Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रभाकरन पाणबुडीतून पळून जाण्याच्या तयारीत?
किलोनोची, २४ एप्रिल/ पीटीआय

 

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलमचा म्होरक्या व्ही.प्रभाकरन हा उत्तरेकडील भागात एका छोटय़ा पट्टय़ात लपून बसला असून तो त्याच्याजवळ असलेल्या पाणबुडीतून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे श्रीलंका लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज सांगितले.५८ व्या डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग ब्रिगेडियर शावेंद्र डीसिल्वा यांनी सांगितले की, प्रभाकरन हा नो फायरिंग झोनमध्ये लपलेला आहे. त्याचा मुलगा व टायगर्स इंटेलिजन्स प्रमुख पोट्टू अम्मान व सी टायगर प्रमुख सुसाय हे त्याच्यासमवेत आहे. त्यांच्याकडे एक पाणबुडी असून त्यातून ते पळून जाण्याची शक्यता आहे.
याच आठवडय़ात एलटीटीईचा माजी प्रवक्ता दया मास्टर याने प्रभाकरन याच्याकडे पाणबुडी असल्याची माहिती दिली आहे. अम्मान व सुसाय या दोघांचाच आता प्रभाकरनला आधार आहे. इतर नेते संधी मिळताच प्रभाकरनला सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, असे डीसिल्वा यांनी मास्टरच्या हवाल्याने सांगितले. दया मास्टर व जॉर्ज हे एकेकाळी एलटीटीईच्या राजकीय आघाडीचा प्रमुख एस.पी.थमिलचेलवन यांचे सहकारी होते. या दोघांनीही पुटुमथालन येथे नो फायर झोनमध्ये २२ एप्रिललला श्रीलंकेच्या लष्करापुढे शरणागती पत्करली होती. उत्तरेकडील मुलायटिवू भागात नौदलाने कोंडी केली आहे. एलटीटीईच्या बंडखोरांना या भागात सागराचा मार्ग खुला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात एलटीटीईचे ६१३ जवान मारले गेले आहेत.