Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

हर हर गंगे
केवळ अनुपमेय!

 

हरि-द्वारच्या हरी की पावडी (हरीची पायरी) घाटावर सूर्यास्तानंतर गंगा नदीची गंगामैयाची जी दररोज आरती होते, तेव्हाची भक्तांची उन्मनी अवस्था आणि नदीच्या पात्रात श्रद्धापूर्वक सोडले जाणारे असंख्य दिवे. त्यामुळे दीप्तीमान होत चमचमणारे पाणी, आसमंतात गुंजणारे आरतीचे व मंगल वाद्यांचे सूर.. नास्तिक माणसालाही आस्तिकतेचा किंचित का होईना स्पर्श होईल असे सारे श्रद्धामय वातावरण.
मी दुसऱ्यांदा गंगेची आरती पाहत होतो. पण तोच अनुभव व तीच अनुभूती. इथं धरण बांधून गंगा कॅनॉलमधून गंगेचं पाणी खेळवलं आहे. थंडगार, प्रचंड वेगानं खळाळत जाणारं पाणी. घाटाला साखळ्या बांधलेल्या. भक्तांना घाटात उतरून स्नान करताना पाण्याच्या वेगानं वाहून जाऊ नये म्हणून आधारासाठी उपयुक्त होत्या. त्याला धरून मी पाण्यात उतरलो. थंडगार पाण्यानं दिवसभर उन्हात तापलेले पाय विलक्षण सुखावले.
पण त्याहीपेक्षा तो गंगेच्या आरतीचा नजारा नजरेचं पारणं फेडणारा आणि चित्तात ठसणारा होता. नुकताच सूर्यास्त झाला होता. अजूनही काहीसा संधिप्रकाश होता. हजारो प्रवासी व भक्त हरी की पावडीच्या दोन्ही काठांवर गर्दी करून होते. भगव्या कफनीतले साधू व पुजारी श्रद्धापूर्वक गंगामातेची आरती करीत होते. भक्तमंडळी टाळ्यांनी प्रतिसाद देत होती. आणि एक एक भक्त हातातला दिवा पेटवून हलकेच पाण्यात सोडत होता. अशा हजारो दिव्यांनी हरी की पावडी दिवाळीप्रमाणे तळपत होती आणि त्यांच्या हलत्या शेकडो प्रतिबिंबांनी गंगेचं पाणी अद्भूत आकर्षक वाटत होतं!
आरतीपूर्वी तिथं येताना भक्तिगीतांच्या कॅसेट/सीडी पूर्ण आवाजात वाजत होत्या. एक गाणं ओळखीचं होतं! ‘मैया, गंगामैया, गंगामैया में जब तक के पानी रहे, मेरे सजना तेरी जिंदगानी रहे’ सत्तरच्या दशकातल्या ‘सुहाग रात’ हा सिनेमा आज केवळ सदाबहार गाण्यांमुळे लक्षात आहे.
गेले महिनाभर मी मुजफ्फर या उत्तर प्रदेशाच्या जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून होतो. कामाचा भाग म्हणून एक एक गाव- एक एक मतदान केंद्र पाहत हिंडत होतो. कोल्हापूर- साताऱ्याची आठवण यावी असा ऊसशेती व गव्हाच्या पिकांनी डोलणारा हरित भाग डोळे सुखावणारा होता. गंगानहरमुळे पूर्ण सुजल-सुफल. प्रत्येक गावाला गंगा नदी किंवा गंगानहरचं सान्निध्य लाभलेलं. अक्षरश: ‘गंगा आली रे अंगणी’ असं वरदान या जिल्ह्य़ाला लाभलेलं.
इथं हिंडताना व लोकांशी बोलताना ‘गंगा हमारी पहेचान है’ हे पालुपद सदैव कानी पडायचं. खरंय- केवळ मुजफ्फरनगर नाही तर साऱ्या उत्तर भारताला गंगेचं वरदान लाभलंय. सुपीक जमीन. बारमाह सिंचन. त्यामुळे गहू, तांदूळ व उसाचं पीक यानं शेतकरी समृद्ध झालेला. म्हणून तो गंगामैयाचा परमभक्त.
गंगेचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास. भारतीय संस्कृती व परंपरेची गौरवशाली वाटचाल. एकूण भारतीयत्वाची गंगा म्हणजे खूणगाठ- जणू आंतरिक जिव्हाळ्याची रेशीमगाठ! म्हणूनच शैलेंद्रसारखा जनकवी लिहून जातो, ‘हम तो उस देश के वासी है, जिस देश में गंगा बहती है’. ऋग्वेदात नदी सुक्तामध्ये गंगेचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. तिच्या जन्माची कहाणी अद्भूत आहे. भगीरथानं प्रयत्नपूर्वक गंगा आणली. त्यामुळे भारतीयांसाठी गंगा ही केवळ नदी नाही तर ती माता, देवता आहे. परंपरा व संस्कृती आहे. प्रत्येक हिंदूला एकदा तरी गंगास्नान करण्याची आस असते. जुन्या काळी व आजही बऱ्याच घरी गंगाजलाची कुपी ठेवली जाते. माणसाचा अंतसमय आला की, त्याला गंगाजल पाजलं जातं. त्यामुळे मोक्ष मिळतो व जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते, ही हिंदू माणसांची श्रद्धा आहे. गंगाकिनारी हरिद्वारला कुंभमेळा भरतो व छटपूजाही केली जाते.
पाश्चात्यानाही गंगेचं आकर्षण फार पूर्वीपासून वाटत आलं आहे. गंगेचा पहिला उल्लेख मेगास्थेनस यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध ‘इंडिका’ ग्रंथात केला आहे. रोमच्या जगभरच्या प्रवाशांचं आकर्षण केंद्र बनलेल्या ‘पाझ्झा नवोना’ या गिऊन लोरेंझो बर्निनी यांनी १६५१मध्ये बांधलेल्या शिल्पात चार नद्या- गंगा, नाईल, दुनावे व रिओ दि ला प्लाटा दर्शविल्या आहेत, त्या त्या काळी ज्ञात असलेल्या चार खंडांचं प्रतिनिधित्व करतात.
गंगेवर अनेकांनी प्रेम केलं. त्यातला सर्वश्रेष्ठ प्रेमिक म्हणजे पंडित नेहरू. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी काव्यमय भाषेत आपली रक्षा गंगेत व सागरात विसर्जित करावी असं लिहून ठेवलं. विद्याधर पुंडलिकांनी ‘दोन मृत्युपत्रे’ या बहारदार लेखामध्ये नेहरूंच्या गंगाप्रेम व त्या मागच्या त्यांच्या काव्यात्मक आणि काहीशा आध्यात्मिक भूमिकेवर प्रकाशझोत टाकला आहे. पंडित नेहरूंनी आपल्या शैलीदार इंग्रजीत त्यासंबंधी लिहिलं आहे. त्याचा भाषानुवाद न करता त्याची वाचकांना लज्जत मिळावी म्हणून मूळ इंग्रजीतल्या केवळ एक परिच्छेद उद्धृत करतो.
The Ganga especially, is the river of India, beloved of her people, round which are interwined her memories, her hopes and fears, her song of triumph, her victories and her defeats. She has been a symbol of India’s age-long culture and civilization, ever changing, ever flowing and ever the same Ganga.’
हरिद्वारला गंगेची आरती अनुभवताना मी कानपूर, बिठूर (तेच जेथे नानासाहेब पेशव्यांना ब्रिटिशांनी बंदिवासात ठेवले होते.) आणि हृषीकेशला पाहिलेली व अनुभवलेली गंगा आठवत होतो. हृषीकेश, जेथे पर्वतातून गंगा पठारावर अवतरते व जेथे शुभ्र मऊसुत चंदेरी वाळू आहे. बिठूर- जेथे विस्तीर्ण क्षितिजापर्यंत पोहोचलेलं गंगेचं संथ झालेलं पात्र आहे आणि कानपूर, जिथं चर्मोद्योगानं अक्षरश: ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ आठवत होती. त्या साऱ्याहून नितळ, स्वच्छ आणि वेगवान गंगा हरिद्वारला आहे. जिथं गंगेची रोज आरती करून तिचे पुत्र आपल्या भारतीय संस्कृतीला वंदन करतात व कृतज्ञता व्यक्त करतात.
मीही भावूक झालो होतो. कारण देव न मानणाऱ्या माझ्या नास्तिक मनाला अस्तित्वाचा स्पर्श झाला होता. असंच अंत्यसमयी नास्तिक पंडित नेहरूंचं झालं होतं, त्यामुळेच त्यांनी मृत्यूनंतर रक्षा विसर्जनाच्या माध्यमातून तिच्याशी एकरूप व्हायचा ध्यास घेतला होता. माझं काय होईल माहीत नाही. पण आज मात्र मीही त्या हजारो भक्तांमध्ये सामील झालो होतो व म्हणत होतो, ‘हर हर गंगे, हर हर गंगे!’