Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘रंगला भूमीचा नवा सूर’ ला रसिकांचा चांगला प्रतिसाद
औरंगाबाद, २४ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साकेतनगर बुद्धविहार येथे ‘रंगला भूमीचा नवा सूर’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. भीमाई महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गीतांचा शास्त्रीय संगीतावर आधारित हा कार्यक्रम आहे. याची निर्मिती प्रा. संजय मोहड यांनी केली आहे. ते स्वत:च गायन करतात. भीमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिता गजभिये यांच्या हस्ते बुद्ध-भीम प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक अनिलकुमार बस्ते, संघमित्रा मोहड यांचेही स्वागत करण्यात आले.
‘आभाळातील तारे सारे
आज आनंदी झाले गं
भीमजयंतीसाठी सारे
भीमवाडीला आले गं’
या पहाडी रागातील गीतापासून गीतांचा प्रवास सुरू झाला. झिंझोटी रागातील ‘जन्मले भीमाईचे बाळ’, केदार रागातील ‘आज माझ्या मनाची कोमल कळी’, बिहाग रागातील ‘मी नवी कहानी’, तिलक कामोदमधील ‘चांदण्याची छाया, कापराची काया’, भीमपलाश रागातील ‘मी नदी निघाले भीमसागराकडे’, कलावती रागातील ‘आवळ रे तू आवळ आपली मूठ’ अशा एकापेक्षा एक रचना प्रा. मोहड यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘रंगला भूमीचा नवा सूर’ या भैरवीने रसिकांना उच्च आनंदाची अनुभूती दिली. प्रा. संजय मोहड यांना संवादिनीवर प्रा. दिलीप दोडके, व्हायोलिनवर पंकज शिरभाते, तबल्यावर प्रफुल्ल काळे, सहतालवाद्यावर प्रिस्ट ली यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे निरुपण प्रा. किशोर शिरसाठ यांनी केले.