Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दरोडेखोरांच्या मारहाणीत चार जखमी
लातूर, २४ एप्रिल/वार्ताहर

 

औसा तालुक्यातील भादा येथे विष्णू सुदामा गायकवाड यांच्या आनंदनगर येथील घरावर आज मध्यरात्री दरोडा पडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांपैकी एकास पकडण्यात यश आले; तर सात जण पळून गेले. भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भादा येथील विष्णू सुदामा गायकवाड यांचा दुसरा मुलगा रेवण याचे लग्न गेल्या शनिवारी (दि. १८) झाले. लग्न थाटामाटात झाल्यामुळे दरोडेखोरांनी ते घर हेरले होते. मध्यरात्री भादा येथील मल्लिकार्जुन स्वामी यांच्या घरातील तीन हजार रुपये रोख व एक मंगळसूत्र, श्रीपती सरवदे यांच्या घरातील रोख १० हजार रुपये व काही सोने चोरी करून दरोडेखोर विष्णू गायकवाड यांच्या घरकडे वळाले. विष्णू सुदामा गायकवाड व त्यांची मुले शिवदास, रेवण व नगनाथ घरातच होते. दरोडेखोरांनी अंगठी काढून घेत असताना झटापट सुरू झाली. विष्णू गायकवाड यांच्या डोक्यावर व छातीत दरोडेखोरांनी दगड घातला. शिवदास गायकवाडच्या पायावर एक वार केला. नागनाथ गायकवाड याच्यावर दरोडेखोर वार करीत असताना रेवणने एका दरोडेखोरास पकडून ठेवले. त्यामुळे चिडून रेवणच्या अंगावर दरोडेखोरांनी ११ वार केले. मात्र रेवणने दरोडेखोराला सोडले नाही. त्यामुळे सहा-सात दरोडेखोर पळून गेले.
पकडलेल्या दरोडेखोरास बांधून ठेवून गायकवाड कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. गायकवाड कुटुंबातील चौघांनाही लातूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पकडलेल्या दरोडेखोरावरही उपचार सुरू आहेत. तो बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे अधिक तपशील मिळाला नाही.