Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पाणीटंचाई उपाययोजनेबाबत वरातीमागून घोडे
तुकाराम झाडे
हिंगोली, २४ एप्रिल

 

जिल्ह्य़ात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी घटल्याने विंधन विहिरी कोरडय़ा पडू लागल्याने गावा-गावांतून टँकरची मागणी जोर धरू लागली. तीव्र पाणीटंचाईच्या निवारणास्तव सात कोटी ५४ लाखांचा मंजूर कृतिआराखडा कृतिविना कागदोपत्रीच उरला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ठरवून दिलेल्या निकषाकडे दुर्लक्ष होत आहे. पाणीटंचाईवरील प्रशासनाच्या उपाययोजना म्हणजे वरातीमागून घोडे असेच चित्र आज तरी आहे!
जिल्ह्य़ात यंदा अत्यंत कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन ऑक्टोबरमध्येच तीन टप्प्यांमध्ये अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने टंचाई कृतिआराखडा मंजूर केला. सात कोटी ५४ लाख रुपये खर्चाच्या कृतिआराखडय़ात नवीन विंधन विहिरी, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नळयोजनांची विशेष दुरुस्ती आदी कामांचा सहभाग त्यामध्ये होता. नवीन ४३५ विंधन विहिरींना मान्यता मिळाली. त्यातून १५९ विंधन विहिरी घेण्यात आल्या; त्यापैकी २० कोरडय़ा आहेत. एकशे तीस विहिरींवर पंप बसविण्याचे काम झाले. विंधन विहिरी घेण्यासाठी सात यंत्रे असली तरी त्यातील चार यंत्रे दि. १३ एप्रिलपासून नादुरुस्त असल्याने तीन यंत्रांवरच काम चालू आहे. तेव्हा उर्वरित विंधन विहिरीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माणझाले आहे.
नवीन विंधन विहिरींबाबत घालून दिलेली अट विहीर २०० फुटांपर्यंत घेता येते; परंतु वाढते तापमान लक्षात घेता पाण्याची पातळी झपाटय़ाने खाली जात आहे. त्यामुळे २०० फुटांवर पाणी लागण्याची आशा दुरावली आहे. विशेष म्हणजे भूजल सर्वेक्षणाच्या अधिनियमाचे पालन होत नाही. नियमाप्रमाणे पाणीपुरवठा योजनेची विहीर असो या विंधन विहिरीपासून ५०० मीटर अंतरापर्यंत इतरांना नवीन विंधन विहीर अथवा विहीर घेता येत नाही. मात्र याकडे यंत्रणेचे साफ दुर्लक्ष होत असून आज ग्रामीण भागात ३०० ते ४०० फूट खोलीच्या विंधन विहिरी घेण्याचे काम चालू असल्याने पाणीपुरवठय़ाच्या विंधन विहिरी कोरडय़ा पडत आहेत. याकरिता भूजल अधिनियमाचे पालन ही काळाची गरज आहे.
याशिवाय विशेष घटक योजनेत जिल्ह्य़ात सुमारे १२० विंधन विहिरी घेतल्या. यामध्ये ११५ विहिरींवर पंप बसवले तर पाच विहिरी कोरडय़ा आहेत. नव्वद खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यामधून पाणीपुरवठा होत आहे. एकूण १८ टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा होत असला तरी ग्रामीण भागातील वाढती टँकरची मागणी लक्षात घेता किमान ८० नवीन टँकर लागतील. जिल्ह्य़ात नळयोजना विशेष दुरुस्तीचे एकूण ६२ प्रस्ताव होते. त्यापैकी ४० प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. तात्पुरती पूरक योजनेत चोपन्नपैकी ३० योजनांना मान्यता देण्यात आली आहे. नळयोजना विशेष दुरुस्तीअंतर्गत मान्यता मिळालेल्या वाझोळा, जयपूरवाडी, इसापूर तांडा, चिखलागर तांडा, सालेगाव, हयातनगर, दारेफळ, मालधावडा, नोल्डा देवजना या गावांतील कामास आतापर्यंत प्रारंभ झालेला नाही. साळवा, डिग्रस, कोठूर, भगवती या गावांच्या कामांना तर आजपर्यंत कार्यादेश देण्याचे बाकी आहे. तेव्हा या नळयोजनांच्या विशेष दुरुस्ती कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशीच अवस्था तात्पुरती पूरक योजनेच्या कामाची आहे. अठ्ठावीसपैकी चार योजनांचे काम प्रगतीपथवार आहे, तर सहा योजना कार्यान्वित झाल्या आहेत. एकूण जिल्ह्य़ातील जलस्वराज्य योजनेत पाणीपुरवठा, भारत निर्माण, २६ गावे सिद्धेश्वर पाणीपुरवठय़ाची अवस्थासुद्धा वाईटच असल्याने जिल्ह्य़ातील पाणीटंचाई निवारण व्यवस्थेच्या कामावर लक्ष टाकले असता प्रशासकीय यंत्रणेचे कार्य वरातीमागून घोडे अशीच ठरली आहे. यंत्रणेमार्फत चालू असलेले कासव गतीचे काम या उन्हाळ्यात जनतेच्या उपयोगी ठरेल, याची यंत्रणेलाच शाश्वती नसल्याची चर्चा आहे.