Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ढोकीच्या मारामारीत पाच जण जखमी
उस्मानाबाद, २४ एप्रिल/वार्ताहर

 

लोकसभा निवडणुकीतील मतदानावरून उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ओम राजेनिंबाळकर यांच्या समर्थकांत तुंबळ मारामारी झाली. यात पाच जण जखमी झाले. ढोकी पेट्रोलपंपाजवळ दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही मारामारी झाली.विनोद किसन घोडसरे, रमेश विष्णू घोडसरे, सुनील नवनाथ लोमटे, नारायण दत्तू घोडसरे, कैलास शिनगारे या पाचजणांचा जखमींमध्ये समावेश आहे. राजपाल गुणवंत देशमुख, राहुल रामू देशमुख, परवेज काझी, शिवराम बबन घोडके यांनी मारहाण केली असल्याचे जखमींनी पोलिसांना सांगितले. तथापि रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
मतदानादिवशी ढोकीजवळील गोवर्धनवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते. मतदान प्रतिनिधी नसतानाही ते मतदान केंद्रापर्यंत घुसल्याने ओम राजे यांच्या समर्थकांनी त्यांना अडविले. त्या वेळी झालेल्या बाचाबाचीचा मनात राग धरून तेथील पाच कार्यकर्त्यांना आज चर्चेसाठी या, असा निरोप पाठविण्यात आला होता. प्रकरण वाढू नये म्हणून गेलेल्या कार्यकर्त्यांना लाठय़ा-काठय़ांनी मारहाण झाली. या मारामारीतील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींची विचारपूस करण्यासाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर रुग्णालयात आले होते. अशा प्रकारची मारामारी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.