Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘अभी भी मैं सोलह बरस का’!
दरबान, २४ एप्रिल / पीटीआय

 

आपल्या अद्वितीय क्रिकेट कर्तृत्वाने चाहत्यांनी हृदये जिंकणाऱ्या सचिनने आज वयाच्या ३७व्या वर्षांत पाऊल ठेवले, मात्र अजूनही आपण १६ वर्षांचेच असल्याची भावना सचिनने व्यक्त केली. इंडियन प्रीमियर लीगसाठी दक्षिण आफ्रिकेत असलेल्या सचिनने मुंबई इंडियन्स या आपल्या संघातील सहकाऱ्यांसह वाढदिवस साजरा केला.सचिन म्हणतो, मला अजूनही १६वर्षांचा असल्यासारखेच वाटते आहे. मला मिळालेल्या शुभेच्छा, आशीर्वाद किती हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. विक्रम मोडणे हे माझ्यादृष्टीने महत्त्वाचे नाही तर सामना जिंकण्याला मी प्रथम प्राधान्य देतो.
सचिनने सांगितले की, माझी क्रिकेटमधील आकडेवारी मी संघासाठी जे योगदान दिले, त्याचे केवळ प्रतिबिंब आहे, पण शेवटी क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. वैयक्तिक कामगिरीकडे आपण पाहात असलो तरी सरतेशेवटी संघ जिंकणेच अधिक महत्त्वाचे आहे. सचिनच्या संघसहकाऱ्यांसह पत्नी अंजली व मुलेही वाढदिवसाच्या या सोहळ्यात सहभागी झाली होती. सचिनच्या सहकाऱ्यांमध्ये त्याच्या संघातील हरभजनसिंग, झहीर खान यांच्याबरोबरच भारतीय संघातील त्याचा सहकारी युवराजसिंग हादेखील वाढदिवसाच्या समारंभात सहभागी झाला होता. सर्व सहकाऱ्यांनी त्याच्या चेहऱ्याला केक फासून वाढदिवसाचा आनंद साजरा केला.