Leading International Marathi News Daily
शनिवार, २५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

जातपडताळणी समितीचा आदेश खंडपीठाकडून रद्दबातल
औरंगाबाद, २४ एप्रिल/खास प्रतिनिधी

 

महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या जातपडताळणी समितीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. व्ही. हरदास व न्या. ए. व्ही. पोतदार यांनी रद्दबातल ठरविला आहे. आणि हे प्रकरण पुन्हा फेरतपासणीसाठी समितीकडे पाठविण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
अर्जदार बाळासाहेब यादव कांबळे यांचे महादेव कोळी जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याचा समितीचा आदेश न्यायालयाने रद्दबातल ठरविला. अर्जदार बाळासाहेब कांबळे यांना तत्कालीन तहसीलदारांनी चौकशी करून महादेव कोळीचे प्रमाणपत्र दिले आहे.
अर्जदारांच्या मामांकडे महादेव कोळी जमातीचे प्रमाणपत्र आहे. जातपडताळणी समितीने बाळासाहेब कांबळे यांचा महादेव कोळी या जमातीचा अर्ज वैध ठरविला. हे प्रकरण दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आले. २९ सप्टेंबर २००५ ला अर्जदाराला वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. आजीचे निधन झाल्यामुळे २८ सप्टेंबरला अर्जदाराने तार पाठवून समितीपुढे २९ सप्टेंबरला हजार राहू शकत नाही, असे सांगितले. त्यानंतर समितीने अर्जदाराशी कुठलाही पत्रव्यवहार केला नाही. त्यांचे प्रमाणपत्र ३१ डिसेंबर २००५ ला अवैध ठरविले. अर्जदाराचे म्हणणे ऐकून न घेता समितीने जातीचे प्रमाणपत्र रद्दबातल ठरविले.
नैसर्गिक न्यायतत्त्वाचा अवलंब समितीने केलेला नाही, असा युक्तिवाद अर्जदाराचे वकील विलास हुंबे यांनी केला. न्यायालयाने समितीचा ३१ डिसेंबर २००५ चा आदेश रद्दबातल ठरवून हे प्रकरण पुन्हा फेरतपासणीसाठी समितीकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात अर्जदारातर्फे अ‍ॅड. विलास हुंबे, तर समितीतर्फे अ‍ॅड. महेश देशमुख यांनी काम पाहिले.