Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

कर्मचाऱ्यांची कुचंबणा
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

मतदानाचे तणावाचे काम संपल्यावर सुटकेचा नि:श्वास टाकण्याऐवजी लातूर मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना रात्रभर कुचंबणा सहन करावी लागली.
मतदारसंघातील १ हजार ८३३ केंद्रांवर ११ हजार ४२९ निवडणूक कर्मचारी होते. कालच्या मतदानासाठी सर्व कर्मचारी बुधवारी (दि. २२) सकाळीच यंत्र व सर्व साहित्य घेऊन आपापल्या केंद्रांकडे रवाना झाले. काल पहाटेपासूनच सर्व आवराआवर करून ६ वाजताच ते मतदान केंद्रावर दाखल झाले. काही गावांत कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था नीट झाली नाही तरीदेखील निवडणुकीचे काम म्हणून त्यांनी ते केले.
सायंकाळी ५ वाजता मतदान संपल्यानंतर सर्व आकडेवारी तयार करून मतदानयंत्रांना ‘सील’ केल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांना लातूर येथे येण्याचा आदेश मिळाला. काही मतदान केंद्रअधिकाऱ्यांनाही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बोलावल्याचे सांगण्यात आले. मतपेटय़ा घेऊन ही मंडळी रात्री दाखल झाली. एखाद्या केंद्रावर ७० टक्क्य़ांपेक्षा जास्त मतदान झाले असेल किंवा फार कमी मतदान झाले असेल, तर अशा मतपेटय़ांची पाहणी व तपशील निवडणूक निरीक्षक स्वत: करणार असल्याचे सांगण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांत महिला कर्मचारीही होत्या. आदेश म्हणून रात्रभर या सर्वाना झोपता आले नाही. गरज नसताना अनावश्यक बोलावण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अकारण ताण पडला व सरकारचा खर्चही अधिक झाल्याच्या तक्रारी अनेक कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.