Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेड येथे१ मेपासून दिवसाआड पाणी
नांदेड, २४ एप्रिल/वार्ताहर

 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे येत्या दि. १ मेपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.यंदा जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने; तसेच गेल्या वर्षीपेक्षा तापमानात वाढ झाल्याने वेगवेगळ्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयात ४.६३ टक्केच पाणीसाठा आहे. काटकसरीने वापर केल्यास विष्णपुरी जलाशयातील पाणी जून पर्यंतच पुरेल असे संबंधित विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेने १ मेपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
उन्हाच्या तीव्रतेमुळे जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. जिल्ह्य़ातील सर्व लघु, मध्यम व मोठय़ा प्रकल्पांमध्ये एकूण ९.३५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे येत्या महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. विनाकारण पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासनाने केले आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून दुरुस्तीसाठी शहराच्या काही भागांतील पाणीपुरवठा बंद होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने पाणीपुरवठा आजपासून सुरळीत झाला.