Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बीडमध्ये ६६ टक्के मतदान
बीड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभेच्या निवडणुकीत बीड मतदारसंघात ६५.७६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ६८.०१ टक्के मतदान विधानसभेच्या परळी मतदारसंघात व सर्वात कमी ५९ टक्के मतदान बीड मतदारसंघात झाले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पंकजकुमार यांनी आज अंतिम टक्केवारी जाहीर केली.बीड मतदारसंघातील २१८ केंद्रांवर काल शांततेत मतदान झाले. श्री पंकजकुमार यांनी काल रात्री ८ वाजता प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ५४ ते ५५ टक्के मतदान झाल्याचे सांगितले होते. रात्री उशिरा प्रशासनाने अंतिम टक्केवारी निश्चित केली. त्यानुसार एकूण ६५.७६ टक्के मतदान झाले. विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी अशी : परळी - ६८.०१, केज - ६७.४४, माजलगाव - ६७.२३, गेवराई - ६६.७२, आष्टी - ६६.१८ आणि बीड - ५९.
सर्वत्रच साधारणपणे ५५ टक्क्य़ांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र प्रशासनाच्या अंतिम आकडेवारीत बीड मतदारसंघात ६५.७६ टक्के मतदान झाल्याने दुपारनंतर मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे यावरून स्पष्ट होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी पंकजकुमार यांनी गुरुवारी सायंकाळी आठ वाजता अंदाजे सरासरी मतदान ५४ ते ५५ टक्के झाल्याचे सांगितले. यात ३ ते ४ टक्क्य़ांची वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र अंतिम आकडेवारीत एकदम दहा टक्क्य़ांची वाढ झाल्याने मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज प्रशासकीय यंत्रणेलाही आला नाही.