Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणूक खर्च प्रचंड? छे:, मुळीच नाही!
लक्ष्मण राऊत
जालना, २४ एप्रिल

 

लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा प्रत्येक उमेदवारास २५ लाख रुपये असली तरी प्रत्यक्षात त्यांचा खर्च किती होतो याबद्दल औत्सुक्य असतेच. या पाश्र्वभूमीवर जालना मतदारसंघातील दोन प्रमुख उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मतदानाच्या दिवसापर्यंत, म्हणजे २३ एप्रिलपर्यंत दाखल केलेला खर्च पाहिला तर तो या मर्यादेच्या खूपच आत असल्याचे दिसून येते.
काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी अर्ज भरण्याच्या दिवशी जालन्यातून मिरवणूक काढून आणि नगरपालिकेच्या क्रीडा संकुलावर जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांच्या प्रचारासाठी शहरात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची सभा झाली. त्याचप्रमाणे पैठण येथे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बदनापूर येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सिल्लोड येथे नारायण राणे आदींच्या जाहीर सभा झाल्या. या शिवायही अनेक लहान-सहान सभा, पदयात्रा, मिरवणुका निघाल्या. मतदानाच्या दिवशी विधानसभेच्या सहाही मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांची व्यवस्था करावी लागली.
अर्ज भरण्याच्या दिवसापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत डॉ. काळे यांनी निवडणूक विभागाकडे दाखविलेला खर्च १० लाख ७४ हजार ७८५ रुपये आहे. श्रीमती गांधी यांची जालन्यात झालेली सभा डॉ. काळे आणि औरंगाबादचे उमेदवार उत्तमसिंह पवार यांच्यासाठी संयुक्तरीत्या घेण्यात आली होती. या सभेचा खर्च दोन्ही उमेदवारांवर टाकण्यात येणार आहे. यापैकी २ लाख २८ हजार ५०९ रुपये खर्च डॉ. काळे यांनी आपल्या नावावर दाखविलेला आहे. सोनियांच्या सभेचा हा खर्च त्यांनी २३ एप्रिलपर्यंत दाखविलेल्या खर्चातच समाविष्ट आहे.
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा २३ एप्रिलपर्यंतचा खर्च डॉ. काळे यांच्यापेक्षा कमी आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. मिरवणूक काढली होती आणि जाहीर सभाही घेतली होती. त्यांच्या प्रचारासाठी शहरातील आझाद मैदानावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. याचा त्यांनी निवडणूक विभागाकडे दाखविलेला खर्च २ लाख ६८ हजार २१९ रुपये आहे. त्यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह, प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आदींच्या सभा मतदारसंघात झाल्या. याशिवाय बैठका, पदयात्रा, मिरवणुका आणि लहान-सहान सभाही झाल्या. निवडणूक प्रचार संपण्याच्या दिवशी दानवे यांच्या प्रचारासाठी जालना शहरातून मोठी मोटारसायकल रॅलीही निघाली होती. मतदानाच्या दिवसापर्यंत म्हणजे २३ एप्रिलपर्यंत झालेला जो खर्च श्री. दानवे यांनी निवडणूक विभागाकडे दाखविला आहे तो आहे नऊ लाख ६३ हजार ९१२ रुपये.
डॉ. काळे आणि श्री. दानवे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या बडय़ा नेत्यांनी वापरलेल्या हेलिकॉप्टरच्या खर्चाचा हिशेब जालना येथील निवडणूक विभागाकडे मात्र उपलब्ध नाही. हा खर्च हेलिकॉप्टरचा वापर झालेल्या दिवशी त्या नेत्याने जेवढय़ा सभा घेतल्या असतील त्या सर्व उमेदवारांवर विभागून टाकण्यात येतो किंवा पक्षाच्या नावावर टाकण्यात येतो, असे सांगण्यात आले. या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक काळात विविध वृत्तपत्रांत दिलेल्या जाहिरातींचा खर्चही अद्यापि निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेला नाही. हा खर्च सादर करण्यासाठी निवडणूक विभागाने या उमेदवारांना पत्रे पाठविली आहेत. दरम्यान, निवडणूक विभागाने या उमेदवारांच्या विविध वृत्तपत्रांत आलेल्या जाहिराती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या वृत्तपत्रांना मान्य केलेल्या जाहिरात दरानुसार हा खर्च निश्चित करण्यात येणार असल्याचे जालना येथील निवडणूक विभागात प्रचाराचा खर्च जमा करण्याची जबाबदारी असलेल्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.