Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

आठ महिन्यांपासून बिलोलीतील पालिका कर्मचारी पगारापासून वंचित
बिलोली, २४ एप्रिल/वार्ताहर

 

बिलोली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार चालू आहे. पैशाविना सर्व व्यवहार अडल्याने कर्मचारीवर्ग हवालदिल झाला आहे. तेव्हा नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने शासनाकडून निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी कर्मचारीवर्गाची मागणी आहे.
उशिरा पगार मिळणे हे तर बिलोली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर व्हावा यासाठी अधिकारी वा पदाधिकारी कधीच लक्ष देत नाहीत, ही कर्मचाऱ्यांची नेहमीचीच तक्रार. नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे पगार मात्र गेल्या आठ महिन्यांपासून झालेले नाहीत. सध्या तर लग्नसराईचा काळ. कुणाच्या मुलाचे, मुलीचे तर कुणाच्या नातेवाईकांचे- मित्रपरिवाराचे लग्न ठरलेले. पण हातात फुटकी कवडीही नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. उधार उसनवारी कोण देणार आणि किती म्हणून देणार? पैशाविना सर्व व्यवहार अडलेले. अशा भयंकर कचाटय़ात येथील पालिका कर्मचारी अडकला असून पगाराच्या निधीपोटी असलेला ४२ ते ४५ लाखांचा निधी शासनाकडे पडून आहे. पण हा निधी मिळविण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष स्वारस्य दाखवीत नाहीत. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या या नाजुक परिस्थितीचा विचार करून पालिका प्रशासनाने हालचाली कराव्यात व निधी मिळवून कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात यावा, अशी कर्मचारीवर्गाची मागणी आहे.