Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्वस्त धान्य दुकानातून पामतेल गायब
औरंगाबाद, २४ एप्रिल/प्रतिनिधी

 

खाद्यतेलांचे वाढत चाललेले भाव लक्षात घेता गरिबांसह सर्वसामान्य नागरिक स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त पामतेल खरेदी करण्याकरिता पुढे आला असता शासनाच्या रेशनिंग दुकानातून त्याचा साठाच नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकाराची पुरवठा विभाग चौकशी करणार असून शिल्लक साठा त्वरित मिळावा याचाही बंदोबस्त करणार आहे. सध्या मात्र सामान्यांना महागडय़ा खाद्यतेलावर गुजराण करावी लागत आहे.
बाजारात करडी, सोयाबीन, शेंगदाणा अशा सर्वच खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले असताना गरिबांच्या फोडणीलाही तेल मिळणे कठीण झाले आहे.
राज्य शासनाने रेशनिंगच्या दुकानामध्ये स्वस्त दरात पामतेल विक्रीसाठी ठेवले होते मात्र मध्यंतरीच्या काळात त्याचा पुरवठा मागणीप्रमाणे न झाल्याने सामान्यांसह गरिबांसह हाल होत आहेत.
स्वस्त धान्य दुकानात ३५ रु. लिटर या दराने पामतेल देण्याची योजना शासनाने आखली होती. मात्र ती योजना काही काळच चालली. आता गोरगरिबांना ७० रु. लिटर याप्रमाणे बाहेरून खाद्यतेल खरेदी करावे लागत आहे. काही दुकानदारांनी पामतेलासाठी शासनाकडे पैसे जमा केले खरे, मात्र त्यांना या योजनेनुसार पुरवठा झाला नाही.
दुकानदारांनी पामतेल उपलब्ध करून मिळावे यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडे धाव घेतली. पुरवठा विभागाने आता या योजनेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून ज्या ज्या दुकानदारांनी पामतेलाची मागणी केली आहे त्यांना साठा उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
अन्नधान्य वितरण विभागाला १३ हजार १९५ लिटर, ग्रामीण भागासाठी २६ हजार २३५ लिटर त्याचप्रमाणे पैठण तालुक्यासाठी २६ हजार ६३५ लिटर, वैजापूरसाठी २६ हजार ६१० लिटर, गंगापूरसाठी ३२ हजार ८२० लिटर, कन्नडसाठी ३३ हजार १९५ लिटर, खुलताबादसाठी नऊ हजार ३७ लिटर, सिल्लोडसाठी २८ हजार १४० लिटर, सोयगावसाठी १० हजार ८०० लिटर अशाप्रमाणे पामतेलाचे वितरण लवकरच केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.
स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीनुसार एकूण आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्य़ात दोन लाख शहाएंशी हजार लिटर पामतेलाची आवश्यकता आहे. दरम्यान, पामतेलासाठी दुकानदारांनी २४ रु. पाच पैसे प्रति लिटर या दराने शासनाकडे रक्कम जमा केली आहे.