Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लहानग्या अक्षताच्या चित्राला लाभले टपाल तिकिटाचे कोंदण!
मुंबई, २४ एप्रिल/प्रतिनिधी

 

खारच्या लहानग्या चाळीत राहणाऱ्या अक्षता चव्हाणला आता जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थाने ओळख मिळणार आहे. भारतीय टपाल विभागाने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविलेल्या अक्षताच्या चित्राचा सन्मान टपाल खात्याने स्टॅम्प बनवून केला आहे. अशा प्रकारचा सन्मान मिळविणारी अक्षता ही पहिली कर्णबधिर मुलगी आहे. साखरवाडी या सातारा जिल्ह्णाातल्या चव्हाण कुटुंबाचं वशंपरंपरागत काम आहे पाथरवटाचं. दगडाच्या खाणीतून मिळणाऱ्या दगडातून मूर्ती बनविणे, दगड फोडणे आदी कामे करतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी अक्षताचे वडील काही वर्षांपूर्वी मुंबईत आले. अक्षताचा जन्म मुंबईच्याच केईएम इस्पितळात झाला. जन्मत:च तिला एका कानाने ऐकू कमी येत होते तर दुसऱ्या कानाने अजिबात ऐकू येत नव्हते. पालिकेच्या शाळेत शिकत असताना तिचा हा कर्णदोष तिच्या पालकांच्या लक्षात आला आणि तिची रवानगी झाली कर्णबधिरांच्या विशेष शाळेमध्ये. अर्थात तोपर्यंत अक्षता सात वर्षांंची झाली होती. आग्रीपाडा येथील ‘सेंट्रल स्कूल फॉर द डेफ् ’ या शाळेमध्ये अक्षता शिकत आहे. गेल्या वर्षी तिला शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला होता. भारतीय टपाल विभागाने अलिकडेच एक चित्रकला स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेमध्ये तिला दुसरा क्रमांक मिळाला असून सहा हजार रुपयांचा पुरस्कार तिच्या चित्राला मिळाला आहे. यापेक्षाही सर्वाते मोठे यश आहे ते म्हणजे तिच्या चित्राची निवड टपाल खात्याने स्टॅम्प बनविण्यासाठी केली आहे. उद्या, शनिवार, २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील टपाल विभागाच्या मुख्यालयात या स्टॅम्पचे अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या वडिलांच्या समवेत जेव्हा ती उद्याच्या समारंभात उपस्थित राहील तेव्हा तिला आपल्या जन्मदात्रीची आठावण आल्याखेरीज राहणार नाही. कारण चारच वर्षांंपूर्वी तिच्या आईचे निधन झाले आहे. अक्षता सध्या खारला आजोळी राहात आहे. आपल्याला चित्रकलेचा छंद असला तरी त्यात आणखी पुढे शिकण्याची तिची इच्छा आहे.