Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कसाबच्या वयाची चाचणी आज
मुंबई, २४ एप्रिल / प्रतिनिधी

 

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब ‘अल्पवयीन’ आहे का हे निश्चित करण्यासाठी चौकशी करावी, ही अभियोग पक्षाने केलेली मागणी आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी मान्य करीत रेडियोलॉजिस्ट आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सकांकडून कसाबच्या हाडांची (ऑसिफिकेशन) आणि दातांची चाचणी करण्याचे आदेश तुरूंग प्रशासनाला दिले. तसेच या चाचणीचा अहवाल २८ एप्रिल रोजी न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही दिले. दरम्यान, याच मुद्दय़ाप्रकरणी अभियोग पक्षातर्फे २८ एप्रिल रोजी कसाबवर सर्वात पहिल्यांदाच उपचार करणारे नायर रुग्णालयाचे डॉक्टर आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
अभियोग पक्षाने एका अर्जाद्वारे कसाबविरुद्ध आरोप निश्चित होण्याआधी त्याच्या वयाबाबतचा मुद्दा निकाली काढण्याची आणि त्याबाबत चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर आज निर्णय देताना न्या. टहलियानी यांनी ज्युविनाईल जस्टीस अॅक्टच्या कलम ७ (ए) नुसार कसाबच्या अल्पवयीन असण्याच्या दाव्याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी रेडियोलॉजिस्टद्वारे त्याच्या हाडांची आणि न्यायवैद्यक दंतचिकित्सक त्याच्या दातांची चाचणी करण्याचेही निर्देश तुरूंग प्रशासनाला दिले. अटकेच्यावेळी जखमी झालेल्या कसाबला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याने स्वत:विषयी माहिती दिली होती. त्यात त्याच्या जन्मतारखेचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे त्याला पहिल्यांदा आर्थर रोड तुरूंगात पाठविण्यात आले तेव्हाही त्याची व्यक्तिगत माहिती तुरूंग प्रशासनाकडून नोंदविण्यात आली होती. त्यामुळे या चौकशीप्रकरणी आपण नायर रुग्णालयाचे त्याच्यावर सर्वात पहिल्यांदा उपचार करणारे डॉक्टर आणि आर्थर रोड तुरूंग अधीक्षकांची साक्ष नोंदवू इच्छितो, असे अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले. अभियोग पक्षाची ही मागणी मान्य करीत न्यायालयाने त्या दोघांना २८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, कसाब अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाले तर त्याचा खटला ‘ज्युविनाईल’ न्यायालयात वर्ग होईल. तसेच त्याने केलेला गुन्हा सिद्ध झाला तर त्या गुन्ह्यासाठी त्याला अवघ्या तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली.