Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बंदोबस्तावरून पोलीसदादा खूश होऊन परततात तेव्हा..
औरंगाबाद, २४ एप्रिल/प्रतिनिधी

 

निवडणुकीचा बंदोबस्त म्हटला की प्रचंड ताण आणि वरिष्ठांचे दडपण. अनुचित काही घडू नये म्हणून पावलोपावली खबरदारी घेऊनही पुन्हा वाटय़ाला येते ती बदनामीच. त्यामुळे कधी एकदाची निवडणूक संपते आणि आपण यातून सुटतो असे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना झालेले असते. काल मतदान झाले आणि बंदोबस्तासाठी असलेले तसेच बाहेरगावाहून आलेले कर्मचारी अधिकारी आज घरी परतले ते खुशीतच. कारण एक - मतदान शांततेत झाले आणि कारण दोन - जाता जाता बंदोबस्तासाठी आयोगाने जाहीर केलेली रक्कमही हाती पडली!
ही रक्कम आयोगाने जाहीर केली असली तरी लगेच हाती पडेल, याची कोणालाच खात्री नव्हती. त्यामुळे ही निवडणूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तशी दुहेरी आंनदाची ठरली. वाद नाही, फारसा ताणही नाही आणि वरून अनपेक्षितपणे हाती रक्कम. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात सात लाख रुपये कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. निवडणुकीचे काम केले म्हणून अशा प्रकारे भत्ता मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
निवडणुकीच्या कामाला जुंपलेल्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्त आणि जेवण भत्ता देण्याचे आयोगाने जाहीर केले होते. दोन्ही मिळून कर्मचाऱ्यांना दररोज १७५ रुपये व अधिकाऱ्यांना २५० रुपये भत्ता जाहीर झाला होता.
ही रक्कम केव्हा मिळणार हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे आयोगाने ही रक्कम संबंधित जिल्हा तसेच आयुक्तालयाच्या मुख्यालयात जमा केली होती.
मतदान संपल्यानंतर काल सायंकाळी कर्मचारी आपआपल्या पोलीस ठाण्याला जमा झाले. बाहेरचे त्यांच्या गावाला रवाना झाले.
बंदोबस्ताचे कर्मचारी ठाण्यात हजर होण्यापूर्वीच त्यांची रक्कम तेथे जमा करण्यात आली होती. बंदोबस्तात कसलाही ताणतणाव न जाणवल्यामुळे समाधानी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदात यामुळे भर पडली. ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या हाती ही रक्कम लगेच देण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे यांनी सांगितले.
भोजन तसेच अन्य भत्ते महिनो नि महिने कर्मचाऱ्यांच्या हाती पडत नाही असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आयोगाने जाहीर केलेली ही रक्कम पुढील निवडणुकीपूर्वी हाती पडली म्हणजे झाले, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती. त्या कर्मचाऱ्यांना आयोगाने सुखद धक्का दिला आहे.