Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

लोह्य़ात कमळाला हाताची साथ!
गणेश कस्तुरे
नांदेड, २४ एप्रिल

 

मुख्यमंत्री अशोक चव्हाण व विलासरावसमर्थक अपक्ष आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्यात दोन आठवडय़ांपूर्वी झालेली दिलजमाई क्षणिक असल्याचे कालच्या मतदानानंतर स्पष्ट झाले. नेत्यांची युती झाली तरी कार्यकत्यांचे मनोमिलन होत नाही, असा संदेश काल देण्यात आला. एकेकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रताप पाटील-चिखलीकर ‘प्रायव्हेट लिमिटेड काँग्रेसचा’ आरोप करीत चव्हाण यांच्यापासून काही वर्षांपूर्वी दुरावले. श्री. चव्हाण यांच्यापासून दुरावलेल्यापैकी बहुतांश नेत्यांनी अन्य पक्षांचा आश्रय घेत आपले अस्तित्व निर्माण केले; परंतु श्री. चिखलीकर यांनी मित्रमंडळाच्या माध्यमातून स्वत:चे अस्तित्व तर निर्माण केलेच; शिवाय काँग्रेसचे सहयोगी आमदार असूनही वेगवेगळ्या प्रकरणांत अशोकरावांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रतापाला बळ देण्याचे लातूरकरांनी काम पार पाडले. ज्या ज्या वेळी चिखलीकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत मागतील; त्या त्यावेळी लातूरकरांनी सढळ हाताने त्यांना रसद पुरविली.
श्री. चव्हाण यांच्या जिल्ह्य़ात त्यांच्याच एका जुन्या समर्थकाला लातूरहून पाठबळ मिळाल्याने चव्हाण-चिखलीकर वाद विकोपाला गेला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वाना सोबत घेण्याचा निर्धार केलेल्या श्री. चव्हाण यांनी प्रतापरावांशी हातमिळवणी केली. ‘झाले गेले विसरून जा आणि मदत करा,’ असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन करताच श्री. चिखलीकर यांनी शेवटच्या टप्प्यात हाताला साथ दिली. नांदेडनंतर आठवडाभराने, काल झालेल्या लातूर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला उपद्व्याप आज समोर आला. माजी मुख्यमंत्री व चिखलीकर यांची अडचण व्हावी यासाछी कंधार-लोहा भागातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाताला साथ देण्याऐवजी कमळ हातात घेतले होते, अशी चर्चा आहे!
लोहा व कंधार भागातल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समर्थकांना कानमंत्र देऊन श्री. चिखलीकर यांना अडचणीत आणण्याचा प्रताप केल्याने मित्रमंडळाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. ओठात एक आणि पोटात एक अशी दुहेरी नीती वापरून काँग्रेस कार्यकर्ते वागतील याची आम्हाला कुणकुण लागली होती, असे मित्रमंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने, तसेच चिखलीकर विरोधकांनी एकत्रित येऊन साथ दिल्याचे सांगण्यात आले.
निवडणुकीच्या निमित्ताने कुरघोडी करण्याचे कारस्थान करणाऱ्यांना कितपत यश येते याचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतर मिळणार असले तरी चिखलीकर-चव्हाण यांच्यातील दिलजमाई क्षणिक असल्याचे स्पष्ट झाले.
नांदेड आणि लातूर मतदारसंघात दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला तर ठीक; अन्यथा या दोन नेत्यांमधील वाद निश्चित वाढेल, असे मानले जाते. बंद खोलीत चर्चा होऊन नेते एकत्र आले तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन होत नाही, याचा प्रत्ययही काल कंधार-लोहा भागात आला.