Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

औरंगाबादमध्ये ५२ टक्के मतदान
कन्नड ,गंगापूर,वैजापूरमध्ये उत्साह
औरंगाबाद, २४ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ५१.६२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जैस्वाल यांनी दिली.
एकूण १४ लाख १५ हजार ७५५ पैकी ७ लाख ३० हजार ८५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची सरासरी ५१.६२ टक्के इतकी आहे. त्यात ४ लाख १३ हजार ६०४ पुरुष, तर ३ लाख १७ हजार २४७ महिलांचा समावेश आहे. या मतदान यंत्रामध्ये २२ उमेदवारांचे भवितव्य बंद झाले आहे. मतदानासाठी ओळखपत्राची अट आणि वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे मतदानात घट झाली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तमसिंह पवार, शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, जनार्दन स्वामी पिठाचे उत्तराधिकारी व अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज, मनसे पुरस्कृत सुभाष पाटील, ब.स.पा.चे सय्यद सलीम, क्रांती सेनेचे माणिकराव शिंदे यांच्यासह २२ उमेदवारांचे भवितव्य १६ मे रोजी स्पष्ट होणार आहे. औरंगाबाद मतदारसंघामध्ये तीन शहरी आणि तीन ग्रामीण अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता.
कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांमध्ये मतदान चांगले झाले आहे. वैजापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ५९.४४ टक्के आणि सर्वात कमी औरंगाबाद ४६.२४ टक्के मतदान झाले आहे. औरंगाबाद शहरातील मतदारांमध्ये उत्साहच नव्हता. त्याचा फटका मतदानाला बसला आहे. सरासरी ४७ टक्के मतदान औरंगाबाद शहरात झाले आहे.
विधानसभानिहाय झालेले मतदान असे- (टक्केवारी)- कन्नड-२,५१,३२८ पैकी १,३०,४३४ (५१.९० टक्के); औरंगाबाद मध्य- २,३८,६६८ पैकी १,१५,६९८ (४८.४८ टक्के); औरंगाबाद पश्चिम- २,२८,०८३ पैकी १,०४,०१७ (४६.२४ टक्के); औरंगाबाद पूर्व- २,२४,९४१ पैकी १,१२,९०० (४९.५० टक्के); गंगापूर- २,३३,३९१ पैकी १,२५,५४३ (५३.७९ टक्के); वैजापूर- २,३९,३४४ पैकी १,४२,२५९ (५९.४४ टक्के); एकूण मतदान-१४,१५,७५५ पैकी ७ लाख ३० हजार ८५१ (५१.६२ टक्के).