Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

दोन तरुणांचा बुडून मृत्यू
मानवत, २४ एप्रिल/वार्ताहर

 

तालुक्यातील किन्होळा गावाजवळील जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये बुडून मानवतचे दोन तरुण मृत्युमुखी पडले. गुराख्यांच्या प्रसंगावधनामुळे तीन जण बचावले. अजहर कुरेशी याचा मृतदेह आज दुपारी १२ वाजता व चंद्रकांत ढवळे याचा मृतदेह सायंकाळी ५.३० वाजता सापडला.मानवतचे नऊ तरुण तालुक्यातील पोहंडुळ या गावाहून काल मित्राचे लग्न आटोपून मोटरसायकलींवरून मानवतकडे निघाले. अजहर कुरेशी (वय १८), चंद्रकांत ढवळे (वय १८), विनोद भोले (वय १८), भरत सोळंके (वय २०), स्वप्नील गोवंदे (वय १८), मंगेश राक्षे (वय १८), सिद्धार्थ मोरे (वय २१), सचिन तुपसमिंद्रे (वय १८) आणि रोहित उदावंत (वय १९) अशी त्यांची नावे. किन्होळा गावाजवळील असणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्यामध्ये ते सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास अंघोळीसाठी उतरले. शेळ्या चारणारे गुराखीही जवळ होते. कालव्याच्या पाण्याचा वेग जोरात होता व पाण्याची खोली लक्षात न आल्याने पाच तरुण पाण्यात वाहून जाताना मित्रांनी आरडाओरड करीत मदत मागितली. जवळच असणाऱ्या गुराख्यांनी बांबूच्या साह्य़ाने तिघांना वर काढले; परंतु अजहर कुरेशी व चंद्रकांत ढवळे हाती लागले नाहीत.रात्रभर दोघांचा शोध घेण्यात आला. अजहरचा मृतदेह परभणी तालुक्यातील सिंगणापूर शिवारात व चंद्रकांतचा मृतदेह तालुक्यातील ढगे पिंपळगावला सापडला. यातील काहींनी बारावीची परीक्षा दिली होती, तर काही पुढील शिक्षणाच्या तयारीत होते.