प्लॉट इखरम्मा मुनगुट्टी यांना विकला. शारदानगर परिसरात असलेल्या देवेंद्रसिंघ को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील हा प्लॉट मुनगुट्टी यांनी २००५ मध्ये विकत घेतला. हा प्लॉट विक्रीसाठी काढल्यानंतर तेथे प्लॉटच नसल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुनगुट्टी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विविध गुन्ह्य़ांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश
जिंतूर, २४ एप्रिल/वार्ताहर

चोरी, बलात्कार, फसवणुकीच्या गुन्ह्य़ांतील आरोपींना पकडण्यास जिंतूर पोलिसांना अपयश आले असून पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात वरीलप्रमाणे अनेक गुन्हे जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल झाले असले तरी यातील एकही आरोपी जिंतूर पोलिसांना सापडलेला नाही, ही एक विशेष उल्लेखनीय बाब आहे.रॉयल ट्रेडर्सचा चालक-मालक बालाजी नाडलने अध्र्या किमतीत वस्तू देण्याचे आमीष दाखवून तीन कोटी रुपयांची लूट करून पलायन केले. येथील मोबाईल शॉपी व फोटोग्राफर यांचे दुकान फोडून दोन लाखांचा ऐवज चोरटय़ांनी पळविला. यानंतर श्री डिजिटल हे दुकान फोडून दुकानातील कॉम्प्युटरचे ८० हजारांचे वेगवेगळे साहित्य पळविले. इटोली येथील विवाहितेवर बलात्कार करून तिला जाळून घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. येथील शासकीय गोडावूनमधून सहा हजार क्विंटल धान्य गायब करून ५२ लाख रुपयांचा घोटाळा गोडावून संरक्षकाने केला. वरील सर्व प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हे तर दाखल झालेले आहेत; परंतु सर्व आरोपी फरारी आहेत.

शेतक ऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध
सोयगाव, २४ एप्रिल/वार्ताहर
निवडणुकीची धामधूम संपली, अता खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. संकटात सापडलेला शेती उद्योग दरवर्षी बहरेल अशी आशा ठेवून बळीराजा खरीप हंगामाचे नियोजन एप्रिलमध्ये सुरू करतो. शेतात नांगरणी सुरू झाली असून बैलाने शेत नांगरण्यापेक्षा ट्रॅक्टरने शेती नांगरणी करण्यास शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे. सध्या नांगरणीचे दर कमी आहे. मे व जूनमध्ये त्याचे भाव वाढतात. मार्चअखेर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोसायटीचे कर्ज फेडून टाकले. एप्रिल, मे महिन्यांत नांगरणी, बी-बियाणे यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी सोसायटीत कर्जासाठी चकरा माराव्या लागत आहे.दिवसेंदिवस पाऊस कमी होत असल्याने शेती उद्योग संकटात आहे. केवळ शेतीवर उपजीविका असल्याने उत्पन्नात घट होत असल्याने कमालीची अस्वस्थता आहे. लग्नसराई, खरीप हंगाम व शिक्षण हा सर्व खर्च दोन ते तीन महिने करावाच लागतो. कर्जमाफीचा दिलासा निवडक शेतकऱ्यांना मिळाला असला खरीप हंगामासाठी बहुतांश शेतकऱ्यांची मदार नवीन कर्जावर आहे.